
नाव : अनंता भिकाजी इंगळे
गाव : चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला
एकूण शेती : ५० एकर
कलिंगड लागवड : १५ एकर
खरबूज : ८ एकर
Akola Agriculture News: चितलवाडी (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथील अनंता इंगळे यांची ५० एकर शेती आहे. त्यापैकी १५ एकरांवर कलिंगड, ८ एकरांत खरबूज लागवड असते. याशिवाय २० एकर पपई, ४ एकर संत्रा आणि ५ एकर कपाशी लागवड आहे.
२०१४ पासून ते कलिंगड आणि खरबूज लागवड करत आहेत. फलोत्पादनातील मास्टर शेतकरी म्हणून अनंता इंगळे परिसरात परिचित आहेत.
बाजारपेठेचा अंदाज घेत व अनुभवाच्या जोरावर ते टप्प्याटप्प्याने लागवडीवर भर देतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांत ही लागवड केली जाते. पावसाळ्यातील लागवडीसाठी बेडमध्ये जास्त अंतर राखले जाते.
त्या तुलनेत उन्हाळ्यात कमी अंतरावर बेड तयार केले जातात. प्रत्येक हंगामासाठी प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे नियोजन करण्यावर त्यांचा भर असतो. सध्या त्यांनी १५ एकरांवर ७ मार्चला कलिंगड लागवड केली आहे.
लागवड नियोजन
उन्हाळी कलिंगड लागवडीसाठी फेब्रुवारी महिन्यात पूर्वमशागतीच्या कामांस सुरवात केली. नांगरणी, वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत केली.
लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने बेड तयार करून घेतले. दोन बेडमध्ये ५ फूट तर दोन रोपांत सव्वा फूट अंतर राखले जाते.
एका बेडवर कलिंगडाच्या एकाच ओळीचे नियोजन केले आहे.
बेड व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्यावर ठिबकच्या लॅटरल टाकून घेतल्या. प्रत्येक ओळीत एक लॅटरल टाकलेली आहे.
रासायनिक खतांचे बेसल डोस डीएपी ५० किलो, पोटॅश २५ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रमाणे मात्रा दिलेली आहे. त्यासोबतच उपलब्धतेनुसार सेंद्रीय खतांचा वापर केला जातो.
त्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून घेतला. मल्चिंग पेपरवर सव्वा फूट अंतरावर छिद्रे पाडून घेतली.
लागवडीपूर्वी ८ तास पाणी देत वाफे व्यवस्थित भिजवून घेतले.
वाफे चांगले भिजल्यानंतरच बियांची टोकण केली. टोकण पद्धतीने लागवडीसाठी एकरी साधारण ७ ते ८ हजार बी लागते.
लागवडीनंतरचे नियोजन
लागवडीनंतर साधारण ५ व्या दिवशी उगवण होण्यास सुरवात झाली.
उगवण चांगली होण्याकरिता पाण्याचा अतिवापर करण्याचे टाळले जाते. उगवण होईपर्यंत सिंचन करणे टाळले आहे.
लागवडीनंतर १० व्या दिवशी ठिबकद्वारे ट्रायकोडर्मा, सोडोमोनास आणि मायकोरायझा यांची एकदिवसाआड मात्रा दिली.
कीड-रोग व्यवस्थापन
मागील आठवड्यात पावसाळी वातावरणाची स्थिती होती. त्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशकांची फवारणी घेतली आहे.
लागवडीनंतर साधारण ११ व्या दिवसांपासून वेल धरण्यास सुरवात झाली. या काळात वेलींवर नागअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली आहे.
पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे एकरी १५ प्रमाणे लावले आहेत.
कलिंगड रोपांच्या वेलीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने निरिक्षण करत आहे. प्रादुर्भाव पाहून फवारणीचे नियोजन केले जाईल.
फुलांचे फळांत रूपांतर होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. फळमाशी फळांवर डंख मारते. आणि त्याचा परिणाम फळ पक्व झाल्यानंतर दिसून येतो. त्यासाठी फळमाशीचा प्रादुर्भाव पाहून वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असते. पुढील काळात फळमाशीसाठी सापळे लावले जातील.
सिंचन व्यवस्थापन
कलिंगडाचे बी टोकण केल्यानंतर ५ ते ७ तास ठिबकद्वारे सिंचन केले. त्यानंतर उगवणी होईपर्यंत सिंचन केले नाही. वातावरणीय स्थिती चांगले असल्याने पीक उगवण चांगली झाली. सध्या जमिनीतील ओलावा पाहून तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सिंचन केले जाईल.
पुढील टप्प्यात एक दिवसाआड तर फळ धारणेच्या अवस्थेत सिंचनाचा कालावधी वाढविला जाईल.
विक्री नियोजन
मार्च मधील कलिंगड लागवड ही साधारणपणे एप्रिल अखेर ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काढणीस तयार होते. कलिंगडांची विक्री ही पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश येथील बाजारपेठेत केली जाते.
व्यापारी जागेवरच मालाची खरेदी करतात. एकरी साधारणपणे २० ते २५ टन कलिंगड उत्पादन मिळते.
खत नियोजन
लागवडीच्या १५ दिवसानंतर दर तीन दिवसांनी विद्राव्य खतांची मात्रा ठिबकद्वारे देण्याचे नियोजन सुरु केले. पहिल्या १५ ते २५ दिवसांच्या कालावधीत १९ः१९ः१९ हे खत एकरी १ ते २ किलो प्रमाणे दिले.
त्यानंतर पुढील टप्प्यात फूल ते फळ धरण्याच्या कालावधीमध्ये १२ः६१ः० हे खत एकरी १ ते २ किलो प्रमाणे एक दिवसाआड मात्रा दिली जाते. कळीचे फळांत रूपांतर होण्याच्या अवस्थेत १३ः४०ः१३, ०ः५२ः३४ यांची मात्रा दिली जाईल.
अनंता इंगळे, ७९७२३६९७६७, (शब्दांकन : गोपाल हागे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.