संपूर्ण लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. सिंचनासाठी त्यांच्याकडे दोन विहीर आणि पाच कूपननलिका आहेत. त्यातील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. बेवडसाठी तूर, हळद या पिकांची लागवड केली जाते. पीक फेरपालटीवर विशेष भर दिला जातो. जमीन मध्यम, पाण्याचा निचरा करणारी आहे. या दृष्टीनेच सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केले जाते. निर्यातक्षम केळी उत्पादन (Banana Production) घेण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. केळी बागेचे संपूर्ण व्यवस्थापन हे जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील (All India Fruit (Banana) Research Center) तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
केळी लागवड ः
जून महिन्यात साडेपाच एकरांवर साडेआठ हजार झाडे, जुलैमध्ये ६ एकरांवर ९ हजार झाडे, १९ ऑगस्ट रोजी ६ एकरांवर साडेनऊ हजार आणि ५ सप्टेंबर रोजी ४ एकरांवर ७ हजार झाडांची लागवड केली आहे. लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपे वापरली आहेत. लागवड साधारण ६ बाय ५ फूट आणि साडेपाच बाय ५ फूट अंतरावर गादी वाफ्यावर केली आहे. त्यात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
व्यवस्थापनातील बाबी :
- सध्या जून लागवडीतील झाडे साडेतीन महिने वयाची झाली आहेत. मागील काही दिवसांपासून कोरडे वातावरण होते. काही दिवस उष्णताही अधिक दिसून आली. त्यामुळे सिंचनावर विशेष भर दिला. प्रतिदिन २ तास ठिबकद्वारे सिंचन केले. तर हलक्या जमिनीत रोज ३ तास सिंचन केले.
- वाफसा आल्यानंतर बैलजोडीच्या मदतीने बागेत आंतरमशागत करून घेतली. तसेच मजुराकडून बांधावरील आणि बागेतील गवत काढून बाग स्वच्छ केली.
- ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ होते. त्यामुळे सिंचनावर विशेष भर देणे आवश्यक असते. त्यासाठी सध्या बागेतील ठिबक सिंचन यंत्रणेचे योग्य तपासणी करत आहे. ठिबकच्या नळ्या, ड्रीपर, पाइप तपासून आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली.
- बागेतील काही झाडांजवळ फुटवे आले होते. हे फुटवे मुख्य पिकाच्या वाढीस अडथळा आणतात. त्यामुळे सध्या फुटवे काढण्याची कामे सुरू आहेत.
कुकुंबर मोझॅकबाबत केलेले कामकाज ः
- मागील काही दिवसांपासून रावेर परिसरातील बऱ्याच केळी बागांमध्ये कुकुंबर मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अतुलराव यांच्या जून, जुलै आणि ऑगस्ट लागवडीमध्ये प्रादुर्भाव दिसून आला.
- जून लागवडीतील सुमारे ८०० झाडे, जुलै लागवडीत सर्वाधिक ४ हजार झाडे आणि ऑगस्ट लागवडीतील १३०० झाडांवर प्रादुर्भाव आढळून आला. जून लागवडीमध्ये तुलनेने कमी प्रादुर्भाव होता. तर सप्टेंबर लागवडीमध्ये अजिबात प्रादुर्भाव आढळून आला नाही.
- प्रादुर्भावग्रस्त झाडे त्वरित काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली. त्याजागी नांग्या भरून घेतल्या. जेणेकरून झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनावर परिणाम होऊ नये.
- प्रादुर्भावग्रस्त झाडांवर नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी केली. तसेच निरोगी झाडांवर प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या.
- खत व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार खतांच्या मात्रा दिल्या जातात. मात्र बागेत कुकुंबर मोझॅकचा वाढता प्रादुर्भाव पाहता खते देण्याचे टाळले. कारण या काळात रोगग्रस्त झाडे काढण्याची कार्यवाही करायचे नियोजन होते.
- प्रादुर्भावग्रस्त झाडांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. कारण योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास बागेत पुन्हा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे.
आगामी नियोजन ः
- ड्रीपद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि एनपीके खते दिली जातील. प्रति १ हजार झाडांना युरिया १० किलो, १२ः६१ः० हे खत ५ किलो, पोटॅश १२ किलो प्रमाणे आठवड्यातून २ वेळा दिले जाईल.
- बदलते वातावरण पाहता, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस थंडी पडण्याची शक्यता आहे. थंडीच्या काळात झाडे सशक्त राहणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी झाडांच्या खोडाजवळ २४ः२४ः० हे खत ५० किलो आणि अमोनिअम सल्फेट २५ किलो प्रमाणे प्रति १ हजार झाडांना दिले जाईल.
- येत्या काळात खत आणि सिंचनावर विशेष भर दिला जाईल. जमिनीतील वाफसा पाहून रोज किमान २ तास सिंचन केले जाईल.
- बागेतील झाडांचे सतत निरीक्षण केले जाईल. जेणेकरून कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाईल. नियंत्रणासाठी शिफारणीनुसार फवारणी केली जाईल.
- झाडांजवळ वाढलेले फुटवे वेळोवेळी काढून टाकले जातील.
- अतुल पाटील, ९८२२४५१६२१
(सायंकाळी सहा ते नऊ वेळेत संपर्क साधावा.)
(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.