Crop Advisory : उन्हाळी पिके आणि फळपिकांसाठी काय आहे कृषी सल्ला?

Summer Crop Management : तापमानात आणि बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा ८७५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी.
Mango Crop
Mango CropAgrowon
Published on
Updated on

मुंबई येतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ता. १४ ते १८ मार्च या काळात हवामान कोरडे व मेघ आच्छादनरहित असेल, तर ठाणे जिल्ह्यात कोरडे ते अंशतः ढगाळ राहील. तसेच किमान व कमाल तापमान २१ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दिनांक १८ ते २४ मार्च २०२५ दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३.९ व २०.७ अंश सेल्सिअस एवढे असते, या वर्षी ते अनुक्रमे ३४.४ व २१.४ अंश सेल्सिअसएवढे असण्याची शक्यता आहे.

उन्हाळी भात - फुटवे अवस्था

तापमानात आणि बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा ८७५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी.

भुईमूग - फुलोरा ते आऱ्या येण्याची स्थिती

पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनंतर भर दिलेल्या भुईमुगाच्या पिकावरून रिकामे पिंप फिरवावे. पिंप फिरविल्याने जमिनीत घुसणाऱ्या आऱ्यांची आणि परिणामतः शेंगांची संख्या वाढते. त्यामुळे भुईमुगाचे उत्पादन वाढते.

Mango Crop
Crop Advisory : कोकण विभागासाठी काय आहे कृषी सल्ला?

कोरडे हवामान, तापमान वाढ व वाढता वाऱ्याचा वेग यामुळे सांद्रीभवन प्रक्रियेत वाढ होते. अशातच जमिनीतील पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पिकास ताण बसतो. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता टाळण्यासाठी भुईमूग पिकास फुलोरा अवस्थेत असताना पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.

लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी गरजेनुसार खुरपणी करून घ्यावी. नंतर पिकाला स्वस्तिक अवजाराने मातीची भर द्यावी.

मोहरी - शेंगा भरणे ते पक्वता अवस्था

मोहरी पिकाच्या सुमारे ९० टक्के शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी. कापलेले पीक उन्हात २ ते ३ दिवस वाळवावे. नंतर मळणी व उफणणी करून काडीकचरा व दाणे वेगळे करावेत.

कडधान्य पिके - पक्वतेची अवस्था

वाल, चवळी, मूग, कुळीथ या पिकांच्या पक्व शेंगा उन्हामुळे तडकून नुकसान होऊ शकते. ते कमी करण्यासाठी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी सकाळच्या वेळेस करावी. शेंगा उन्हात ४ ते ५ दिवस वाळवून व मळणी करून कोरड्या सुरक्षित जागी साठवाव्यात.

कलिंगड - काढणी

कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

फळबाग

नारळ - फळधारणा

नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या किडीची पिले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषतात. पानांवर रुगोज चक्राकार माशीचे पांढरे मेणचट तंतू दिसून येतात. माशी गोड चिकट स्राव सोडत असल्याने त्यावर वातावरणातील बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडलेली दिसतात. किडीच्या प्रादुर्भावासाठी बागेचे नियमित निरीक्षण करावे. किडीच्या व्यवस्थापनासाठी माडावर निम तेल (०.५ टक्का) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन फवारण्या प्रेशर पंपाच्या साह्याने कराव्यात. यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन किडींचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.

नवीन लागवडीच्या नारळ रोपे व त्यांची पाने कडक उन्हामुळे करपतात. ते टाळण्यासाठी रोपांना वरून सावली करावी. या बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावी.

पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे. माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या सोंडणे पुरावेत आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.

काजू - पक्वता ते काढणी

दोन दिवसाआड परिपक्व काजू बी व बोंडूची वेचणी करावी. बी बोंडूपासून वेगळे करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर ती उन्हामध्ये ३ दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरिता दर २ तासांनी बियांची उलटापालट करावी.

तीन दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बीची उगवण क्षमता तसेच गराची प्रत चांगली राखण्याकरिता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोळीमध्ये हवाबंद करावी. नंतर ती गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी.

नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पंधरा दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी द्यावे. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.

सध्याच्या हवामान स्थितीत काजू पिकावर बोंड व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. फळधारणा झालेल्या काजू पिकामध्ये कोवळ्या बिया काळ्या पडून त्यांची गळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

सुपारी - फुलोरा ते फळधारणा

सुपारी बागेस ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

नवीन लागवड केलेल्या सुपारीच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

दक्षिण व पश्‍चिम दिशेकडील खोडावर सतत पडणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांमुळे ठराविक भागातील खोड भाजून निघते. ते खोलगट व काळे पडते. उन्हापासून सुपारीच्या खोडांचे संरक्षण करण्यासाठी भाजणाऱ्या खोडावर गवताचा पेंढा किंवा सुपारीची झावळी बांधावी.

आंबा - फुलोरा ते फळधारणा अवस्था

कोरडे हवामान, तापमानात होणारी वाढ आणि बाष्पीभवनात झालेली वाढ यामुळे झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांची गळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे.

झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.

आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशी कीडग्रस्त गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत.

आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी आणि फळांची प्रत सुधारण्यासाठी १ टक्का पोटॅशिअम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात.

वाढणारे कमाल तापमान लक्षात घेता हापूस आंब्यातील फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर नॅप्थील ॲसेटिक ॲसिड २० पीपीएम (१ ग्रॅम प्रति ५० लिटर पाणी) या प्रमाणे मोहरावर फवारणी करावी. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर करावी. या वाढ नियंत्रकाचे द्रावण तयार करताना ते प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावे.

नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.

फळमाशी आणि प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ × २० सें.मी. आकाराच्या कागदी पेपरपासून बनविलेल्या पिशव्यांचे अवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे फळांचा आकार व वजन वाढण्यासोबतच डाग विरहित फळे मिळतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com