शेतकरी ः गणेश श्यामराव नानोटे
गाव ः निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
एकूण क्षेत्र ः ५० एकर
कपाशी क्षेत्र ः १२ एकर
निंभारा, (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे यांची ५० एकर शेतकरी आहे. त्यापैकी १२ एकरात कपाशी (Cotton Cultivation) आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन (Soybean) केळी तसेच सोयाबीन अधिक तूर (Tur) अशी आंतरपीक पद्धतीने लागवड केली आहे. श्री. नानोटे हे मागील ३० वर्षांपासून कपाशी लागवड (Cotton Farming) करीत आहेत. या वर्षी कपाशी लागवडीसाठी खासगी कंपनीच्या ५ वाणांची निवड केली आहे. गणेश नानोटे हे कपाशी पिकांमध्ये विविध प्रयोग सातत्याने करतात. वातावरण हवामान बदलातही कपाशी पिकाचे उत्पादन (Cotton Production) चांगल्याप्रकारे कसे घेता येईल, यासाठी ते प्रयत्न करत असतात.
- पूर्वमशागत करून जमीन लागवडीसाठी तयार केल्यानंतर बैलजोडीच्या साह्याने ३ ते १५ जून या काळात पेरणी पूर्ण केली. जमिनीच्या मगदुरानुसार साडेतीन बाय सव्वा फूट आणि ४ बाय सव्वा फूट अंतरावर पेरणी केली.
- पेरणीवेळी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. संपूर्ण क्षेत्रामध्ये सिंचनासाठी स्प्रिंकलरचा वापर केला आहे.
खत व्यवस्थापन ः
सध्या कपाशीचे पीक ८५ ते ९० दिवसांचे झाले आहे. सध्या पीक फुलधारणा ते फळधारणेच्या अवस्थेत आहे. मागील २० दिवसांपूर्वी पिकास रासायनिक खतांच्या दोन मात्रा दिल्या आहेत. लागवडीनंतर १० दिवसांनी डीएपी ५० किलो खतांची पहिली मात्रा मजुरांमार्फत दिली. तर दुसरी मात्रा ३५ व्या दिवशी डवरणीद्वारे ८ः२१ः२१ हे खत ४० किलो आणि युरिया २५ किलो प्रति एकर प्रमाणे दिले. तिसरी मात्रा ७० व्या दिवशी डवरणीद्वारे युरिया ५० किलो, एमओपी २५ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो प्रमाणे दिली.
कीड नियंत्रण ः
कीड नियंत्रणासाठी पिकाचे सातत्याने निरिक्षण करत आहे. पिकावर रसशोषक किडी, फुलकिडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आला. काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचे पतंग देखील आढळून आल्या. अपवादात्मक डोमकळ्या दिसत आहेत. त्यासाठी अळी अंडीनाशक तसेच रसशोषक कीड नियंत्रणासाठी फवारणी करणार आहे. त्यात निंबोळी अर्कासोबत शिफारशीत रासायनिक कीडनाशकांची फवारणी केली जाईल.
आगामी नियोजन ः
- मजुरांच्या मदतीने शेवटची निंदणी केली आहे. या वर्षी मजुरी दर प्रतिदिन २०० ते २५० इतके आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मजुरी दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
- मागील १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पिकास संरक्षित पाणी देणार आहे.
- निंभारा हा परिसर काटेपूर्णा या अभयारण्याच्या जवळ आहे. त्यामुळे वन्यजीवांचा जास्त त्रास होतो. रानडुक्कर, सायाळ, नीलगाय आदी वन्यजीव कपाशी पिकाला लागलेली वजनदार, चांगल्या गुणवत्तेची परिपक्व बोंडे खातात. त्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शेताच्या बाजूने बांबू लावून त्यावर तारा बांधल्या आहेत. या तारांना सौर ऊर्जेवरील झटका मशिन बसवण्याचे काम सुरू आहे.
- गणेश नानोटे, ९५७९१५४००४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.