Mung, Urad Disease : मूग, उडीद पिकांवरील रोगांचे नियंत्रण

Mung, Urad crop : रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार अनुकूल वातावरणामध्ये लवकर होतो. हेक्टरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेले पीक अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही.
Mung, Urad Disease
Mung, Urad DiseaseAgrowon
Published on
Updated on

डाॅ. मनोहर इंगोले, डाॅ. सुहास लांडे, डाॅ. प्रज्ञा कदम

Mung, Urid Disease Management :आहारात मुगास अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुगामध्ये २४ ते २५ टक्के उच्च दर्जाची प्रथिने व मुबलक खनिजे आहेत. या प्रथिनांचे प्रमाण गव्हाच्या दुप्पट, तर तांदळाच्या तिप्पट आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील हे पीक मातीच्या सुपीकतेसाठीही तितकेच महत्त्वाचे पीक आहे. पीक पद्धतीत मुगाचा समावेश केल्यास त्याच्या मुळावरील गाठीमध्ये असलेले रायझोबिअम जिवाणू हवेतील नत्र शोषतात. पिकांची नत्राची गरज भागवली जाते. या पिकानंतर घेतल्या जाणाऱ्या पिकालाही त्याचा फायदा होतो. तसेच हे पीक जमिनीत गाडल्यास हिरवळीच्या खतपिकाप्रमाणे जमिनीचा कस सुधारतो. मात्र हे फक्त ६५ ते ७० दिवस इतक्या कमी कालावधीचे कडधान्य पीक असल्यामुळे बहुतांश शेतकरी त्यावरील रोगांबाबत अनभिज्ञ असतो किंवा दुर्लक्ष करतो. रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार अनुकूल वातावरणामध्ये लवकर होतो. हेक्टरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेले पीक अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही.

लीफ क्रिंकल विषाणूजन्य रोग
लक्षणे ः मूग किंवा उडीद पीक पेरल्यानंतर साधारणतः तीन आठवड्यांनंतर या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होते. सर्वप्रथम पानातील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे पाने फिकट पिवळसर दिसतात. रोगग्रस्त झाडांच्या पानांवर खोलगट व उभारलेले भाग दिसतात. पानांच्या कडा खालच्या बाजूला वळतात. झाडांची वाढ खुंटते. झाडे शेंड्याकडून खाली वाळत येतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना शेंगा येत नाही. आल्या तरी त्या संख्येने खूप कमी, आकाराने लहान, वेड्या वाकड्या असतात.

Mung, Urad Disease
Mung, Urid : खरीप हंगामातील उडीद, मूग धोक्यात

विषाणूजन्य रोग हे अत्यंत नुकसानदायक आहे. ते येऊच नयेत यासाठी दरवर्षी आणि सातत्याने व्यवस्थापन पद्धतीमध्ये खालील प्रतिबंधात्मक बाबींचा अंतर्भाव करावा.
१) शेतातील रोगकारक घटकांचा नाश करण्यासाठी लागवडीपूर्वी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. काडीकचरा गोळा करून जाळून नष्ट करावा.
२) पेरणी करताना जास्त दाट करू नये. त्यातील अंतर ३० बाय १० किंवा ४५ बाय १० सें.मी. ठेवावे.
३) रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यामुळे होतो. पेरणीकरिता विषाणुमुक्त बियाण्याचा वापर केला पाहिजे.
४) शेत तणाविरहित ठेवावे. ईश्‍वरी, खोटी, चवळी आणि कुंजर या तणावरही या रोगाचा विषाणू जिवंत राहतो. तो नंतर रसशोषक किडी मावा, पांढरी माशी आणि फुलकिड्याद्वारे मूग /उडीद पिकावर येतो.
५) मूग पिकाबरोबर आंतरपीक म्हणून ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके घेतल्यास कीटकाद्वारे रोगाचा प्रसार कमी होतो. ही पिके अडथळा म्हणून काम करतात.
६) पिकास जास्त नत्रयुक्त खत देऊ नये. पिकांची कायिक वाढ होते. किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
७) जमिनीत दरवर्षी एकच पीक न घेता पिकांची फेरपालट करावी.
८) हा रोग बियाण्याद्वारे पसरत असल्यामुळे बियाण्यास गरम पाण्याची प्रक्रिया करावी. बियाणे ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात २० ते ३० मिनिटे बुडवून ठेवल्यानंतर पेरणीसाठी वापरावे. किंवा
९) रसशोषक किडींचा सुरुवातीच्या काळातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यूजी) ५ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (४८ टक्के एफएस) १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

Mung, Urad Disease
Mung, Urad Pest : मूग, उडीद पिकांवरील कीड व्यवस्थापन

सद्यःस्थितीतील व्यवस्थापन ः
१) पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतात १५ बाय ३० सें.मी. आकाराचे पिवळे चिकट सापळे हेक्टरी १६० प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर पेरणीनंतर १५ दिवसांनी लावावे.
२) मावा, पांढरी माशी व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव दिसताच, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शिफारशीत आंतरप्रवाही कीडनाशकाच्या फवारणीचे नियोजन करावे.

केवडा :

हा रोग विषाणूजन्य आहे. पानावर अनियमित हिरव्या व पिवळ्या रंगांचे चट्टे दिसून येतात. नवीन येणारी पाने पूर्णपणे पिवळे झालेली दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुले व शेंगा खूप कमी लागतात. शेंगा आकाराने लहान, वाकड्या, पिवळ्या रंगाच्या राहतात. उन्हाळ्यामध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. या वर्षीप्रमाणे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये खूपच कमी पाऊस असे वातावरण या रोगाकरिता पोषक आहे.
उपाय :
- बनतुळस, क्रोटॉन आणि भृंगराज अशा पूरक तणांचा नायनाट करावा.
- सुरुवातीला प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- शेतामध्ये पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी १६० पिवळे चिकट सापळे हेक्टरी लावावे.
- ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) फवारणी करावी.
- मावा, पांढरी माशी व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शिफारशीत आंतरप्रवाही कीडनाशकाच्या फवारणीचे नियोजन करावे.



मूग पिकावरील रोगाचे व्यवस्थापन
भुरी रोग :
लक्षणे :

या रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत होतो. पानावर सुरुवातीलाच लहान, अनियमित, पांढरे चट्टे दिसतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास बुरशी संपूर्ण पानावर,फांद्यावर व फुलावर पसरते. पाने, फुले गळून पडतात. पानाच्या दांड्या, शेंगा आणि खोडावर सुद्धा पांढरे चट्टे आढळतात. उत्पादनात खूप घट येते. या रोगाच्या वाढीकरिता २२ ते २५ अंश तापमान व ढगाळ वातावरण अनुकूल आहे.

व्यवस्थापन :
भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी
गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)

सर्कोस्पोरा पानावरील ठिपके
लक्षणे ः

-हा रोग सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होतो.
-लहान गोलाकार, मध्यभागी तपकिरी, कडा लालसर असे चट्टे पानांवर आढळतात. कालांतराने चट्ट्यांचा आकार मोठा होतो. त्यामुळे अनेक ठिपके एकमेकांत मिसळल्यामुळे खूप मोठे चट्टे पानावर तयार होते.
-पाने करपल्यासारखे दिसतात. अनुकूल वातावरणात पीक फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात पानगळ होते.
-रोगाची तीव्रता जास्त असल्यास तपकिरी चट्टे पानाच्या देठावर फांद्यावर व शेंगावरही आढळतात. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे व हवेद्वारे होतो.
-हा रोग वाढीसाठी २२ ते ३० अंश तापमान व ९० ते ९५ टक्के वातावरणातील आर्द्रता अनुकूल ठरते.

उपाय :
- शेत तणाविरहित ठेवावे.
- शिफारशीत अंतरावर बियाणे पेरणी करावी.
- रोगाच्या व्यवस्थापनाकरिता मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबिन (५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (लेबल क्लेम)

डाॅ. मनोहर इंगोले, ९४२१७५४८७८
(कडधान्य संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com