यवतमाळ : यंदा सतत येणाऱ्या पावसाने उडीद व मूग (Mung and urd) आदी कडधान्य पिकांना (Pulse acarop) फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या (Kharif Season) सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या पिकांना फटका बसला असून, पावसाने उडीद व मुगाच्या शेंगा सडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना बेजार केले आहे. सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. कापूस, सोयाबीन, तूर पिकांची वाढ खुंटली आहे. संततधारमुळे आता उडदाच्या उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. उडीद व मूग पीक काढणीच्या तोंडावरच पाऊस आल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. यंदा जवळपास सहा हजार हेक्टरवर उडीद व तेवढ्याच क्षेत्रावरील मूग पिकाची लागवड झाली आहे. पावसाचा खंड व त्यानंतर सातत्याने येणाऱ्या पावसाने या दोन पिकांना मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी आलेल्या पावसाने मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. शेंगा सडल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. उडीद पिकासाठी शेतकऱ्याला एका एकराला सरासरी चार ते पाच हजार रुपये लागवड खर्च येतो. आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडत आहे. साधारणतः चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत असते. यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.
दर वर्षी उडीद व मूग पिकांचे उत्पादन आम्ही घेतो. मात्र, यंदा पावसामुळे उडीद व मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेंगा सडल्याने पीक हातात येईल, याची शाश्वती दिसत नाही.
- रमेश तिजारे, शेतकरी, दारव्हा.