Grape Disease : रोगांच्या नियंत्रणासाठी कॅनोपी व्यवस्थापन

सध्या बऱ्याचशा बागा या फुलोरा ते सेटिंग अवस्थेत आहेत. या काळात बागेतील आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली, तर वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलीच्या वाढीचा जोमदेखील तितक्याच प्रमाणात वाढलेला दिसून येईल.
Grape Disease
Grape DiseaseAgrowon

डॉ. स. द. रामटेके, स्नेहल खलाटे, अमृता लंगोटे

सध्या बऱ्याचशा बागा (Vineyard) या फुलोरा ते सेटिंग अवस्थेत आहेत. या काळात बागेतील आर्द्रता (Humidity) ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली, तर वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलीच्या वाढीचा जोमदेखील तितक्याच प्रमाणात वाढलेला दिसून येईल. परिणामी, बागेत बगलफुटी जास्त प्रमाणात वाढतील. तसेच शेंडाही तितक्याच प्रमाणात वाढेल.

Grape Disease
Grape Season : जानेवारीपासून द्राक्ष हंगामाला गती येणार

यामुळे कॅनॉपी वाढून गर्दी निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच बागांमध्ये गर्दी झाल्यामुळे डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या ठिकाणी शेंड्याकडील वाढ जास्त प्रमाणात दिसून येते, तेथे करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. दाट कॅनॉपीमुळे द्राक्षवेलीमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी रोग नियंत्रणाच्या दृष्टीने फळ छाटणीनंतर बागेमध्ये काटेकोर कॅनॉपी व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरते.

Grape Disease
Grape Management : द्राक्ष बागेत फुलोरा, सेटिंग अवस्थेत घ्यायची काळजी

डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा वेलीवर वाढलेल्या बगलफुटीमुळे जास्त प्रमाणात होतो. बगलफुटी काढल्यामुळे कॅनॉपी मोकळी होऊन हवा खेळती राहण्यास मदत होईल. आणि रोगाच्या प्रसारासाठी सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही. मोकळ्या कॅनॉपीमुळे फवारणीचे कव्हरेज चांगले होऊन रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येते.

बागेत वेल विस्ताराचा उपयोग हा उत्पादन वाढवण्यासाठी, फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, रोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि बागेतील कामे सुलभ करण्यासाठी केला जातो. यासाठी विशेषतः फांद्या बांधणे, फांद्याची विरळणी, पाने काढणे, घड काढणे या कामांवर भर देणे आवश्यक आहे. वेलींचे विस्तार व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यास बागेत रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. आणि उत्तम दर्जाचे द्राक्ष उत्पादन घेणे शक्य होते.

फांद्या बांधणे

 बागेतील कॅनॉपी व्यवस्थापनासाठी शूट पोझिशनिंग हा महत्त्वाचा घटक आहे. योग्य शूट पोझिशनिंगमुळे पानाचे एकसमान वितरण तयार होण्यासाठी अंकुरांना (शूट) योग्य दिशा मिळते. त्यामुळे द्राक्ष घडांना योग्य सूर्यप्रकाश मिळतो. परिणामी, घडाची प्रत सुधारते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. योग्य कॅनॉपी व्यवस्थापनामुळे बागेत चांगले वातावरण निर्माण होऊन कीड, रोगांचे योग्य नियंत्रण करणे शक्य होते.

फांद्याची विरळणी

 विरळणी केल्यामुळे कॅनॉपीची घनता कमी होते. हवेच्या चांगल्या हालचालींमुळे रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. तसेच बुरशीनाशकांचा द्राक्षवेलीमधील प्रवेश सुधारतो. घडांवर सावली पडत नाही. त्यामुळे घडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि फळधारणेची क्षमता सुधारण्यास मदत होते.

पाने काढणे

 पान काढून टाकणे म्हणजे घडांच्या आसपासच्या भागातील वेलीतून पाने काढून टाकण्याची प्रक्रिया होय. त्यासाठी सुरुवातीची २ ते ३ पाने काढावीत.

फायदे

 बागेमध्ये हवा खेळती राहते.

 बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची फवारणी योग्य त्या ठिकाणी होते. त्यामुळे रोग नियंत्रण लवकर होण्यास मदत होते.

फळधारणा क्षमता सुधारते.

 बागेत योग्य वातावरण निर्मिती होऊन द्राक्षाचा रंग आणि चव सुधारते.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

- डॉ. स. द. रामटेके, ९४२२३१३१६६, (प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com