Mango : आंबा फळबागेचे संतुलित खत व्यवस्थापन

आंबा उत्पादन जरी आता संपले असले तरी पुढील हंगामातील चांगल्या उत्पादनासाठी आतापासूनच झाडांची पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करणे आवश्यक असते.
Mango
MangoAgrowon

आंबा उत्पादन (Mango Production) जरी आता संपले असले तरी पुढील हंगामातील चांगल्या उत्पादनासाठी आतापासूनच झाडांची पोषक अन्नद्रव्यांची (Nutrition) पूर्तता करणे आवश्यक असते. या लेखामध्ये नवीन लागवड केलेल्या आणि उत्पादनक्षम आंबा बागेमधील एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाची (Integrated Nutrition Management) माहिती घेऊ.

Mango
शेतकरी नियोजन : फळबाग व्यवस्थापन

नवीन लागवड करताना...

उन्हाळ्यामध्ये साधारणतः १ × १ × १ मीटर आकाराचे खड्डे खणून घेतलेले असतील. हे खड्डे खणताना वरील सुपीक मातीचा थर एका बाजूला काढून ठेवावा. त्यात लागवडीपूर्वी ३-४ घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून तयार मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. चांगला पाऊस झालेला असल्यास आपण निवडलेल्या जातींच्या कलमाची लागवड करावी. पारंपरिक पद्धतीने ८ ते १० × ८ ते १० मीटर अंतरावर लागवड करू शकतो. या पद्धतीने लागवड केल्यास बागेत सुरुवातीच्या ५ वर्षांपर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगावर्गीय पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत. हिरवळीची खतपिके धैंचा, ताग वेळोवेळी घेऊन बागेमध्ये गाडावीत. त्यामुळे पिकांच्या सेंद्रिय खते व नत्राची पूर्तता होण्यास मदत होईल. व बऱ्यापैकी उत्पन्नही हाती येईल.

घन पद्धतीच्या लागवडीमध्ये ५ × ५ मीटर अंतरावर लागवडीची शिफारस आहे. मात्र अशा लागवड केल्यास बागेची गरजेनुसार नियमित छाटणी करणे गरजेचे असते.

कलमाची पिशवी अलगद कापून काढावी. कलम मातीच्या हुंडीसह भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. लागवड करतेवेळी कलमाचा जोड जमिनीच्या थोडा वर राहील, याची काळजी घ्यावी. या कलमांना काठीचा आधार द्यावा.

Mango
Horticulture : फळबाग लागवडीची खीळ काढा

पहिले तीन वर्षे कलमांना संरक्षित पाणी द्यावे. कलमांच्या जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. उन्हाळ्यामध्ये कलमांना हिरव्या रंगाचे शेडनेट लावून उन्हापासून बचाव करावा.

नवीन लागवड केलेल्या झाडास पहिली पाच वर्षे, प्रत्येक वर्षी १०-२० किलो शेणखत मुख्य खोडापासून १ फूट अंतरावर बांगडी पद्धतीने मातीआड करून द्यावे. किंवा ३ किलो गांडूळ खतात अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पी.एस.बी.) प्रत्येकी ५० ग्रॅम मिसळून प्रति झाडही देता येईल.

दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी झाडांच्या आळ्यामध्ये सुमारे ३-४ इंच जाडीचे बागेतील सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. खतांची मात्रा माती परीक्षण करून द्यावी. पिकांच्या एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये व पिकांची गरज याचा विचार करणे गरजेचे आहे. जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकवण्यासाठी सेंद्रिय, जैविक आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून खतांचा वापर करावा. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम असेल तर शिफारशीत खतमात्रा द्यावी. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी जास्त असेल तर माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीप्रमाणे खतांच्या मात्रेत बदल करावेत.

पूर्ण वाढ झालेल्या झाडास, प्रत्येक वर्षी ४०-५० किलो शेणखत, १५०० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश द्यावे. नत्राची मात्रा जून-जुलै व सप्टेंबर मध्ये दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. स्फुरद व पालाश जून-जुलैमध्ये एकाच हप्त्यात शेणखताबरोबर द्यावे. पूर्ण वाढ झालेल्या झाडाला खते मुख्य खोडापासून १ ते १.५ मीटर अंतरावर १५-२० सें.मी. खोल वर्तुळाकार चर खणून बांगडी पद्धतीने द्यावीत. ती त्वरित मातीआड होतील, हे पाहावे. रासायनिक खते कधीही उघड्यावर फेकून देऊ नयेत.

पावसाळा सुरू झाल्यावर व मोहोर फुटताना अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) प्रत्येकी ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात विरघळून सेंद्रिय खतातून प्रति झाड दिल्यास नत्र आणि स्फुरद खताच्या शिफारशीत मात्रेत १५ % बचत करता येते. जिवाणू खते रासायनिक खतांबरोबर देऊ नये. साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रा दिल्यानंतर एका आठवड्याने द्यावीत. उत्तम दर्जाची जैविक खते ही प्रामुख्याने कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन परिषदेची विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे अशा अधिकृत स्रोतांकडून घ्यावीत.

माती परीक्षणातून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आल्यास किंवा जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करावी. उदा. सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड -१ (लोह २ %, जस्त ५ %, मंगल १ %, तांबे ०.५ % आणि बोरॉन १ %) हे खत ५० ग्रॅम प्रति १० किलो शेणखतामध्ये मिसळून आठवडाभर मुरू द्यावे. त्यानंतर फळांची तोडणी पूर्ण झाल्यावर प्रति झाडाला द्यावे. काही प्रमाणात नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारी खते कमतरतेनुसार फवारणी करूनही देता येतात.

डॉ. पी. ए. साबळे , ८४०८०३५७७२

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के., सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com