प्रभावती घोटगाळकर, वृषाली भनभणे, डॉ. अहमद शब्बीर टी. पी.
कृषी क्षेत्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची वाढती मागणी (Food Grain Demand) पूर्ण करण्याचा ताण हा कृषी व्यवसायावर सतत येत आहे. एकेकाळी पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती (Organic Farming) करणाऱ्या या देशामध्ये १९६० पासून नव्या सुधारित जाती आणि रासायनिक कीडनाशकांचा (Chemical Pesticide) वापर होऊ लागला. विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे पिकाचे मोठे नुकसान (Crop Damage) कमी करण्यात या कीडनाशकांचा (Pesticide) मोठा वाटा आहे.
एकेकाळी वरदान ठरलेली या कीडनाशकांचा पुढे असंतुलित आणि अनावश्यक वापर वाढत गेला. या कीडनाशकांप्रति किडींमध्ये प्रतिकारकताही वाढत गेली. चांगले परिणाम मिळत नसल्यामुळे कीडनाशकांचे प्रमाणही शेतकरी वाढवू लागले. त्यामुळे किडीसोबतच पर्यावरणातील अन्य मित्रकीटक बळी पडत गेले. परिणामी, किडींचा उद्रेक वाढू लागला. माती, हवा आणि पाण्यामध्ये त्याचे विषारी अंश व प्रदूषण वाढत चालले. हे एक दुर्दैवी चक्र शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढच करत चालले आहे.
भारतातील कीडनाशक उत्पादन -
भारतामध्ये ३०६ पेक्षा जास्त कीटकनाशकांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामधील ६३ कीडनाशकांच्या वापरावरही बंदी आणली गेली आहे. भारतामध्ये १९५२ मध्ये कीडनाशक उत्पादनाला सुरुवात झाली. उत्पादनामध्ये भारत हा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे.
समस्या काय?
-शेतकऱ्यांमधील माहितीचा अभाव.
- भेसळयुक्त आणि कमी दर्जाची कीडनाशके.
- कीडनाशक व रासायनिक खतांचा असंतुलित वापर.
- युरोपसह विकसित देशांच्या तुलनेमध्ये कमी नियम व निर्बंध असल्यामुळे कंपन्यांसह सर्वांकडून गैरफायदा घेतला जातो. उदा. अकार्यक्षम, हलक्या दर्जाची कीडनाशके भारतीय बाजारपेठेमध्ये पाठवली जातात. त्याचा शेतकरी आणि पर्यावरण दोघांनाही फटका बसतो.
- फवारणीसाठी पारंपरिक तंत्राचा वापर केला जात असल्याने मानव आणि कीडनाशकांचा थेट संपर्क येऊन विषबाधेच्या समस्यांत वाढ दिसून येते.
कीडनाशकांचा वापर आणि परिणाम ः
बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे पाठीवरील नॅपसॅक पंपाचा वापर अधिक होतो. तसेच बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्राचा वापर अलीकडे वाढू लागला आहे. मात्र फवारणीवेळी सुरक्षा कपडे, साधने किंवा योग्य त्या सर्व काळजी घेण्याबाबत आवश्यक तितकी जागृती झालेली नाही. त्याच आता अनेक ठिकाणी फवारणीसाठी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाच्या वापराला सुरुवात होत आहे. त्यावर योग्य नियम, बंधने याबाबत आतापासूनच धोरणे केली पाहिजेत. अन्यथा, वातावरणाच्या प्रदूषणाची समस्या आणखी वाढण्याचा धोका आहे.
-फवारणीच्या द्रावणाचे कण हे अत्यंत लहान असून, ते वातावरणातील अन्य घटकांसोबत मिसळू शकतात. त्याचा त्या परिसरातील लोकांच्या श्वसनासह आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
-कीटकनाशकांचा सर्वात जास्त परिणाम होतो तो मातीवर. फवारणी, ड्रेचिंग आणि ठिबकद्वारे दिली जाणारी रसायनांमुळे मातीमध्ये प्रदूषण वाढत आहे. विशेषतः जमिनीतील क्षारांचे असंतुलन होऊन सामूही बदलत आहे. परिणामी, जमिनीचे आरोग्य बिघडते.
- पिकासाठी आवश्यक आणि उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणू आणि संपूर्ण सुपीकतेवर परिणाम दिसून येतो.
-वापरलेली कीडनाशके वेगवेगळ्या मार्गाने पाण्याच्या स्रोतांपर्यंत पोहोचून त्यात प्रदूषण होऊ शकते. मातीमध्ये पिकांच्या संरक्षणासाठी ड्रेंचिगद्वारे, ठिबकद्वारे वापरली जाणारी कीडनाशके, तसेच मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरली जाणारी रसायने पाण्यासोबत भूजलामध्ये किंवा वाहत्या पाण्यासोबत जवळच्या जलाशयांमध्ये जाऊ शकतात. पाण्यामध्ये मिसळल्या गेलेल्या कीडनाशकांचा परिणाम जलचरांवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. त्यांच्या विषारीपणामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतो. अशा विषबाधित जलचरांचा आहारात समावेश होणाऱ्या पक्षी आणि माणसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतात.
कीडनाशकांमुळे विषबाधा झाल्याची लक्षणे ः
-शरीरावर खाज सुटणे.
-शरीरावर पुरळ येणे.
-अशक्तपणा व चक्कर येणे.
-पोटात दुखणे, डोकेदुखी.
-स्नायूदुखी, बेशुद्ध होणे, धाप लागणे, खोकला येणे.
-डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधूक दिसणे.
-अस्वस्थ वाटणे.
-बऱ्याच वेळा मृत्यूसुद्धा येऊ शकतो.
विषबाधा टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
- पिकाच्या संरक्षणासाठी एकात्मिक कीडनियंत्रणाच्या उपाययोजनांवर सर्वाधिक भर असला पाहिजे. रासायनिक कीडनाशकांची फवारणी ही अंतिम उपाययोजना म्हणूनच केली पाहिजे.
-कीडनाशके अंगावर पडू नयेत, यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करणे टाळावे.
-डोळे, तोंड आणि त्वचेला होणारे अपाय टाळण्यासाठी फवारणीवेळी संरक्षक कपडे, गॉगल, हातमोजे यांचा वापर करावा.
-कीडनाशकाचा वास घेणे, द्रावण हुंगणे असे प्रकार टाळावेत.
-फवारणीचे मिश्रण हाताने मिसळण्याऐवजी लांब काठीचा वापर करावा.
-अधिक तापमान, वारा आणि पावसात फवारणी करू नये.
-फवारणीदरम्यान कोणतीही गोष्ट खाणे, धुम्रपान करू नये. फवारणीपूर्वीच थोडेसे खाऊन घ्यावे. उपाशीपोटी फवारणी करू नये.
-फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
-कीडनाशकांचा फवारणी केलेल्या क्षेत्रामध्ये गाई-गुरे, पाळीव प्राणी किमान दोन आठवडे जाऊ देऊ नयेत.
-कीडनाशकांच्या नियमित फवारणी करणाऱ्या व्यक्तींची डॉक्टरांकडून नियमित कालखंडाने तपासण्या कराव्यात.
जागरूकता हे महत्त्वाचे अस्त्र...
कीडनाशके हे पिकाच्या संरक्षणामध्ये मोलाची भूमिका बजावतात. मात्र त्यांचा शिफारशीत मात्रेमध्ये, पिकाच्या व किडीच्या योग्य अवस्थेत वापर केला पाहिजे. कीडाशकांच्या फवारणीनंतर पिकांच्या खाद्यघटकांमध्ये विषारी अंश राहू नयेत, यासाठी कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल) आणि त्या काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी या बाबी जाणून घ्याव्यात. त्यांचे पालन करावे. या प्रतीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच कापणी केलेल्या शेतीमालामध्ये कीडनाशकांचे विषारी अंश अधिक राहतात. ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. शेतीमाल किंवा त्यापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये प्रमाणित कमाल अवशेष मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळून आल्यास अशी उत्पादने देशांतर्गत बाजारात विकणे आणि अन्य देशांमध्ये निर्यात करणे धोक्याचे ठरते. निर्यातीमध्ये असे अंश आढळल्यास त्याचा दंड आणि नामुष्की मोठी असते. एकूणच देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
अनेक शेतकरी निर्यातीच्या उत्पादनासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत असले तर देशांतर्गंत बाजारपेठेमध्ये माल पाठवताना तितके दक्ष राहत नसल्याचा अनुभव अनेक वेळा येतो. मात्र अन्य देशांतील नागरिकांचे आरोग्य जसे महत्त्वाचे आहे, तसेच आपल्या देश बांधवांचे आरोग्यही आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ही बाब जाणून तसे आपले वर्तन असले पाहिजे. याबाबत मोठ्या प्रमाणात जागृतीची आवश्यकता आहे. कीडनाशकांचे उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यांमध्ये विविध पिकांतील कमाल अवशेष पातळी (एमआरएल) आणि काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी (पीएचआय) यांची माहिती असली पाहिजे. दरवेळी कीडनाशक उत्पादनांची विक्री करताना शेतकऱ्यांना ते सांगत राहणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांमध्येही उत्तम कृषी पद्धती (गुड अॅग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस) शिफारशींबाबत जागरूकता केली पाहिजे. दर काही कालावधीनंतर शेतीमालाच्या तपासण्या देशांतर्गत बाजारातही व्हायला हव्यात. त्यामुळे कीडनाशकांचा अनावश्यक वापर कमी करता येईल. मानव आणि पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कसे टाळता येतील, या संदर्भातही जागरूकता सातत्याने करत राहणे आवश्यक आहे. हीच जागरूकता प्रत्यक्ष वापर करणारे शेतकरी, शेतीमालाचा ग्राहक आणि एकूणच पर्यावरण अशा सर्वांसाठी शाश्वत फायद्याची गुरुकिल्ली ठरू शकते.
संपर्क ः ०२०- २६९५ ६०००
(भारतीय कृषी संशोधन परिषदेचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.