
Parbhani News : खुल्या बाजारातील हरभऱ्यांच्या दरात सुधारणा झाली असून, किमान ५४०० ते कमाल ५७०० रुपयांच्या आसपास दर मिळत आहेत. त्यामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आजवर एकाही शेतकऱ्याची नोंदणी झालेली नाही, असे पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
२०२४ च्या रब्बी हंगामात परभणी १ लाख ९० हजार हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली.गतवर्षीच्या तुलनेत उत्पादकता वाढली आहे. या दोन जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात हरभऱ्याचे बाजारभाव ५ हजार रुपयांपर्यंत घसरले होते. त्यामुळे किमान आधारभूत दराने हरभऱ्याची खरेदी करण्याची मागणी शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी केली होती.
मार्च अखेरीस किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) आणि एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांच्या वतीने रब्बी हंगाम २०२४-२५ मधील हरभरा हमीभावाने (प्रतिक्विंटल ५६५० रुपये) विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील १५ आणि हिंगोली जिल्ह्यातील १३ मिळून एकूण २८ खरेदी केंद्रांवर ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली.
त्यासाठी २५ एप्रिल अंतिम मुदत आहे. हमीभावाने हरभरा खरेदीचा कालावधी १ एप्रिल ते २९ जून २०२५ पर्यंत आहे. या दोन जिल्ह्यांत ७५१.३२ टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट आहे. परभणी जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी १० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून, ३८०.९६ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.
हिंगोली जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी १२.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून, ३७०.३६ टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही दिवसांत खुल्या बाजारातील हरभऱ्याचे दर हमीभावाच्या तुलनेत १५० रुपयांनी कमी-अधिक आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांवर नोंदणी करण्यास इच्छुक नाहीत. नोंदणी नसल्यामुळे हरभरा खरेदी होऊ शकली नाही सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.