
Pune News: कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या समोरील वातावरण बदलाचे परिणाम, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेचे पुण्यात उद्या (ता.९) आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असे कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन विनयकुमार आवटे यांनी सांगितले.
राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत राज्यातील कृषी विभागाचे सर्व कृषी संचालक, विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी ,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विकास अधिकारी (जि.प.), उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक , मंडळ कृषी अधिकारी तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात एक कृषी पर्यवेक्षक व एक कृषी सहाय्यक सहभागी होणार आहेत. जवळपास 2200 अधिकारी/ कर्मचारी सहभागी होणार आहेत.
सदर कार्यशाळा बुधवार (ता.९) बॅडमिंटन हॉल, शिवछत्रपती क्रीडा नगरी, बालेवाडी, म्हाळुंगे, पुणे येथे सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत पार पडणार आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे असणार आहेत. तसेच कृषीराज्यमंत्री आशिष जैस्वाल, प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सुरज मांढरे, प्रकल्प संचालक (पोकरा), प्रकल्प संचालक (स्मार्ट प्रकल्प), व्यवस्थापकीय संचालक (महाबीज), व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ) , व्यवस्थापकीय संचालक राष्ट्रीय फलोद्यान अभियान, महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद इत्यादी मान्यवर व अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या समोरील वातावरण बदलाचे परिणाम, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम करण्यावर भर राहणार आहे. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने विविध सत्रांमध्ये तज्ञ मार्गदर्शन करतील. यामध्ये डिजिटल मार्केटिंगचा कृषी क्षेत्रातील सहभाग, कृषी उत्पादन प्रक्रिया - संधी व आव्हाने, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, किडनाशक अवशेष मुक्त कृषी उत्पादने,
कृषी क्षेत्रातील भविष्यातील संधी व आव्हाने यांना सामोरे जाताना करावयाची तयारी, उत्कृष्ट काम करणारे कृषी अधिकारी कर्मचारी यांचे पॅनल डिस्कशन, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी घ्यावयाचे विविध उपक्रम व त्यात कृषी विभागाची भूमिका यासारखे महत्त्वाचे विषय समाविष्ट असतील. याशिवाय, राज्यभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या कृषी क्षेत्रातील अनुभवाबाबत मनोगत व चर्चा केली जाणार आहे.
कार्यशाळा कृषी अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असे कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन विनयकुमार आवटे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.