
Kalammawadi Dam Kolhapur : "काळम्मावाडी धरण गळतीप्रश्नी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहेत. यानंतर पुढील आठवड्यात धरण गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होईल", अशी माहिती राज्य शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक पी. एन. मुंढे यांनी मंगळवारी (ता.२४) दिली. पाच सदस्यीय तज्ज्ञ समितीने काळम्मावाडी धरणस्थळाला भेट देऊन, पुन्हा गळतीची पाहणी केली.
या समितीकडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी सक्षम स्तरावर पुन्हा गळतीची पाहणी करण्यात आली. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून नियोजन आखण्याचे निर्देश प्रशासकीय मान्यता अध्यादेशात देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही पाहणी झाली. समितीने धरणातील मुख्य भिंत आणि गॅलरीतून होणाऱ्या गळतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीपूर्वी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पोवार, स्मिता माने, उपअभियंता विजय राठोड यांच्याशी उपाययोजना कामांच्या अनुषंगाने सखोल चर्चा करून माहिती घेतली.
पी. एन. मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्याच्या गळतीमुळे धरणाच्या स्थैर्याला कोणताही धोका दिसून येत नाही. गळतीच्या प्रमाणात वाढ झालेली नाही. गळतीचे प्रमाण स्थिर आहे’, असेही अध्यक्ष मुंढे यांनी सांगितले. उपाययोजनेचे काम टप्प्याटप्प्याने दोन वर्षांत पूर्णत्वास जाईल. शेती, सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही, या दृष्टीने धरण पाणीसाठ्याचे नियोजन राहील. धरणातील अधिक पाण्यासाठीचा पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यास अडसर राहणार नाही. धरणातील पाणीसाठा आगामी काळात कमी होईल. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ग्राउंटिंग केले जाणार आहे". असे मुंढे म्हणाले.
मुंढे म्हणाले की, "समितीकडून लवकरच केलेल्या पाहणीचा अहवाल दिला जाणार आहे. अहवाल मिळेपर्यंत काम सुरू करण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. पुढील आठवड्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्यास हरकत नाही. या अनुषंगाने धरण व्यवस्थापन यंत्रणेला मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या आहेत". असे मुंढे यांनी सांगितले.
काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा
तज्ज्ञ समितीकडून पुन्हा धरण गळती पाहणी झाल्याने आता उपाययोजना काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपाययोजना सुरू असेपर्यंत, तज्ज्ञ समिती वेळोवेळी कामाची पाहणी करणार आहे. गळती प्रतिबंधक उपाययोजनेची प्रस्तावित कामे तांत्रिकदृष्ट्या अचूकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व सल्ला घेण्यासाठी तज्ज्ञ समिती असणार आहे.
यामध्ये टेमघर धरणाच्या धर्तीवर नियुक्त तज्ज्ञ समितीत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक पी. एन. मुंढे यांच्यासह, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, जलविज्ञान व धरण सुरक्षितता विभाग नाशिकचे मुख्य अभियंता एस. एस. पगार, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ ''इ''वर्ग-रिजवान अली, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना नाशिकचे अधीक्षक अभियंता आर. एस. मोरे यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.