Rural Women Empowerment : गावकुसात गायब असलेला महिला दिन

Rural Women Issue : शेतीच्या प्रश्‍नांमधून इतर अनेक उपप्रश्‍न उभे राहिले आहेत; जे समाजाचा समतोल बिघडवणारे आहेत. ग्रामीण भागात मुलांच्या लग्नांचा प्रश्‍न सध्या गंभीर बनला आहे. मुलांना मुली मिळत नसल्याची तक्रार सगळीकडे केली जाते.
Rural Women Life
Rural Women LifeAgrowon
Published on
Updated on

सोमनाथ कन्नर

नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन येऊन गेला. जगभरात महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले गेले. ८ मार्च १८५७ न्यू यॉर्कमध्ये महिलांचे तास कमी व्हावे म्हणून पहिला मोर्चा निघाला. नंतर १९०९ मध्ये सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका यांनी पुन्हा एक मोर्चा काढला. १९१० ला आंतरराष्ट्रीय महिला परिषद पार पडली. नंतर संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च १९७५ हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला. यामागचे मुख्य कारण हे महिलांचे कामाचे तास कमी व्हावे हे होते.

एकंदरीत संपूर्ण जगात १९६० च्या दशकापर्यंत महिलांना आणि इतरांना समानतेचे अधिकार नव्हते. ही महिला दिनाची पार्श्‍वभूमी आहे. हा दिवस आपल्याकडेही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजमाध्यमांवर महिलांविषयी भरभरून लिहलं गेलं. शहरांमध्ये उत्साहात साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाचा गावकुसात मात्र मागमूसही जाणवला नाही. खुरपं नेहमीप्रमाणं दुर्लक्षितच राहून गेलं.

वर्तमानपत्रात महिलांचे कर्तृत्व आणि प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘महिला विशेष’ पुरवण्या असतात. मी त्या पुरवण्या जरूर वाचतो. त्यात विशेषतः गोखले, परांजपे, जोशी, सहस्त्रबुद्धे, लिमये, जोशी आणि तत्सम बिरादरी असलेली आडनावे वाचायला मिळतात आणि पुढं कंसात अमेरिकेहून, कॅनडाहून, ऑस्ट्रेलियाहून अशा देशातील त्यांचा पत्ता दिलेला असतो. अशा पुरवण्या वाचताना माझं त्या अडनावांवर आणि देशांवर बारीक लक्ष असतं. का कुणास ठाऊक मला त्या नावांमध्ये गावकुसातलं एखादं वेगळं नाव अपेक्षित असतं. पण माझा नेहमीच हिरमोड होतो. गावकुसातल्या लेकीबाळीचं नाव त्यात छापून येईल त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय.

Rural Women Life
Women Diet : महिलांसाठी आरोग्यदायी आहाराचे नियोजन

महिला सक्षमीकरणाच्या बाता केवळ नागरी समूहापर्यंतच मर्यादित राहिल्याचं चित्र दिसतं. खेड्यापाड्यात बाई अजूनही तीन तीन कासरे लावून करकचून आवळून ठेवलीय. गावकुसातले पाटील अन् इतर बहुजन मात्र आपल्या उरल्या सुरल्या पाटीलक्या आणि गावक्या सांभाळण्याच्या नादात आपल्या बायांची कोंडी करत आले आहेत. मागासलेपणाचं खापर कायम इतरांच्या डोक्यावर फोडण्यापुरतेच मर्यादित राहिले. हे सरंजामवृत्तीच्या अंगी असलेल्या मूळ भित्र्या दांभिकपणाचं लक्षण आहे.

महात्मा फुले यांचं समग्र साहित्य आणि विचार वाचल्यास असं लक्षात येतं, की त्यांनी वरील आडनावे असलेल्या वर्गातील कर्मठ विचारांना लक्ष्य केलं होतं. त्यांचा विशिष्ट जातींना विरोध नव्हता. पण परिस्थितीचा विरोधाभास बघा, आज त्याच वर्गातील महिला शैक्षणिक क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.

याउलट महात्मा फुले आणि इतर समाजसुधारक ज्या कुणबी किंवा मागास समजल्या जाणाऱ्या समाजतील जनतेसाठी व एकंदरीत महिलांसाठी लढले त्या समाजांनी सर्व समाजसुधारकांना अठराव्या शतकातच ठेवलं. वरील नावांच्या तुलनेत बघितल्यास आज किती ग्रामीण भागातल्या स्त्रियांना मनसोक्त शिकवलं जात? किती ब्राह्मणेतर महिला आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात किंवा मोठ्या हुद्द्यावर आहेत? विचार केल्यास उत्तर फार नगण्य आकड्यांत येईल.\

अशिक्षित किंवा कमी शिक्षण झालेल्या आणि आजही चूल व मूल याच पठडीत जगणाऱ्या स्त्रिया महात्मा फुलेंच्याच वर्गसमूहाच्या आहेत. स्वतःचं मत नसलेल्या स्त्रियासुद्धा याच गावगाड्यातल्या आहेत. कमी वयात संसाराचे जू मानेवर घेणाऱ्या, देवधर्म करत अंधश्रद्धाळू बनलेल्या स्त्रियांची संख्या खेड्यापाड्यात कमी न होता अजून वाढत आहे. महात्मा फुले किंवा आधुनिकतावादी विचारांच्या एकदम विरुद्ध टोकाची परिस्थिती गावखेड्यात तयार होतेय.

खायची ददात असतानाही आम्हाला अंगी असलेली फालतू सरंजामवृत्ती सोडायची नाहीये. त्या सरंजामात महिलांना झाकोळून टाकलं, हे स्वीकारण्याइतके आम्ही अजूनही प्रामाणिक नाहीये. अंगभरून साडी, जोडवे, डोक्यावर पदर, खानदानपणा मिरविण्याची धडपड ही आजच्या ग्रामीण स्त्रीची एकंदरीत प्रतिमा आहे.

Rural Women Life
Hindu Women Rights : हिंदू महिलेचे वडिलोपार्जित मिळकतीमधील अधिकार आणि हिस्सा

बंदिस्त पशुपालनात जन्माला आलेल्या कालवडींना जसं गोठ्याबाहेर आपलं आयुष्य आहे ही जाणीवच नसते तशीच एकूण परिस्थिती आहे. पोरगी घराच्या आत वाढवली हे तिच्या श्रेष्ठत्वाचं मोजमाप आहे. पश्‍चिम महाष्ट्रातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राभर हेच वास्तव आहे. दहावी-बारावी झालेल्या कोवळ्या पोरी सर्रास लग्नाच्या बेडीत बांधल्या जातात. खेळण्याबागडण्याच्या, स्वतःला सिद्ध करण्याच्या वयात या पोरी सोनोग्राफी सेंटरवर वेटिंग रूमध्ये आक्रसून बसलेल्या दिसतात.

शहरांत पोरी वेगवेगळ्या फिल्डमध्ये करियर करतात. गावात मात्र शाळा जवळपास असली तरच रडत पडत पोरीला दहावी-बारावी शिकवेपर्यंत मजल मारतात. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी पोरगी ठेवण्याची हिंमत नाही. दावणीच्या गायी, बैलांवर जेवढा विश्‍वास दाखवण्याच्या बढाया मारल्या जातात, त्याच्या एक टक्काही विश्‍वास स्वतःच्या पोरींवर दाखवला जात नाही.

शेतकरी समस्या हा विषय एवढा मोठा आहे आणि तो इतका सातत्याने मांडला जातोय, की लोकांनी त्याचं गांभीर्य विसरून तो कधीही न सुटणारा प्रॉब्लेम म्हणून स्वीकारून टाकलाय. जसं की एखादा पाय गमावल्यानंतर ती व्यक्ती एका पायावर नशिबाला दोष लंगडत का होईना चालतच जाते. पण आता शेतीच्या प्रश्‍नांमधून इतर अनेक उपप्रश्‍न उभे राहिले आहेत; जे समाजाचा समतोल बिघडवणारे आहेत.

ग्रामीण भागात मुलांच्या लग्नांचा प्रश्‍न सध्या गंभीर बनला आहे. मुलांना मुली मिळत नसल्याची तक्रार सगळीकडे केली जाते. मुली शेतीत, गावात राहायला तयार नाहीत, असा एकंदर सूर दिसतो. यामागे मुख्यतः आर्थिक कारणं तर आहेतच, मात्र इतरही अदृश्य कारणं आहेत. ती फारशी चर्चिली जात नाहीत.

त्यातल सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याचं दडपण. गाव कितीही लहान असलं आणि विविधांगी असलं तरी ते एकमेकांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडलेलं असतं. प्रत्येक जण एकमेकांना एका विशिष्ट नात्याने बांधलेला असतो. ही नाती जपताना मोठी कसरत करावी लागते. त्यासाठीची सगळी उठाठेव बाईच्याच वाट्याला येते. हे सगळं प्रचंड थकवणारं असतं. पुरुष यात नामानिराळे असतात.

दिवसभर शेतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्टाचं काम केल्यावर घरी येऊन महिलांना पुन्हा सगळी कामं करावी लागतात. पुरुष तोपर्यंत पारावर गप्पा मारत बसतात. गावकुसातल्या बाईला अजून विद्रोह माहीत नसल्याने ती मुकाट हे सगळं सोसत असते. मोठमोठ्या घरांमध्ये स्त्रियांना घरंदाजपणा मिरविण्यासाठी घरातच खितपत पडावं लागतं.

गावात आलेल्या भौतिक सुविधा एकप्रकारे महिलांसाठी वरदान ठरल्या असल्या तरी दुसरीकडे एकांतवास वाढविणाऱ्या आहेत. पूर्वी घरात शौचालयं नव्हते. घरी धुणं धुण्यासाठी पाणी नव्हतं, तेव्हा गावातल्या स्त्रिया एकमेकींना पाणवठ्यावर, नदीवर भेटत. एकमकींसोबत आपल्या भावना शेअर करत. आता मात्र ते सगळं इतिहासजमा झालं. बाईची कुचंबणा जेवढी गाव करतं त्या तुलनेत शहरात तसंच चित्र दिसत नाही. म्हणून पोरींना गाव नकोसं वाटतंय. या परिस्थीवर सध्या कुणालाच काहीही उपाय सुचत नाही. अर्थात काळ आपल्या सोयीनुसार सगळं बरोबर करतोय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com