Women In Agriculture : महिलांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्याने शेतीत अनेक संकटे

Women Farmer : महिलांबाबत ज्या प्रमाणे समाज, धर्म, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भेदभाव, दुजाभाव केला जातो तसाच तो शेती क्षेत्रातही केला जातो.
P. Sainath
P. Sainath Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘महिलांबाबत ज्या प्रमाणे समाज, धर्म, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भेदभाव, दुजाभाव केला जातो तसाच तो शेती क्षेत्रातही केला जातो. त्यामुळे आज शेतीक्षेत्रात राबणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांइतकीच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक असूनही अद्याप त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळू शकलेली नाही, हे वास्तव आहे.

त्यांची ओळख शेतकरी महिला अशी न होता शेतकऱ्याची मुलगी, पत्नी अशी होते आणि तेच आज शेतीपुढे असलेल्या अनेक संकटांचे प्रमुख कारण आहे,’’ असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियाचे संस्थापक पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.

महिला किसान अधिकार मंचातर्फे (मकाम) आयोजित ‘भविष्य पेरणाऱ्या’ या संकल्पनेवरील महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित बहुविध माध्यम प्रदर्शनात रविवारी (ता. २३) ‘महिला, शेती आणि काम’ या विषयावर पी. साईनाथ बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या प्रदर्शनात शनिवारी (ता. २२) प्रकाशित करण्यात आलेले ‘पुष्कळा’ हे पुस्तक आणि महिला शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले धान्य देऊन पी. साईनाथ यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी पी. साईनाथ यांनी जगभरातील शेतीक्षेत्रातील महिलांच्या स्थितीवर भाष्य केले. ‘‘जगभरात कृषी क्षेत्रापुढे अनेक संकटे आहेत. त्याची अनेक कारणे आहेत मात्र त्यातही प्रमुख कारण म्हणजे शेतकरी म्हणून महिलांना अद्याप मान्यता नसणे हे आहे.

आज शेतीबरोबरच पूरक व्यवसायांमध्येही जसे की दुग्धोत्पादन, पशुपालन, मधुमक्षिकापालन अशा अनेक व्यवसायांत महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काम करत असूनही त्यांच्याबाबतीत दुजाभाव, भेदभाव केला जातो.

शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्येही पुरुष शेतकऱ्यांप्रमाणेच महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उदाहरणेही आहेत. परंतु, त्यांच्या आत्महत्या या शेतकरी आत्महत्या म्हणून गणल्या जात नाहीत तर त्यांची महिला आत्महत्या म्हणून नोंद केली जाते. पुरुष शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या तुलनेत महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी असले तरी त्या होतात हे वास्तव आहे. गेल्या २४ वर्षांत मी शेतकरी आत्महत्याग्रस्त ९०० कुटुंबांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली अनेक कुटुंबे आहेत.

आज शेतीसाठी आणि घर चालवण्यासाठी पाणी सगळ्यात महत्त्वाचे आहे. आज आपल्या देशात, राज्यात अनेक ठिकाणी महिलांना लांबवरून पाणी डोक्यावर वाहून आणावे लागते. झारखंड राज्य किंवा आपल्याकडे पालघर यासारख्या ठिकाणी महिलांमध्ये पाणी वाहून आणण्याची क्षमता लग्न जुळवण्यासाठी पाहिली जाते.

शेतीत पुरुषांपेक्षा महिला अधिक कष्ट करत असतानाही त्यांना कामाचे दाम दिले जात नाही. त्यांना शेतकरी म्हणून ओळखही मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून, महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचा हक्क, अधिकार मिळण्याबरोबरच त्यांना सन्मान मिळाला पाहिजे,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

P. Sainath
Women In Agriculture : कृषी क्षेत्रात महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा

‘‘महिलांना शेतकरी म्हणून मान्यता मिळण्यासाठी आणि पर्यायाने शेतीपुढील संकटांचे निराकरण करायचे असेल तर त्यासाठी महिलांना शेतीमध्ये समान वागणूक, समान काम, समान वेतन याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सातबारावर पुरुषांबरोबरच महिलेचे नावही लावले गेले पाहिजे. यासाठी तसा कायदा करण्याची गरज असून तो व्हावा यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे.

P. Sainath
Women in Agriculture: भविष्य पेरणाऱ्या स्त्रीशक्तीचा संघर्षमय आविष्कार!

महिला शेतकऱ्यांना, बचत गटांना बँकांनी कमी व्याजाने कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. स्थानिक बीज संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात,’’ अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीला ‘मकाम’च्या विद्या कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी त्यांनी या प्रदर्शनामागील भूमिका आणि मकामच्या वाटचालीचा आढावा घेतला. सीमा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

‘लाडकी बहीण’साठी तरतूद कुठून?

या वेळी पी. साईनाथ यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध नाही. महिलांना जर दरमहा पैसे मिळत असतील तर काहीच हरकत नाही. त्यांना उलट अधिक पैसे मिळावेत असे वाटते. पण या योजनेसाठी जी तरतूद केली जात आहे ती कुठून केली जात आहे, तर ती तरतूद मनरेगा, बालविकास, पोषण आहार, अंगणवाडी या योजनांच्या तरतुदींना कात्री लावून ‘लाडकी बहीण’साठी वळविली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com