भीम रासकर, प्रशांत पवार
Village Level Women Leadership : महाराष्ट्र हा हवामान बदलांच्या परिणामांसाठी अत्यंत ‘असुरक्षित’ असलेल्या पाच राज्यांपैकी एक आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आणि चक्रीवादळे यांसारख्या तीव्र हवामानाच्या घटना वारंवार घडत असतात. राज्यातील एकूण जमिनीपैकी सुमारे १२ टक्के जमीन ही पूर आणि नदी प्रवाहामुळे होणाऱ्या झिजेच्या धोक्यात येते. ७२० कि.मी. लांब असलेल्या सलग किनाऱ्यामुळे राज्य चक्रीवादळे आणि संभाव्य सुनामींच्याही धोक्यात आहे. सुमारे ६८ टक्के शेतीयोग्य जमीन ही दुष्काळग्रस्त आहे, तर डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडतात.
हवामान बदल आणि त्याचे संलग्न परिणाम यांचा राज्यातील वंचित आणि दुर्बल समुदायांवर, विशेषतः महिलांवर विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांमुळे असमान प्रभाव पडतो. घरातील पाणीसाठा, अन्न, आणि ऊर्जा साधनांचे व्यवस्थापन करण्याची प्राथमिक जबाबदारी स्त्रियांवरच असल्यामुळे त्यांनाच पाणीटंचाई, शेतीतील नुकसान अशा हवामान बदलांच्या आव्हानांना आणि दुष्काळ व पुरासारख्या प्रतिकूल नैसर्गिक घटनांना सामोरं जावं लागतं.
ग्रामीण भागात, त्यांना घटत्या स्थानिक नैसर्गिक स्रोतांमुळे, पाणी आणि जळाऊ इंधन आणण्यासाठी दूरवर चालत जावं लागतं, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक ताणात वाढ होते. स्त्रियांना नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्रदूषित पाणी तसेच अस्वच्छतेमुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात, शेतीवर त्यांची आर्थिक स्थिती अवलंबून असल्यामुळे व हवामान बदलांमुळे शेतीची दुरवस्था होऊन त्यांच्या उत्पन्नातही घट होऊ शकते.
याशिवाय, पारंपरिक नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनाची माहिती असलेल्या आदिवासी महिलांचा समुदायाच्या स्थिरतेमध्ये महत्त्वाचा वाटा असतो, परंतु स्त्री-पुरुष असमानतेमुळे (Climate & Gender) निर्णय प्रक्रिया आणि साधनसंपत्तीत त्यांना अधिकार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील हवामान बदलांची तीव्रता अधिक वाढते. एकंदरीतच, अनेक शोधअभ्यास तसेच प्रत्यक्ष जमिनीवरील अनुभवांच्या नोंदींमधून हे सिद्ध झाले आहे, की हवामान बदलांमुळे समाजातील लिंग असमानता (Climate & Gender) अधिक तीव्र होते आणि आर्थिक संकट, रोजगार कमतरता, कौटुंबिक हिंसाचार, अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित महिला समस्या वाढतात.
तत्काळ काम करण्याची गरज
महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, राजकारण, आणि संस्कृती यांच्या आधारे, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असे पाच मुख्य विभाग पडतात. या पाचही विभागांमध्ये विविध असुरक्षित समुदाय आणि विशेषतः स्त्रिया आहेत ज्यांचं जगणं आणि उपजीविका हवामान बदलांच्या संकटाने गंभीरपणे प्रभावित झाली आहे. याचा एक आढावा येथे दिला आहे.
मराठवाडा
मराठवाडा, विशेषतः बीड, लातूर, आणि धाराशिव हे तीन जिल्हे, वारंवार येणाऱ्या दुष्काळांनी गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. या भागात अनियमित आणि अपुरा पाऊस पडतो, ज्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी होते व शेवटी शेती धोक्यात येते. याचा अल्पभूधारक तसेच परिघावरील स्त्री शेतकऱ्यांवर मोठा ताण पडतो. पाण्यासाठी त्यांना अनेकदा लांबदूर वणवण भटकावं लागतं, तसेच शेतीचं उत्पन्न जगण्यासाठी पुरेसं नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी स्थलांतरही करावं लागतं.
त्यांना कठीण परिस्थितीत काम करावं लागतं आणि उपजीविकेसाठी ते पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड कामगार म्हणून काम करतात किंवा जवळच्या गावात अथवा शहरांमध्ये असंघटित मजूर म्हणून राबतात. गरिबीमुळे त्यांचं लहान वयातच लग्न लावून देण्यात येतं आणि बाळंतपणातही कामातून त्यांना सुट्टी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रजननात्मक आरोग्यावर तसेच एकूण राहणीमानावर विपरीत परिणाम होत आहेत.
'विदर्भ
विदर्भात चंद्रपूरसारख्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जात असते. मराठवाड्यासारखाच, विदर्भही दुष्काळग्रस्त भाग आहे, विशेषतः इथले यवतमाळ आणि अमरावती जिल्हे. पावसाची कायम असणारी अनिश्चितता आणि वाढतं तापमान यांचा शेतमजूर स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्याचबरोबर विदर्भातील शेतकरी आत्महत्यांनी ग्रासलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या बायका विधवा होतात, कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर येतो. मर्यादित साधनसामग्रीत कोणाच्याही पाठिंब्याशिवाय त्यांना शेती करणं भाग पडतं.
कोळसा खदानी आणि औष्णिक विद्युत संयंत्रांमुळे चंद्रपूरच्या अवतीभवतीचं पर्यावरण नष्ट होत चाललंय आणि त्यामुळे तिथले स्थानिक समुदाय विस्थापित होत आहेत. अशा जबरदस्तीच्या स्थलांतरामुळे इथल्या स्त्रियांवर विषम परिणाम होतोय, ज्यांचे नवरे कामासाठी बाहेर गेल्यामुळे शेती आणि घराची सारी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश हा तिथल्या आदिवासींच्या कुपोषणाच्या जुनाट प्रश्नामुळे कुप्रसिद्ध आहे.
हा वनसंपन्न आणि डोंगराळ भाग अनेक आदिवासी समुदायांचं आश्रयस्थान आहे, ज्यामध्ये कोरकू आदिवासीही आहेत, जे त्यांच्या उपजीविकेसाठी शेती, वनोत्पादन आणि लघू उद्योगांवर अवलंबून असतात. मुख्यतः शेती, वनोत्पादन, आणि लघुउद्योगावर आधारित उपजीविका करतात. या भागात अन्न असुरक्षितता आणि स्त्रियांमधील पोषणमूल्यांची उणीव यामुळे इथे बाल कुपोषण आणि बालमृत्यू दरही मोठा आहे.
कोकण
कोकण विभागाला लांब किनारपट्टी लाभली आहे पण इथेही समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, किनाऱ्यांची धूप आणि वाढत्या तापमानामुळे माशांच्या विविध प्रजाती नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. चक्रीवादळासारखे तीव्र वातावरणीय बदल आणि मासळी उत्पादनात येणारी घट यांचा कोळी समुदायातील स्त्रियांवर थेट परिणाम घडतोय ज्यांची मासळी प्रक्रिया आणि विक्री यात महत्त्वाची भूमिका असते. त्याचप्रमाणे, रायगड जिल्ह्यांत आदिवासी स्त्रिया सामूहिक जंगल, तळी, व नद्या यांचं संरक्षण आणि संवर्धन करीत आहेत, जे बदलते हवामान आणि जलद विकासामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत. त्यांची पारंपरिक उपजीविका धोक्यात आल्यामुळे त्यांना दरवर्षी संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी अनौपचारिक व असुरक्षित व्यवसाय करावे लागत आहेत.
उत्तर महाराष्ट्र
नंदूरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये स्त्रियांना जळाऊ इंधन, अन्नधान्य आणि औषधी वनस्पती यांसाठी जंगलावर अवलंबून राहावं लागतं. मात्र हवामान बदल तसेच अवैध वनतोड आणि जंगल जमिनीवरील अतिक्रमण यामुळे इथली जैवविविधता धोक्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात, मोठ्या प्रमाणात स्त्रिया भूमिहीन मजूर म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीच्या लहानशा तुकड्यावर काम करताना आढळतात. सातारा, सांगली आणि सोलापूरचा भाग जो माणदेश म्हणून ओळखला जातो, तो कोरड्या आणि शुष्क भूभागासाठी प्रसिद्ध आहे. दुष्काळी स्थितीत इथल्या स्त्रियांना आपलं कुटुंब आणि जनावरांसोबत कामाच्या शोधात अनेकदा अन्य ठिकाणी स्थलांतर करावं लागतं.
त्यांना बहुतांश वेळा अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत राहावं लागतं आणि हिंसाचारालाही त्या बळी पडतात. क्षारपड जमीन आणि वाटणीत मिळालेली तुकडाभर शेती यामुळे इथल्या शेतकऱ्यांना लहानशा जमिनीवरच शेती करावी लागते. यामुळे त्यांच्यावर आणि स्त्रियांवर शहराकडे स्थलांतर करण्याची वेळ येते जिथे या स्त्रिया बाजारात, छोट्या फॅक्टऱ्यांमध्ये आणि अन्य लहान-सहान व्यवसायात कामं करतात ज्यात त्यांना कामाची कोणतीही शाश्वती नसते, पण त्यांच्या आरोग्याला मात्र सतत धोका असतो.
(लेखक भीम रासकर हे ‘आरएससीडी’चे संचालक, तर प्रशांत पवार हे ‘बाईमाणूस’चे संचालक आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.