Agricultural Commodity Market : शेतकऱ्यांना ‘ला-नीना’चा दिलासा मिळणार?

La Nina Effect : एकीकडे दुष्काळाच्या झळा वाढत असताना दुसरीकडे घाऊक कृषिमाल बाजारपेठेत मरगळ आणि बऱ्यापैकी मंदी असे चित्र असल्यामुळे उत्पादकवर्ग अस्वस्थ आहे.
soybean
soybeanAgrowon

श्रीकांत कुवळेकर

Agriculture Market : एकीकडे दुष्काळाच्या झळा वाढत असताना दुसरीकडे घाऊक कृषिमाल बाजारपेठेत मरगळ आणि बऱ्यापैकी मंदी असे चित्र असल्यामुळे उत्पादकवर्ग अस्वस्थ आहे. किरकोळ महागाईदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वारंवार बदलत असणारी सरकारी धोरणे शेतकऱ्याला मारक ठरत आहेत. अशा वेळी उत्पादकवर्गाला दिलासा देणारी एक बातमी मागील आठवड्यात आली.

ती म्हणजे ‘एल-निनो’चा कमी होणारा प्रभाव आणि जूननंतर ‘ला-नीना’ प्रभावी होण्याची वाढती शक्यता. हवामानात होऊ घातलेल्या या बदलामुळे चांगल्या पाऊसपाण्याची अपेक्षा धरता येईल. अर्थात, फेब्रुवारीमध्ये एवढ्या दूरवरचे अंदाज व्यक्त करणे थोडे धाडसाचे आहे. विशेषतः ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात हवामान बदल एवढे वेगाने होत असताना पाच-सहा महिन्यांनंतरचे अंदाज कितपत अचूक ठरतील हे येणारा काळच ठरवेल.

एकीकडे दुष्काळाच्या झळा वाढत असताना दुसरीकडे घाऊक कृषिमाल बाजारपेठेत मरगळ आणि बऱ्यापैकी मंदी असे चित्र असल्यामुळे उत्पादकवर्ग अस्वस्थ आहे. किरकोळ महागाईदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वारंवार बदलत असणारी सरकारी धोरणे शेतकऱ्याला मारक ठरत आहेत. अशा वेळी उत्पादकवर्गाला दिलासा देणारी एक बातमी मागील आठवड्यात आली. ती म्हणजे एल-निनोचा कमी होणारा प्रभाव आणि जूननंतर ला-नीना प्रभावी होण्याची वाढती शक्यता. हवामानात होऊ घातलेल्या या बदलामुळे चांगल्या पाऊसपाण्याची अपेक्षा धरता येईल. अर्थात, फेब्रुवारीमध्ये एवढ्या दूरवरचे अंदाज व्यक्त करणे थोडे धाडसाचे आहे. विशेषतः ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात हवामान बदल एवढे वेगाने होत असताना पाच-सहा महिन्यांनंतरचे अंदाज कितपत अचूक ठरतील हे येणारा काळच ठरवेल. त्यापूर्वी कृषिमाल बाजारपेठ कशी राहील ते पाहूया.

soybean
Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, नोंदणी करण्यास दिली मुदतवाढ

सोयाबीन घसरण कुठपर्यंत?

मागील आठवड्यात आपण सोयाबीन बाजारात आलेल्या घसरणीबाबत चर्चा केली होती. प्रत्यक्ष घसरण एवढी वाढली की किमती हमीभावाच्या १० टक्के खाली म्हणजे ४१००-४२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आलेल्या दिसून आल्या. शेवटच्या टप्प्यातील घसरण तीव्र आणि थोडीशी अतिमंदी या प्रकारातील होती. अनेकदा अशी घसरण बहुधा शेवटच्या टप्प्यातील असते आणि तिचे कारण हे ‘पॅनिक सेलिंग’ म्हणजे बाजारात घबराट पसरल्यामुळे होते.

बाजारातील या मंदीमागील कारणांचा शोध घेतला, तर असे दिसून येईल, की जागतिक बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेल यामध्ये आलेली मोठी घसरण, मलेशियामधील पाम तेल वायदे बाजारातील घसरण आणि स्थानिक बाजारपेठेत देखील सोयाबीनचा मुबलक पुरवठा या गोष्टींचा बाजारावर विपरीत परिणाम झाला होता. मागील आठवड्यात अमेरिकेत सोयाबीन १२ डॉलर खाली म्हणजे तीन वर्षांतील किमान पातळीवर आले आहे. तर सोयापेंड देखील चार-सहा आठवड्यात सुमारे १०० डॉलर प्रति टन घसरली आहे. त्यामुळे येथील सोयापेंड निर्यातीवर दबाव येण्याच्या अनुमानानुसार सोयाबीन घसरण वाढली. या घसरणीला पूरक म्हणता येईल अशी माहिती (डेटा) गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकी कृषी खात्याच्या (यूएसडीए) मासिक अहवालात दिसून आली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या जागतिक कृषिमाल मागणी-पुरवठा अहवालात यूएसडीएने अमेरिकेतील सोयाबीन क्रशिंगचे अनुमान घटवले आहे. तसेच निर्यात अनुमान कमी, वर्षारंभीच्या साठ्यात वाढ आणि वर्षअखेरच्या शिल्लक साठ्यात देखील वाढ दर्शवली आहे. यामुळे मंदीला हातभार लागत आहे. सोयाबीन आणि सोयातेलाच्या २०२३-२४ वर्षासाठी सरासरी किमतीत देखील घट करण्यात आली आहे. अमेरिका खंडातील घटत्या सोयाबीन उत्पादनामुळे तीन वर्षांपूर्वी ६ डॉलरवरून सुरू झालेल्या विक्रमी तेजीला या वर्षी वाढलेल्या उत्पादनामुळे लगाम बसला आहे. त्याचे अप्रत्यक्ष परिणाम इथेही जाणवत आहेत.

स्थानिक बाजारपेठेत येऊ घातलेल्या विक्रमी मोहरी पिकाचा अतिरिक्त दबाव सोयाबीनवर पडल्याने सोयाबीन अधिक घसरले आहे. बाजारात नेहमीच नजीकच्या काळातील सर्व घटक आधीच किंमत रूपात प्रतिबिंबित झालेले असतात. हा जर नियम असेल तर येत्या काळातील वरील सर्व मंदीपूरक घटकांचा प्रभाव बाजारपेठेतील सध्याच्या किमतीमध्ये अंतर्भूत आहे. आणि असे असेल तर सोयाबीन किमतीने ४०००-४१०० रुपये प्रति क्विंटल या किमतीला तळ गाठून झाला असेही म्हणता येईल.

soybean
Agriculture Commodity Market : शेतकरी होत आहेत बाजारसाक्षर

हमीभाव, ‘ला-नीना’चा परिणाम

पुढील काळात किमतीला आधार देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार करूया. एप्रिलअखेर सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे त्यांची घोषणा पुढील महिनाभरात होऊ शकेल. म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारच्या हातात एक महिना आहे असे म्हणता येईल. यामध्ये सोयापेंड निर्यातीवर अनुदान आणि खाद्यतेल आयातीवर मोठी शुल्कवाढ या दोन गोष्टी केल्या जाऊ शकतात. खाद्यमहागाई होऊ न देण्याचा चंग बांधला असल्याने दुसरा निर्णय होणे कठीण आहे. परंतु सोयापेंड निर्यातीवर अनुदान दिल्यास सोयाबीन किमतीत थोडी सुधारणा होऊ शकेल. निवडणुका झाल्यावर लगेच खरीप पेरणी हंगाम जवळ येत असल्याने हमीभाव घोषित करावा लागेल. येत्या हंगामासाठी हा भाव ४९०० ते ५००० रुपये होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश कृषिमूल्य आयोगाने तशी मागणी केली असून, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या मागण्या अनुक्रमे ६००० रुपये आणि ६९०० रुपये असल्या तरी नेहमीच मध्य प्रदेशने केलेली शिफारस मान्य केली जाते असे दिसून आले आहे.

तसेच वर म्हटल्याप्रमाणे जर ला-नीना प्रभावी होणार असेल तर परत एकदा अमेरिका खंडात दुष्काळाची शक्यता निर्माण होऊन सोयाबीन उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे पुढील हंगामात सोयाबीन आणि अगदी कापूससुद्धा चांगली सुधारणा दाखवेल. मागील तीन वर्षे सोयाबीन तेजीत राहण्याचे मुख्य कारण ला-नीना हेच होते, हे या ठिकाणी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल. परंतु या मध्यम ते दीर्घ कालावधीच्या गोष्टी असून, त्यात जर-तरच्या शक्यता राहतील. वरील सर्व घटकांची गोळाबेरीज करता दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे सोयाबीनचा तळ गाठला गेला आहे आणि दुसरी म्हणजे किमतीत सुधारणा झाली तरी जर धोरणात्मक निर्णय घेतला गेला नाही तर निवडणुकीपर्यंत तरी हमीभावाचा मोठा अडथळा सोयाबीनला राहील.

मका आयात

या स्तंभातून मागील काही महिन्यांत अनेकदा मक्याबद्दल चर्चा केली असून, २०२४ मध्ये सतत दुसऱ्या वर्षी मका किमतीचा नवीन विक्रम करेल असा अंदाज व्यक्त केला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच मका प्रति क्विंटल २४५० रुपयापर्यंत विकला गेला आणि विक्रमाच्या थोडाच अगोदर थोडा नरम झाला आहे. बिहार आणि इतर राज्यांत रब्बी मक्याचे पीक बहारदार येणार असल्याने किमती थोड्या नरम झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पोल्ट्री उद्योगाची मका आयातीची मागणी तसेच अलीकडील काही दिवसांत युक्रेनमधून प्रत्येकी ७०,००० टन मका असलेली दोन जहाजे भारताच्या वाटेवर असल्याची बातमी या दोन गोष्टींमुळे देखील किमतीवर दबाव जाणवतोय. ही आयात मूल्यवर्धित निर्यातीसाठी असावी असा कयास असून लवकरच याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध होईल. परंतु सेंटिमेंट बिघडल्याने किमती थोड्या कमी झाल्या असाव्या. अर्थात, इथेनॉल निर्मितीसाठी केंद्राची कटिबद्धता विचारात घेता यापूर्वी मक्याबाबत बांधलेले आडाखे अजूनही अबाधित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com