Wildlife Conflict: वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मान फासात

Farmer Crisis: वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान तर होतंच शिवाय अनेकदा ते जिवावरही बेततंय. या समस्यांपुढे शेतकरी हतबल झाला आहे. मराठवाड्यात हरिण, रानडुक्कर, सायाळ या प्राण्यांचा व मोरांचाही मोठा त्रास आहे. विदर्भात यात नीलगायीची भर पडते. तर कोकणात माकडांनी शेतकऱ्यांची झोप उडवलीय.
Wildlife Issue
Wildlife IssueAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture: वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान तर होतंच शिवाय अनेकदा ते जिवावरही बेततंय. या समस्यांपुढे शेतकरी हतबल झाला आहे. मराठवाड्यात हरिण, रानडुक्कर, सायाळ या प्राण्यांचा व मोरांचाही मोठा त्रास आहे. विदर्भात यात नीलगायीची भर पडते. तर कोकणात माकडांनी शेतकऱ्यांची झोप उडवलीय. वन्य प्राण्यांची ही संख्या अफाट वाढण्याला वन्यजीव संरक्षण कायदा कारणीभूत आहे. वन्य प्राणी संपवायला पाहिजेत, असं मी कधीच म्हणणार नाही. कुठलीही टोकाची भूमिका नुकसानकारक ठरते. त्यांचा शेतीला होणारा त्रास कसा कमी करायचा, हा कळीचा प्रश्‍न आहे. जीव म्हणून दोन्हीही महत्त्वाचे आहेत. पण माणूस की प्राणी, असा प्रश्‍न निर्माण होतो तेव्हा नाइलाजाने का होईना प्राधान्यक्रम माणसालाच द्यावा लागेल.

मी आनंददायी शेतीची कल्पना मांडतो तेव्हा मला शेतीचं नुकसान करणारे वन्य प्राणी हा या आनंदात मोठा अडथळा वाटतो. आनंददायी शेती करणारा माझ्यासारखा एक वेळ याच्याकडं दुर्लक्ष करेल पण ज्यांचं पोट शेतीवर अवलंबून आहे, जे व्यावसायिक शेती करतात, त्यांच्यासाठी हे गंभीर संकट आहे. जेव्हा केव्हा शेतीची सुरुवात झाली, तेव्हापासून हा त्रास असणारच, हे उघड आहे. त्या त्या वेळी त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त केला असणार. मी बालपणापासून काही वन्य प्राण्यांकडून होणारं शेतीतील पिकांचं नुकसान बघत आलोय. ही काही आता अचानक उद्‍भविलेली समस्या नाही. मात्र सध्या या समस्येने गंभीर स्वरूप धारण केलंय.

या समस्येमुळे शेतीचं नुकसान तर होतंच शिवाय अनेकदा ते जिवावरही बेततंय. या समस्यांपुढे शेतकरी हतबल बनल्याने, याचा साकल्याने विचार करून सरकार आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे या प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे. मराठवाड्यात हरिण, रानडुक्कर, सायाळ या प्राण्यांचा व मोरांचाही मोठा त्रास आहे. विदर्भात यात नीलगायीची भर पडते. तर कोकणात माकडांनी शेतकऱ्यांची झोप उडवलीय.

Wildlife Issue
Wild Elephant Attack : कोलझरमध्ये हत्तींकडून नारळ, सुपारी पिकांचे नुकसान

सायाळने केले घायाळ

सायाळ हा प्राणी माळ, डोंगर भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. हा दुर्मीळ प्राणी मानला जातो. त्याला मारणे कायद्याने गुन्हा आहे. तो हाती सापडत नाही, हा वेगळाच विषय. गेल्या सात-आठ वर्षांत सायाळने मला भरपूर त्रास आणि मनस्ताप दिलाय. उंदीर प्रजातीतील या प्राण्याला कडुलिंबाच्या मुळा सर्वाधिक आवडतात. मी शेतातील बंधाऱ्यावर ही रोपं लावून त्याची जोपासना सुरू केली. सहा वर्षांत किमान दीड-दोनशे कडुनिंबाची झाडं सायाळने संपवली. पाच-सहा फूट उंचीच्या झाडांची मुळं खाल्याने ती आडवी झाली. एवढेच नाही तर बागेतील पाच-सहा नारळाच्या झाडांची खोडं सायाळने कातरली. त्यातलं एक झाड थोडक्यात बचावलं. सायाळचा त्रास थांबविण्यासाठी झाडांच्या बुडाला पेंट लावणे, थायमेट टाकणे, केस टाकणे, बुजगावणे उभारणे असे अनेक प्रयोग केले. यापैकी कशाचाही उपयोग झाला नाही.

सायाळला मारण्यासाठी अघोरी उपाय करता येत नाहीत. कारण त्याला मारणे कायद्याने गुन्हा आहे. शेतकऱ्यांना तुरुंगात घालण्यासाठी सगळे टपूनच बसलेत. यासंदर्भात समाजमाध्यमांवर मी अनेकदा लिहिलं, पण या समस्येवरचं नेमकं उत्तर कोणालाही देता आलं नाही. हा संरक्षित प्राणी नसता तर याचा बंदोबस्त आणखी वेगळ्या पद्धतीने करणं शक्य झालं असतं.

रानडुकरांचा हैदोस

रानडुक्कर ही जवळपास सगळ्या भागातील समस्या आहे. हा प्राणीही कायद्याने संरक्षित आहे. डुकरांचा एक कळप एखाद्या पिकात शिरला, की त्या पिकाचं काही खरं राहात नाही. डुकरं पीक खाण्यापेक्षाही नुकसान मोठ्या प्रमाणात करतात. अख्खं वावरच्या वावर उकरतात. शेंगा, हरभरा, मका, ऊस ही त्याची आवडती पिकं आहेत. पेरणी केल्यावर त्यांना कोठून कसा वास येतो ते कळत नाही. पण त्याच रात्री डुकरं ते बियाणं उकरून खातात. ऊस हे त्यांचं राहण्याचं ठिकाण असतं. एखादं डुक्कर किंवा कळप उसात आत शिरला, तर महिनोन्महिने ते तिथून तळ हलवत नाहीत.

जिथं सलग उसाचं क्षेत्र आहे, त्या भागातून डुकरांना हाकलणं शेतकऱ्यांच्या क्षमतेबाहेर गेलंय. मराठवाड्यातील काही भागात गावातील पाळीव डुकरं शेतात जाऊन जणू रानडुक्कर बनल्यासारखे प्रकार आढळतात. कुत्रे पण यांच्या वाटेला जात नाहीत. आपल्याकडं कोणी येतंय असं रानडुकराला वाटलं, की आक्रमकपणे ते अंगावर चाल करून येतं. त्याची धडक भयंकर असते. शिवाय ते चावतेही. डुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. रानडुकरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी सांगितले जाणारे ‘बंधाऱ्यावर केस टाकणे, साड्या बांधणे, छोटे रेकॉर्डर लावणे वगैरे’ उपाय अर्धवट, अव्यवहार्य आहेत. हा काही कोण्या एका शेतकऱ्याचा प्रश्‍न नाही. एकाने प्रयत्नपूर्वक डुकरांना हाकललं तर ते शेजारच्या शेतात जाऊन पिकाची नासधूस करणार. म्हणजेच डुक्कर कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान करणारच.

रानडुकरांची अफाट वाढलेली संख्या ही खरी समस्या आहे. मूठभर शेतकऱ्यांनी काहीबाही उपाय करून त्यांना पळवून लावणे हा उपाय होऊ शकत नाही. यावर व्यापक उपाय योजण्याची गरज आहे. सध्या सेंद्रिय शेतीचा मोठा बोलबाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी म्हणून अनुदानरूपी आमिष दाखवत आहेत. मी काही सेंद्रिय शेतीचा विरोधक नाही. कुठल्या तंत्राने शेती करायची, हा सर्वस्वी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा, निवडीचा विषय आहे. त्यांच्यावर विशिष्ट तंत्रानेच शेती करावी, असा दबाव आणता येणार नाही आणि तशी जबरदस्ती होत असेल तर शेतकऱ्यांनी ती उधळून लावावी, असं माझं मत आहे. सेंद्रिय शेतीत शेणखत, गांडूळ खत आलंच. या शेतीत मोठ्या प्रमाणात गांडूळ (गेचवे) तयार होतात. हे गांडूळ डुकरांचं सर्वांत आवडतं खाद्य आहे. हे गेचवे खाण्यासाठी पिकांच्या, झाडांच्या खाली ते कितीही रान उकरतात. त्याचा बंदोबस्त कसा करायचा? याचं साधं उत्तर आहे, सेंद्रिय शेती सुरू करण्याआधी या रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायला हवा. तो कसा करणार? याचं उत्तर नसेल तर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला देणं, आग्रह धरणं म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक संकटात टाकण्यासारखं आहे.

हरणांचा उपद्रव

मी बालपणापासून शेतीत हरिण बघत आलोय. तेव्हा त्यांची शिकारही केली जायची. संख्या मर्यादित असल्याने नुकसानही किरकोळ असायचं. त्यामुळं तेव्हा हरिण हे शेतीसमोरचं संकट वाटत नव्हतं. मात्र हरणांच्या हत्येवर बंदी आल्यानंतर ही संख्या वाढतच गेली. सध्या ५०-६०-१०० पर्यंत हरणांचे कळप झाले आहेत. हे कळप शेतीत शिरतात तेव्हा समोरची पिकं फस्त करतात. शेतकरी आपापल्या परीने त्यांना हाकलतात. एका शेतातून दुसऱ्या शेतात त्यांना हुसकावणं हा पर्याय नाही. ज्या शेतात कोणी माणूस नाही, तिथं ते मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कायद्याच्या भीतीमुळं त्यांना मारण्याची हिंमत कोणीच करीत नाही. हरणांपासून पिकाचं नुकसान टाळणं, ही शेतकऱ्यांच्या कुवतीबाहेरची बाब बनली आहे. या समस्येचं व्यावहारिक उत्तर शोधणं गरजेचं आहे.

नीलगाई, माकडे, मोरांचा उच्छाद

विदर्भात नीलगाईंची समस्या आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा, याचंही उत्तर कोणाकडं नाही. कोकणात माकड, वानरांचा उपद्रव अफाट आहे. ती कुठल्याच फळझाडांची फळं येऊ देत नाहीत. खाण्यापेक्षा विध्वंस अधिक करतात. या उपद्रवाला व नुकसानीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी फळबागा मोडल्या आहेत. माझा मित्र आशुतोष जोशी याच्या चिपळूण तालुक्यातील नरवण या गावी तीन वेळा गेलोय. तिथं माकडांचा उच्छाद प्रत्यक्ष बघितलाय. सगळे हतबल झालेत या त्रासापुढे. तिथले एक वयस्क ग्रामस्थ सांगत होते. त्यांच्या बालपणी माकड मारून ग्रामपंचायत मध्ये घेऊन येणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून काही पैसे दिले जात. यामुळे माकडांची संख्या मर्यादित राहिली. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा आला आणि माकडं अफाट वाढली. परिस्थिती हाताबाहेर गेली. शेतकऱ्यांनी फळबागाच लावणं बंद केलं.

काही भागात मोरांचा त्रास आहे. पेरणीच्या वेळी बियाणं उकरून खातात. मुगाच्या शेंगांचं अख्खं वावर मोरांनी खाल्ल्याचं मी स्वत: बघितलंय. भुईमुगाच्या शेंगाही ते उकरून खातात. बागेतील फळं खातात. तरीही मोरांना मारावं असं मला वाटत नाही. जंगलालगतच्या भागात रानटी हत्तींचा उपद्रव आहे. तेही खाण्यापेक्षा नुकसान अधिक करतात. त्यांनी माणसांना जखमी केल्याच्या घटना समाजमाध्यमांवर येत आहेत. भरपूर ऊस क्षेत्र असलेल्या भागात बिबट्याने दहशत निर्माण केलीय. तो पिकांचं नुकसान करीत नाही. थेट माणसांचा जीव घेतो. त्यामुळं तेही संकट बनलंय.

Wildlife Issue
Wild Boar Crop Damage : वागदरी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ

कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर

वन्य प्राण्यांची ही संख्या अफाट वाढण्याला वन्यजीव संरक्षण कायदा कारणीभूत आहे, हे सगळ्यांनाच दिसतंय. पण प्राणिमित्रांचं म्हणणं असं, की या त्रासालाही माणूसच जबाबदार आहे. माणसांनी जंगलं संपवली म्हणून हे वन्य प्राणी मोठ्या संख्येने शेतीत, मानवी वस्तीत आले. हे विधान अर्धवट आहे. शेती करण्यापुरती माणसांनी कधी काळी झाडं तोडलीही असतील, पण वन्य प्राण्यांना बेघर करण्याचं काम शेतकऱ्यांनी नाही तर सरकारने केलं. उद्योगपतींना खजिन संपत्तीची लूट करता यावी म्हणून हजारो एकरांवरील जंगलं तोडण्याची परवानगी सरकारने दिली. त्यामुळे वन्यजीवांचा अधिवास संपला. हे वास्तव आहे. यासाठी कुठल्याही दृष्टीने शेतकऱ्यांना जबाबदार धरता येणार नाही. बेघर केलेल्या वन्य प्राण्यांना सुरक्षित निवारा देण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही, त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधीच संकटग्रस्त झालेल्या शेतीला वन्य प्राण्यांच्या उपद्रवापासून वाचवायचं कसं? वन्य प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान झालं, तर वन विभागाने त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी कायदेशीर तरतूद आहे. पण व्यवहारात ही तरतूद हास्यास्पद ठरलीय. तुटपुंजी मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांसह एवढे खेटे घालावे लागतात, की ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असं म्हणण्याची वेळ येते. त्यामुळं ही तरतूद हा उपाय नाही. निसर्गात कुठलाच असमतोल चालत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे प्राणिहत्या बंद झाल्या ते ठीकच; पण त्यामुळे तयार झालेल्या असमतोलाचे काय? वन्य प्राण्यांच्या सतत वाढत चाललेल्या संख्येला कसं थांबवायचं? सरकारची धोरणं अशीच राहिली तर ही संख्या वाढतच जाणार आहे.

जीवघेणा ढोंगीपणा

एका बाजूला आहेत ती जंगल संपवायची. तिथल्या वन्य प्राण्यांना बेघर करायचं आणि दुसऱ्या बाजूला वन्य प्राण्यांची संख्या वाढू द्यायची, हा विरोधाभास शेतकऱ्यांच्या जिवावर उठलाय. सायाळ हा झाडं संपवणारा प्राणी आहे. त्याचं संरक्षण, संवर्धन कशासाठी करायचं? झाडं जगली पाहिजेत, जंगल वाढलं पाहिजे म्हणायचं आणि झाडांचा एक नंबर शत्रू असलेल्या सायाळला मारायची परवानगी नाकारायची, ही ढोंगबाजी आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतोय. रानडुकरं जंगलात राहू देत. शेतीतील त्यांचा वावर पूर्णपणे संपवायला हवा. व्यापक मोहीम राबवून जंगलाबाहेरच्या रानडुकरांचं समूळ उच्चाटन करावं लागेल. हरणांना शेतीतून परत कुठल्या तरी जंगलात हलवणं शक्य नाही. अशा स्थितीत मर्यादित कालावधीसाठी हरणांच्या शिकारीला परवानगी देणं, हाच व्यवहार्य उपाय ठरतो. माकडांबाबतही असंच धोरण राबवावं लागेल.

वन्य प्राणी संपवायला पाहिजेत, असं मी कधीच म्हणणार नाही. कुठलीही टोकाची भूमिका नुकसानकारक ठरते. त्यांचा शेतीला होणारा त्रास कसा कमी करायचा, हा कळीचा प्रश्‍न आहे. जीव म्हणून दोन्हीही महत्त्वाचे आहेत. पण माणूस की प्राणी, असा प्रश्‍न निर्माण होतो तेव्हा नाइलाजाने का होईना प्राधान्यक्रम माणसालाच द्यावा लागेल. शेतकरी आत्महत्यांची जी अनेक कारणे आहेत, त्यात वन्य प्राण्यांकडून शेतीचं होणारं नुकसान, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे विसरता येत नाही.

९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९,

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com