
Nashik News : रानभाजी महोत्सवासाठी कृषी विभागाने तालुकास्तरावरील बचत गटांना जागा उपलब्ध करून द्यावी. शेतीमालाची प्रतवारी व मूल्यवर्धन करून शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. रानभाज्या महोत्सव हा प्रत्येक तालुक्यात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्यातर्फे रविवारी (ता. ३) जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्रांचे उद्घाटन झाले. शहरातील उंटवाडी रस्त्यावरील ‘रामेती’च्या परिसरात हा महोत्सव भरविण्यात आला.
या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे उपस्थित होते. या वेळी खासदार भास्कर भगरे, आमदार देवयानी फरांदे यांनी महोत्सवाला भेट दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रास्ताविक केले.
मंत्री झिरवाळ म्हणाले, की मानवी आहारात रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याविषयी शहरातील नागरिकांनी माहिती घेऊन त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. मंत्री भुसे यांनी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित उत्पादन घेऊन थेट ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतीचा, दर्जेदार शेतीमाल चांगल्या भावात विकला कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ‘रामेती’चे प्राचार्य शिवाजी आमले, ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, प्रकल्प उपसंचालक विलास सोनवणे आदी उपस्थित होते.
या भाज्यांचा होता समावेश
आंबाडी, रानभाज्यांमध्ये आघाडा, अळू, अंबाडी, गुळवेल, चंदनबटवा, टाकळा, टेकोळे, रानमेथी, भोकर, माठ, शेवगा, कळलावी, कळथी, चाकवत, चवळी, घोळ, करटोली, कळथी, कळवण, कळंबी, कातळ, कौल, कोंबडा, खटा, चांग, चांगरी, चाकवत, चिंच, चिवळ, चोलाई, जांभूळ, टेंभू, तोंडली, दूर्वा, पिठवण, बोर, भोपळा, भारंगी, भेंडी, भोकर, माठ, बांबू कंद, केळी फूल, सुरण यांचा समावेश होता.
दर शनिवारी मिळणार रानभाज्या
शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी उंटवाडी रोडवरील ‘रामेती’ आवार येथे सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना रानभाज्या मिळणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत या निमित्ताने करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.