Ocean Care : सागराची काळजी का करायची?

Agriculture Importance of Oceans : पृथ्वीच्या वातावरणातील एकूण प्राणवायूच्या ४० टक्के प्राणवायू हा सागरातून मिळतो. जगातील ४० टक्के लोक अन्न आणि उपजीविकेसाठी समुद्रावर अवलंबून आहेत. केवळ या दोन बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याला सागराचे महत्त्व स्पष्ट होईल.
Ocean
OceanAgrowon

सतीश खाडे

Importance of Oceans : समुद्राने पृथ्वीचे सुमारे ७१ टक्के क्षेत्र व्यापले आहे. अशा समुद्रातील अनेक ठिकाणी काही किलोमीटरपर्यंत प्रदूषणाचा विळखा पडल्याचे दिसते. आज जमिनीवर पडणारी कोणतीही गोष्ट ही पावसाच्या पाण्याबरोबर ओढे, नाले, नदी यातून शेवटी समुद्रात जाते. जगभरातून पाचही खंडातून घरगुती सांडपाणी, कारखाने, औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी समुद्रात पोहोचते. या प्रदूषणामुळे सागरामध्ये फार मोठे क्षेत्र जलजीवन विरहित अशा ‘डेड झोन’मध्ये रूपांतरित झाला आहे.

प्लॅस्टिक आणि घनकचरा

उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या छायाचित्रांद्वारे समुद्रातील तरंगत्या प्लॅस्टिकचे डोंगर सातत्याने पुढे येत आहेत. हे सारे घटक एकत्र केले तरी त्याचे क्षेत्रफळ हे संपूर्ण ऑस्ट्रेलियाइतके भरेल. सध्या ज्या वेगाने प्लॅस्टिकच्या पिशव्या समुद्रात जात आहेत, सन २०४० पर्यंत समुद्रातील माशांच्या संख्येपेक्षा पिशव्यांची संख्या जास्त भरेल, असे एका सागरी पर्यावरण तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. इतर कचऱ्याचा हिशोब वेगळाच!

या प्लॅस्टिकमुळे अनेक जलचर मृत्युमुखी पडतात. प्लॅस्टिकचे सूक्ष्म तुकडे (मायक्रो प्लॅस्टिक) अनेक जलचरांच्या शरीरात वाढत चालले आहे. ते मानवांसह संपूर्ण अन्नसाखळीसाठी घातक आहे. हे मासे माणसांच्या आहारात येत असून, हे प्लॅस्टिक मानवी शरीरातही शिरकाव करत आहे. अन्य घनकचराही समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्याचा फटका सागरी तळाशी असलेल्या प्रवाळे, गवते आणि शेवाळांना बसत असून, त्यांचा वेगाने ऱ्हास होत आहे.

Ocean
Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

समुद्रात जाणारा गाळ

जगभरात विकासाच्या नावाखाली डोंगर, पर्वत फोडले जात आहेत. डोंगरावरील जंगले, झाडे कमी झाल्याने आणि शेत जमिनींची बांधबंदिस्ती व्यवस्थित नसणे यातूनही मातीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. यातील मोकळी झालेली माती पावसाळ्यात गाळरूपाने नदीमार्गे समुद्रात पोचते. मातीच्या वरील सुपीक थर वाहून जाते, हे एक मोठे नुकसान आहे. त्यासोबतच ही गाळमाती समुद्राच्या तळातील प्रवाळांना नष्ट करत असल्याने त्यांच्या आधारे वाढणाऱ्या जीवसृष्टीसाठी हानिकारक ठरते.

औष्णिक विद्युत केंद्रांचे पाणी

ही समस्या किती मोठी आहे, याचा अंदाज घ्यायचा असल्यास एकट्या डहाणूचा विचार करू. येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील साडेसहा कोटी लिटर अतिगरम पाणी दर तासाला समुद्रात सोडले जाते. म्हणजेच दिवसाला १६० कोटी लिटर. निव्वळ भारतीय समुद्राच्या किनाऱ्यावर डहाणूसारखी (किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षमतेची) पंधरा औष्णिक केंद्रे आहेत. जगाचा विचार करता ही संख्या कितीतरी मोठी आहे. या सर्व केंद्रांच्या उकळत्या पाण्यामुळे कितीतरी शेकडो चौरस किलोमीटरपर्यंत समुद्रातील जीवसृष्टी मृत होत आहे.

अणुभट्टीचे पाणी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात केवळ भट्टी थंड ठेवण्यासाठी रोज ५२०० कोटी लिटर पाणी लागते. भट्टी थंड करताना तापलेले हे पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाते. या पाण्याचे वाढलेले तापमानच समस्या आहे असे नाही, तर त्यात येणारे किरणोत्साराचे प्रदूषण ही त्याहीपेक्षा मोठी समस्या आहे. जगभरात जास्तीत जास्त अणुऊर्जा केंद्रे ही सोय म्हणून समुद्राच्या काठी आहेत. या किरणोत्साराने हजारो किलोमीटर समुद्र आणि त्यातील जैवविविधता नष्ट किंवा प्रभावित झाली आहे.

Ocean
Arctic Ocean : आर्क्टिक महासागरात आता हिममुक्त उन्हाळा

हवामान बदलाचे सागरावरील परिणाम

हवामान बदलाचे प्रमुख कारणांमध्ये वातावरणात वाढत असलेले हरितगृह वायू होत. उदा. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड इ. हवेतील कर्बवायू जमिनीवरील जंगले आणि झाडे शोषून घेतात. पण त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात कर्बवायू सागराच्या पाण्यात शोषला जातो. पाण्यात विरघळलेला कर्बवायू पाण्यातील एक पेशीय सूक्ष्मजीव, शैवाले आणि सागरी गवते शोषून घेतात. त्यातून प्रकाश संश्‍लेषण करून स्वतःसाठी अन्न तयार करतात.

या प्रक्रियेमध्ये तयार होणारा ऑक्सिजन हा पाण्यात विरघळतो व हवेतही सोडला जातो. या ऑक्सिजनचे प्रमाण ४०-६० टक्के असतो. म्हणजेच समुद्र ऑक्सिजन आणि कर्बवायू या दोघांच्या चक्रामध्ये मोलाची भूमिका निभावतो. गेल्या काही दशकांमध्ये वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण इतके वाढले आहे की समुद्राची तो शोषण्याची किंवा विरघळवणाऱ्या क्षमताच संपत चालली आहे

म्हणजे सागरातील गवते, शैवाले आणि सूक्ष्मजीवांनी शोषूनही पाण्यात कर्बवायू उरतो आहे. परिणामी, पाण्याची आम्लता वाढत चालली आहे. या वाढत्या आम्लतेचा धोका जलचरांसाठी वाढत आहे. त्यांची संख्या आणि एकूणच अन्नसाखळी बिघडत आहे. सागरांची कर्बवायू शोषण्याची क्षमता कमी होत गेल्यास त्याची हवेतील तीव्रता वाढत राहील. त्याची परिणती आणखी तापमान वाढीमध्ये होणार आहे.

पाणी हा अधिवास आहे. त्याची स्वतंत्र जीवसृष्टी आहे. जमिनीवर पाणी ही तिथल्या जीवसृष्टीचा आधार आहे. पण मानव विकासाच्या भ्रमामध्ये आंधळेपणाने एकेक अधिवास नष्ट करत निघालेला आहे. आपण जागतिक जल दिन, जल संपत्ती दिन, वन दिन, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन नुसतेच दिखावूपणे ‘साजरे’ करतो. ते साजरे करण्याऐवजी अधिक ‘बोचरे’ व्हायला हवेत. तरच समाज जागा होईल.

तेलवाहू जहाजांमुळे होणारे प्रदूषण :

सातही समुद्रामध्ये जगभर रोज एक लाख तीन हजारापेक्षा अधिक जहाजे फिरत असतात. त्यापैकी साडेअकरा हजारांपेक्षा अधिक जहाजे ही तेल वाहतूक करणारी आहेत. एकेका जहाजामध्ये एका वेळी लाखो लिटर तेल असते. त्याची गळतीही एक समस्या आहे. अशा मोठ्या जहाजांना होणारे अपघात ही मोठी समस्या आहे.

एका आकडेवारीनुसार वर्षभरात साडेतीनशेपेक्षा अधिक जहाज अपघात होतात. त्या वेळी त्यातील तेल समुद्रात सांडते. या सांडलेल्या तेलाचा तवंग शेकडो किलोमीटर अंतरात पसरतो. त्यामुळे त्या खालील जलचरांचे जगणे अडचणीत येते. जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात मृत होते. हे तेल गोळा करण्याचे कोणतेही तंत्र जगात कुठेही विकसित झालेले नाही. हा तवंग समुद्रात दीर्घकाळ तसाच तरंगत राहतो वारा व लाटांसोबत आसपासच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतो. आधीच असलेल्या समुद्रातील प्रदूषणात प्रचंड वाढ होते.

नद्यांचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते, हा गैरसमज!

कोकणातील गोड्या पाण्याच्या समस्येविषयी बोलताना तेथील प्रचंड पाऊस आणि तुडुंब वाहणाऱ्या नद्या समुद्रात जातात, याचा उल्लेख केला जातो. कोणत्याही नदीतून वाहणारे पाणी अखेरीला समुद्राला मिळते. या विषयी ‘हे पाणी वाया जाते’ असे बहुतांश जलतज्ज्ञ बोलताना दिसतात. पाण्याचे हे चक्र कोट्यवधी वर्षापासून सुरू आहे. ती जमीन व समुद्र या दोन्ही ठिकाणच्या जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे.

समुद्राची क्षारता सरासरी ३५ टक्के आहे. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन, त्याचे बाष्प हवेत जाते. म्हणजे पाणी कमी होते आणि क्षार वाढतात. पण वर गेलेल्या बाष्पाचे ढग होऊन पुढे कुठेतरी पाऊस पडतो. पावसाचे पाणी नद्यांवाटे पुन्हा समुद्रात माघारी येते. या चक्रामुळेच समुद्रातील क्षारांचे ३५ टक्के प्रमाण कायम राहते. जर नद्यांचे सर्वच पाणी अडवले व त्या समुद्राला मिळाले नाही तर समुद्राची क्षारता किती वाढेल, याचा विचार करा. यामुळे त्यातील जीवसृष्टी हळूहळू संपुष्टात येईल. अन्नासाठी सागरी जिवांवर आजही आपली ४० टक्के इतकी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यांच्या खाद्याची सोय उर्वरित जमिनीवर करणे आपल्याला शक्य आहे का?

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com