Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Weather Update : २०२० ते २१०० या कालावधीत हिंद महासागरातील तापमान १.४ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचे संकेत आहेत.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon

Pune News : २०२० ते २१०० या कालावधीत हिंद महासागरातील तापमान १.४ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे कायमस्वरूपी सागरी उष्णतेच्या लाटेची स्थिती उद्‍भविणार आहे. यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत तीव्र चक्रीवादळांची निर्मिती, तसेच मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून स्पष्ट होत आहे.

पुण्यातील उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास गटाने ‘उष्णकटिबंधीय हिंदी महासागरासाठी भविष्यातील प्रक्षेपण’ हा अभ्यास केला आहे.

या अभ्यासातून सागरी उष्णतेच्या लाटा (महासागरातील असामान्य तापमानाचा कालावधी) दर वर्षी २० दिवसांपासून २२०-२५० दिवसांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच २१ व्या शतकाच्या अखेरीस उष्ण कटिबंधीय हिंद महासागरात कायमस्वरूपी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार आहे.

Weather Forecast
Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

सागरी उष्णतेच्या लाटांमुळे प्रवाळ, सागरी गवत आणि आणि समुद्र किनाऱ्यांवर वाढणाऱ्या वनस्पतींच्या जंगलांचा नाश झाल्यामुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रावर विपरीत परिणाम होतो. हिंदी महासागरातील जलद तापमान वाढ केवळ पृष्ठभागापुरती मर्यादित नाही.

हिंद महासागरातील उष्णतेचे प्रमाण पृष्ठभागापासून २ हजार मीटर खोलीपर्यंत वाढू शकते. सध्या दशकात ४.५ झेटा -ज्युल्स (ऊर्जामापनाचे एक परिमाण) या दराने उष्णता वाढत असून, भविष्यात हे प्रमाण प्रति दशक १६ ते २२ झेटा-जूलपर्यंत वाढण्याचे अंदाज आहे.

कोल म्हणाले, ‘‘उष्णतेच्या प्रमाणातील भविष्यातील वाढ ही एका दशकासाठी दर सेकंदाला, दिवसभरात, दररोज, एका हिरोशिमा अणुबॉम्बच्या स्फोटाएवढ्या ऊर्जेशी तुलना करता येण्यासारखी असेल. अरबी समुद्रासह वायव्य हिंद महासागरात कमाल तापमान वाढ होईल, तर सुमात्रा आणि जावा किनाऱ्यावरील तापमान कमी होईल.’’

महासागराच्या तापमान वाढीमध्ये, पृष्ठभागाच्या तापमानाचे हंगामी चक्र बदलण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना वाढू शकतात. १९८० ते २०२० या कालावधीत हिंद महासागरातील वर्षाचे कमाल सरासरी तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान होते.

तर, २१ व्या शतकाच्या अखेरीस किमान तापमान २८.५ ते ३०.७ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वादळांच्या निर्मितीसाठी अनुकूल असते.

१९५० पासूनच मुसळधार पावसाच्या घटना आणि अत्यंत तीव्र चक्रीवादळांची संख्या वाढत आहे. वाढत्या महासागराच्या तापमानासह त्या आणखी वाढण्याचा अंदाज असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. महासागरातील उष्णता वाढल्याने समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही हिमनदी किंवा समुद्रातील बर्फ वितळण्यामुळे होणाऱ्या वाढीपेक्षा जास्त आहे.

Weather Forecast
Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

यामुळे हिंद महासागर द्विध्रुवता (इंडियन ओशन डायपोल), मॉन्सून आणि चक्रीवादळ निर्मितीवर परिणाम करणारी घटना देखील बदलण्याचा अंदाज आहे. २१ व्या शतकाच्या अखेरीस तीव्र द्विध्रुवीय घटनांची वारंवारता ६६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर मध्यम घटनांची वारंवारता ५२ टक्क्यांनी कमी होईल.

२१ व्या शतकाच्या अखेरीस पृष्ठभागावरील सामू (पीएच) ८.१ वरून ७.७ पर्यंत कमी होऊन समुद्रातील आम्लीकरण तीव्र होईल. पश्‍चिम अरबी समुद्रात पृष्ठभागावरील क्लोरोफिल आणि निव्वळ प्राथमिक उत्पादकता सुमारे ८ ते १० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. सामूमधील हे संभाव्य बदल सागरी परिसंस्थेसाठी हानिकारक असू शकतात.

विशेषतः कवक आणि अनेक सागरी जिवांना त्यांचे कवच तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी ही आम्लता संवेदनशील ठरू शकते. मानवी रक्तामध्ये सामू ०.१ कमी झाल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि बहू-अवयव निकामी होऊ शकतात, असेही कोल यांनी स्पष्ट केले.

किनारपट्टीवरील समुदाय असुरक्षित

हिंद महासागर क्षेत्रातील हवामानातील बदलांचे ४० देशांच्या सीमांवर राहणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या तब्बल एक तृतीयांश लोकसंख्येवर मोठे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतील. हिंद महासागर आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये नैसर्गिक आपत्तींचा धोका सर्वाधिक आहे. हवामान आणि तीव्र घटनांमुळे किनारपट्टीवरील राहणारे समुदाय असुरक्षित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com