
Lakhpat Fort: ‘भवताल’च्या वतीने जानेवारी महिन्यात ‘कच्छ फॉसिल्स इकोटूर’ आयोजित केली जाते. गुजरातच्या कच्छ परिसरात फॉसिल्स अर्थात जीवाश्म पाहणे, त्यांचे कोट्यवधी वर्षांपूर्वीचे अद्भुत विश्व समजून घेणे, काही नमुने गोळा करणे... हे त्याचे स्वरूप. या इकोटूरमध्ये सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधु संस्कृतीतील धोलाविरा, पाचशे वर्षांपेक्षा जुना इतिहास असलेला ऐतिहासिक लखपत किल्ला या ऐतिहासिक ठिकाणांनाही भेटी दिल्या जातात. या वेळी काही सहभागींच्या मनात एक गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतो.
तो म्हणजे- कोट्यवधी वर्षांपूर्वीचे डायनासोर व इतर जीवाश्म, सिंधु संस्कृतीतील घटना आणि लखपत किल्ल्याचा इतिहास, त्याच्याजवळच समुद्राला मिळणाऱ्या सिंधू नदीने बदललेला प्रवाह, त्यामुळे तिथल्या खाडीचे आटलेले पाणी या सर्वांची एकमेकांमध्ये गल्लत केली जाते. ही गल्लत मुख्यत: भूतकाळाच्या आकलनाची असते. घडून गेलेल्या काळाचे नेमके आकलन नसेल तर त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज निर्माण होतातच, शिवाय इतिहासही नेमकेपणाने समजून घेता येत नाही. म्हणूनच भूतकाळाचे आकलन महत्त्वाचे.
एखादी घटना, वास्तू, गोष्ट ‘जुनी आहे’ असे सांगितले जाते, म्हटले जाते, त्यातून नेमका अर्थबोध होत नाही. ती किती जुनी आहे हे समजून घेतले आणि तिच्या जुनेपणाबद्दल नेमकेपणाने सांगता आले तरच तिचा अर्थ लागतो. नाहीतर तीसेक वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेले जागतिकीकरण हे जुने असते, छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक घटनाही जुन्या असतात, महाराष्ट्राचे परदेशाशी व्यापाराचे थेट पुरावे मिळतात तो सातवाहनांना २२०० वर्षांपूर्वीचा काळही जुना असतो, दोन पायांवर व्यवस्थित चालणाऱ्या ‘होमो-इरेक्टस’ माणसाची उत्क्रांती होऊन त्याची एक प्रजाती भारतात आल्याचे आणि त्याची १७ लाख वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे तमिळनाडूमध्ये मिळण्याचा काळही जुनाच असतो. त्याच्या मागे गेल्यास, डायनासोरसाठी ओळखला जाणारा ज्युरासिक काळ सर्वसाधारणपणे १४.५ कोटी ते २० कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातो. ताऱ्यांची निर्मिती आणि त्यांचे वय यांचा हिशोब अब्जावधी वर्षांमध्ये जातो.
हा काळाचा संपूर्ण पट. तो लक्षात घेतल्यावर आपण त्याच्या कोणत्या तुकड्याबद्दल बोलत आहोत, हे समजून घेतल्याशिवाय अर्थ लागणार तरी कसा? हीच गोष्ट कच्छच्या टूरमध्ये होते. धोलाविराच्या निमित्ताने सिंधू संस्कृतीतील चढ-उताराची, ऱ्हासाची कारणे समजून घेताना हवामानात झालेले बदल हे महत्त्वाचे कारण चर्चिले जाते. त्याच वेळी डायनासोर आणि त्याच्या काळात जगणाऱ्या इतर प्रजाती नष्ट होण्याचे कारणही हवामानात मोठ्या प्रमाणावर झालेले बदल हेच असते.
तेव्हा डायनासोर आणि सिंधू संस्कृतीतील माणूस यांचा संबंध लावला जाण्याची शक्यता असते. काही जण तसा संबंध लावतातसुद्धा. काळाचे नेमके आकलन नसल्यामुळे अशी गल्लत होते. हे आकलन व्हावे म्हणून निदान भूवैज्ञानिक कालगणना (जिऑलॉजिकल टाइमस्केल), मानवविज्ञानातील कालगणना (अँथ्रोपोलॉजिकल), पुरातत्वीय कालगणना आणि अलीकडची ऐतिहासिक कालगणना व्यवस्थित समजून सांगावी लागते. तसे केले नाही तर, डायनासोर सिंधू संस्कृतीच्या काळात येतो आणि लखपत किल्ल्यात सापडल्या जाणाऱ्या जीवाश्मांचा संबंध माणसाशी लावला जातो.
खरे तर, आधुनिक काळाच्या आधी भूविज्ञानासारखे (जिऑलॉजी), लाखो-कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या जिवांचा अभ्यास करणारे पुराजीवविज्ञानासारखे (पॅलिएन्टॉलॉजी) विषय फारसे विकसित झाले नव्हते. त्या वेळी आधीच घडून गेलेल्या नैसर्गिक घटनांचा, त्यांच्या सापडणाऱ्या अवशेषांचा / वस्तूंचा त्या काळातील कल्पनेनुसार अर्थ लावला जात असे. तशा कितीतरी रंजक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. लखपतचा विषय निघाला आहे तर तिथल्या अशीच एक रंजक कथा जाणून घेणे योग्य ठरेल.
लखपत किल्ला आणि त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ‘फोरॅमेनिफेरा’ प्रकारातले जीवाश्म मिळतात. उथळ समुद्रात आढळणारे हे जीवाश्म. ते वेगवेगळ्या आकार-प्रकाराचे असतात. त्यापैकी दोन आकार आपल्या परिचित गोष्टींसारखे आहेत आणि ते तिथे मोठ्या संख्येनेही मिळतात. एकाचा आकार आहे शिजलेल्या भाताच्या शितासारखा आणि दुसऱ्याचा आकार आहे शिजवलेल्या तुरीच्या किंवा मसुराच्या डाळीसारखा. हे जीवाश्म फोरॅमेनिफेरा जीवांच्या कवचाचे आहेत. हे जीव इओसीन कालखंडात म्हणजे ५.६० कोटी ते ३.४० कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात पृथ्वीवर नांदले. हा झाला या जागेचा कोट्यवधी वर्षांपूर्वीचा नैसर्गिक इतिहास.
लखपत या ठिकाणाची अलीकडच्या इतिहासातील एक घटना शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव यांच्याशी संबंधित आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची ही घटना. ते सोळाव्या शतकात हज यात्रेला जाण्यासाठी मक्केला गेले होते, अशा नोंदी आहेत. ते तिकडे जाण्यासाठी लखपत मार्गे गेले. त्या काळी लखपत हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यावर आणि मोठे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. गुरूनानक देव याच मार्गे जाणार असल्याने त्यांनी या किल्ल्यात वास्तव्य केल्याचेही सांगितले जाते. म्हणजे येथे दोन वास्तविक गोष्टी आहेत- १. सुमारे साडेपाच ते साडेतीन कोटी वर्षांपूर्वीच्या इओसीन काळातील जीवाश्म सापडणे आणि २. गुरूनानक देव हे लखपतमार्गे मक्केला गेले तेव्हा त्यांचा या ठिकाणी मुक्काम असणे.
त्यातून निर्माण झाली एक कथा. ती अशी- गुरुनानक देव यांनी या किल्ल्यात मुक्काम केला. त्या वेळी तिथे लंगर अर्थात सर्वांसाठी भोजन उपलब्ध करून देण्यात आले. त्या जेवणात उरलेली डाळ आणि भात (दाल-चावल) त्या परिसरात विखरून पडले आहेत. तेच आपल्याला आज पाहायला मिळतात... ही कथा आजही सांगितली जाते. लोकही ती श्रद्धेने ऐकतात. काही जण प्रसाद म्हणून तिथले ‘दाल-चावल’ घेऊनही जातात.
या उदाहरणामध्ये भूतकाळाची फारच मोठी गल्लत पाहायला मिळते. ज्या इओसीन काळात माणसाचा किंवा त्याच्या नजीकच्या पूर्वजांचा मागमूसही नव्हता, त्या काळात निर्माण झालेल्या गोष्टी माणसाच्या म्हणून सांगितल्या जात आहेत. अर्थात, गेल्या दीडेकशे वर्षांपूर्वीपर्यंत विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित होत होत्या. त्या वेळी नैसर्गिक घटनांचे, अवशेषांचे अर्थ लावताना अशा कथा निर्माण होणे स्वाभाविक होते, असे म्हणता येईल. पण आजही असे होत असेल तर त्यात भूतकाळाचे नेमके आकलन नसणे हे कारण आहे. अन्यथा इथे चर्चिलेल्या कथेतील काही शे वर्षांपूर्वीचा आणि काही कोटी वर्षांपूर्वीचा काळ एकत्र आणण्याची गल्लत झालीच नसती.
हे केवळ लखपत येथेच होते असे नाही, तर जागोजागी अशी असंख्य उदाहरणे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातही काही भूवैशिष्ट्यांचा संबंध रामाने सोडलेल्या बाणाशी, एखाद्या देवाने मारलेल्या आसूडाशी, शंकराने आपटलेल्या जटांशी किंवा एखाद्या देवीने नखांनी कोरलेल्या खडकाशी-गुहांशी लावले जातात. येथे या देवतांबद्दल श्रद्धा आहे म्हणून कथेत हे देव येतात. इतरत्र इतर देव येतात. या कथा निर्माण होण्याला विशिष्ट प्रदेशाचे, विशिष्ट समाजाचे किंवा विशिष्ट धर्माचे बंधन नसते. हे सर्वत्रच घडते.
या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा त्यांच्यावर हसण्याचे कारण नाही आणि त्या खऱ्या मानून पुढे प्रसारित करण्याचेही कारण नाही. हसायचे अशासाठी नाही की जेव्हा विज्ञानाचा पुरेसा आधार नव्हता तेव्हाच्या काळातील माणसाने नैसर्गिक घटनांचे, आसपास आढळणाऱ्या भूरूपांचे, इतर गोष्टींचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताशी साधने नसल्याने (किंवा कधी कधी साधने असूनही न वापरल्याने!) त्याचे अतर्क्य गोष्टींमध्ये रूपांतर केले.
दुसरे म्हणजे अशा गोष्टी खऱ्या मानून अशासाठी प्रसारित करू नयेत, कारण आता आपल्या हाताशी विज्ञान आहे. त्याचा आणि त्यातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून निसर्गातील अद्भुत घटनांचा सुसंगत अर्थ लावणे शक्य आहे. मग आजही त्याच कथा खऱ्या मानून प्रसारित करू लागलो तर आपण विज्ञान पुरेसे विकसित होण्यापूर्वीच्या काळातच अडकलेलो आहोत, असे म्हणावे लागेल. आपण वर्तमानात आलोच नाही तर आजच्या समस्यांना भिडणार कसे? आणि उत्कर्ष करून घेणार तरी कसा?
म्हणूनच भूतकाळाचे भान आणि त्याचे नेमके आकलन आवश्यक आहे. हे भान आले तर माणसाचे उत्क्रांतीचे आणि विकासाचे टप्पे सुद्धा नेमकेपणाने लक्षात येतात. जगात सर्वसाधारणपणे नऊ-दहा हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात झाली असेल तर मग त्याच्या आधी माणूस स्थिरावलेला नव्हता, भटक्या अवस्थेत होता हे वास्तव लक्षात घेता येते. आणि सर्वच वसाहती, संस्कृती यांचा काळ त्याच्या कितीतरी नंतरचा आहे हेही समजून घेता येते. मग संस्कृतीच्या जुनेपणाचे वाट्टेल ते आकडे फेकता येत नाहीत आणि आपल्या कल्पनेत बराच काळ ठाण मांडून बसलेल्या अतर्क्य गोष्टी या केवळ कल्पनाच आहेत, हे पटण्यासही थोडीफार मदत होते. त्यासाठीसुद्धा भूतकाळ समजणे महत्त्वाचे आहे. तो सर्वांना समजतो किंवा समजून दिला जातोच असे नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण भूतकाळाचे नीट आकलन झाले तरच भविष्याकडे योग्य पद्धतीने मार्गक्रमण सुद्धा करणे शक्य होणार नाही; झेप घेणे ही तर लांबचीच गोष्ट!
abhighorpade@gmail.com
(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.