Rural Story : गोतावळा

Village Story : गावात बहुतांश लोकांची थोडीफार शेतजमीन. माणसं अठरा पगड जातीची, बैत्याचे व्यवहार करणारी. मोजूनमापून सण साजरा करणारी. ‘ऊठ जिवा लाग कामा’ हा मंत्र म्हणणारी.
Rural Story
Rural Story Agrowon
Published on
Updated on

जयंत खाडे

Village life : गावात बहुतांश लोकांची थोडीफार शेतजमीन. माणसं अठरा पगड जातीची, बैत्याचे व्यवहार करणारी. मोजूनमापून सण साजरा करणारी. ‘ऊठ जिवा लाग कामा’ हा मंत्र म्हणणारी. संतांची, शिवकालीन मावळ्यांची नावं घेऊन बसलेली. बक्कळ पिकलं तरी न उधळणारी आणि नाही पिकलं तर पर्वा करणारी. ना पंचांग का मुहूर्त पाहणारी. केवळ रानातल्या म्हसोबाला पूजत शेतीकाम करणारी. कधी जास्तच पिचली, तर मध्यरात्री उठून पायाला हाताचा तिठा मारून आभाळाकडे बघत बसणारी.

डांबरी सडकेपासून एक कच्चा रस्ता गावात जातो. मैल दीड मैल अंतराच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना बहुतांशी करंज्याची झाडे आहेत. काही तुरळक वस्त्या आणि बाकी सगळी कोरडवाहू जमीन. एखाद्या ठिकाणी विहिरीच्या पाण्यावरील उसाचं नाहीतर हळदीचे हिरवे तळकट आणि वस्तीवर अपूर्वाईने जपलेली आंबा, लिंबू, जास्वंदीची झाडं. बाकी रानातल्या बांधानी निंब, करंज आणि बाभळी. पहिल्यांदा गावठाण लागते आणि पुढे दह्याबाचे देऊळ. देवळाच्या पाठीमागे एक मोठा, जुना पिंपळ आणि त्या भोवती ढासळलेला पार.

पुढे पूर्वपश्‍चिम जाणारा कच्चा रस्ता गावाचे दोन भाग करतो. एक वरची आळी आणि एक खालची. खालच्या आळीचे उंबरे जास्त. वरच्या आळीच्या उशाला दुष्काळात खोदलेले व कडेने मातीचा बांध घातलेले तळे. त्यात परतीचा पावसाचे पाणी जमते आणि मार्गशीर्षात आटते. तळ आटले की गावच्या तिन्ही आडांचे पाणी तळाला जाते. तळ्याच्या वर पिरवाडी, दहा एक उंबऱ्याची. एका कडेला पिराची समाधी, मोडकळीस आलेली. पिराचा उरूस नव्याच्या पौर्णिमेला भरतो आणि सगळं गाव हरकून जातं.

वाडीतून पुढे आमच्या माळाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक सार्वजनिक आड आणि त्या शेजारी जुना पिंपळ. खूप जुना आणि जवळचे नाते सांगणारा. आमचे सगळे पूर्वज यावर बसलेत असे वाटते. घरात तसा फक्त दादांचा फोटो आहे. बाकी कुणाला मी पाहिले नाही; पण दिसतात मला जाता येता ते या झाडावर. मजा आहे, एकदा म्हातारं होऊन अवतार संपला की नंतर बसा इथं गावाची, गोतावळ्याची गावकी बघत, अनंतकाळ!

Rural Story
Rural Story : कर्म...

गावात पाहण्यासारखं अथवा सांगण्यासारखं ठिकाण नाही. गावात येतानाचा दह्याबा, खालच्या आळीची अंबाबाई, पिरवाडीतली पिराची समाधी ही श्रद्धेची ठिकाणं. तर संतोषगिरी डोंगरावर बसलेला तो महाराजा, सगळा कर्ता करविता! नाहीतर इनामिन दोन महिने पाणी देणारं तळं, उन्हाळ्यात तळाला गेलेले पाणवठे, पायाची नखं कायमची घालवणारे, उखडलेले, कच्चे आणि फोफाट्याचे रस्ते, अर्धी कच्ची घरं आणि बहुतांशी खरीप हंगामाची शेती... अशा गावाची कोणाला अपूर्वाई! पाहुण्यारावळ्याकडे जावे तर त्यांच्या गावात बारमाही वाहणारी नदी नाहीतर एखाद्या प्रकल्पाचा पाट पहिला की मग या गावाची खूप चीड येते.

उगीच जागेपणी खालतीकडून पाट वाहत गेल्याचे स्वप्न पाहायचं. मनातच त्यात उड्या मारीत अंघोळ करायची, जित्राबं धुवायची. पण पुढं हाच बिनपाण्याचा गाव आणि त्यातली काही गुणी, बापडी, पिचलेली तर काही आरबाट, खोडील माणसं मनात घर करून राहणार आहेत.

Rural Story
Rural Story : भाऊसाहेब

मधल्या रस्त्याला कमाल भैचे सायकल दुकान आहे. भै पंक्चर काढणे, औट काढणे अशी कामे करत दुकानाबाहेर बसलेले असतात. भाड्याने जाणाऱ्या सायकलीची नोंद कानात ठेवलेल्या पेनाने घेतात. भै सतत तोंडाने पान चघळतात आणि लक्षात येईल तसे तंबाखूची चिमूट बंडीच्या खिशातून काढून तोंडात टाकतात. तसा भै कलाकार माणूस आहे.

जत्रेत नाटकात काम करतात. एकदा नाटकात भै खुर्चीवर बसले आणि खुर्ची मोडली. तर भैनी खाली उतरून धोंड्याने ठोकून खुर्ची दुरुस्त केली आणि बसून पुढे नाटक सुरू केलं. नाटकात भै स्त्री पात्राच्या जवळ जाताच एक ओरडला, भाभी आल्यात बघायला.

रस्त्यावर बस थांब्यावर इमामुद्दिनचे हॉटेल आहे. चहा, शेव चिवडा, भजी तिथं मिळतात. इमामुद्दीन बराच तापट आहे, सारखा ओरडून बोलत असतो. त्याच्याकडे चहापेक्षा पाणी भरून चुळा भरायला लोक जास्त जातात, असे दिसतं. नाहीतर किती लोकांकडे हॉटेलात चहा प्यायची औकात आहे. दुपारी हॉटेलमध्ये कोण नसते, पण लोकं आत जाऊन निदान पाणी पिऊन येतात.

इमामुद्दिन आमच्या गोंदा तात्यांचा दोस्त आहे. हा चेटूक करतो असं पोरं म्हणतात. म्हणजे बसमध्ये तो पैसे देत नाही, पण मास्तर याला तिकीट देतात. कधी उगीच असली विद्या आपल्याला मिळाल्यावर आपण काय करायचे ते ठरवत बसायचे. म्हणजे हॉटेलात भजी खायची‌, मुंबईपर्यंत प्रवास करायचा, सिनेमा पाहायचा, आणखी काही काही! पण हा माणूस अशी विद्या असूनही भजी तळत का बसतो, पोरांना दिवसभर आडावरून पाणी भरायला का लावतो, हे समजत नाही.

Rural Story
Rural Story : पश्‍चाताप

गावात हाताच्या बोटांवर मोजण्या इतके बांधीव वाडे आणि घरं. बाकी दगड मातीची, अर्धी कच्ची, काडाने शेकरलेली. जागोजागी गुळभेंडीचे डेरेदार वृक्ष. त्याची पिवळी फुले आणि भोवऱ्यासारखी फळे लहान पोरांना खेळायला पुरतात. बहुतांश लोकांची थोडीफार शेतजमीन. माणसं अठरा पगड जातीची, बैत्याचे व्यवहार करणारी. मोजूनमापून सण साजरा करणारी. ‘ऊठ जिवा लाग कामा’ हा मंत्र म्हणणारी.

संतांची, शिवकालीन मावळ्यांची नावं घेऊन बसलेली. बक्कळ पिकलं तरी न उधळणारी आणि नाही पिकलं तर पर्वा करणारी. ना पंचांग का मुहूर्त पाहणारी. केवळ रानातल्या म्हसोबाला पूजत शेतीकाम करणारी. कधी जास्तच पिचली, तर मध्यरात्री उठून पायाला हाताचा तिठा मारून आभाळाकडे बघत बसणारी.

गावात एक मराठी शाळा सरकारी जागेत, तर हायस्कूल खासगी आणि पडक्या वाड्यात. मराठी शाळेला मोठे पटांगण, बांधीव इमारत. पोरं शाळेत इमानदारीने येतात, वर्गात बसतात, गुरुजींनी शिकवले तेवढे शिकतात. दुपारच्या सुट्टीत हंगामानुसार बोरं, चिंचा, कैऱ्या विकतात.

निकाल लागतात, तोंड पाहून पास-नापास होते, कोणाचा आक्षेप नसतो, कारण नापास झाले तरी सातवी नापास, आठवी नापास अशी पदवी मिळतेच. एकच गुरुजी बापाला आणि पोराला लाभतो आणि ते गुरुजी बापाच्या गुणावरून पोराची लायकी ठरवितात.

त्यामानाने हायस्कूल बरेच शिस्तबद्ध आहे. विद्यार्थ्यासाठी गणवेश आहे, सुरुवातीला प्रार्थना होते, विषयवार तास होतात. उत्तम व तज्ज्ञ शिक्षक आहेत. इमारत मात्र जुनी आणि अपुरी आहे. शिक्षक गल्लीतून जाताना दिसले तरी पोरं घाबरून घरात जाऊन बसतात.

हायस्कूलच्या शिस्तीला काही पोरं घाबरून मराठी शाळेतच शिक्षणाचा शेवट करतात. काही माणसं मात्र पोरांना हायस्कूलमध्ये पाठवितात. तसे काही तरुण बऱ्यापैकी शिकले आहेत, बाहेरगावी नोकरी करतात. सणाला, उरसाला गावात येतात, आईबाप, भावंडांची सोय पाहतात. जमीन जुमला, घरदार नेटानं सांभाळतात.

आमचं जुनं घर तळ्याच्या पायथ्याला वाड्यात, तर नवीन घर खाली आडा जवळ. दोन पाकी नव्या घरात एका बाजूला बापू तर एका बाजूला आम्ही. घराला लागून एक खोली स्वतंत्र काढलेली, त्यात गोंदा तात्याचं टेलरिंग दुकान. तात्यांनी सगळे टेलर म्हणतात. कानात पेन्सिल नाहीतर रंगीत खडू ठेवून तात्या त्या खोलीतून दहा वेळा आतबाहेर करतात.

त्या खोलीत मशिनसोबत एक मोठा आणि खूप सुबक पाट, त्यावर तात्या बाहेर गेलं की झोपायचे नाहीतर चिंध्यांनी भरलेल्या लाकडी पेटीवर बसायचे यासारखे सुख नाही. माणसं तात्यांकडे बंडी, विजार, शर्ट शिवायला येतात आणि निवांत गप्पा मारत बसतात. तात्या मात्र जास्त बोलत नाहीत, खाली बघून कामात व्यग्र राहतात, नाहीतर हा, हू, तर तर एवढे शब्द फुटतात. कदाचित सतत बडबड करणाऱ्या काकूंमुळे तात्या गप्प राहायला शिकले असतील.

तात्यांच्या मागे भाऊची खोली. भाऊ आणि नानी दोघे राहतात. भाऊ एकदम बिनधास्त राहतो. सकाळी उठून भाकरी बांधून कामाला जायचे, कामावरून आले की मस्त पावटी लावून ईम्याच्या हॉटेलात चिवडा खाऊन परत यायचे. मग भाऊ उगीच रुंगी लावत बसतो. नानी शक्यतो त्याच्या तोंडाला लागत नाही. रानात भाऊ मजेत असतो.

जरा मोठी पोरं त्याला गाणं म्हणायला लावतात, मग तमाशातील गाणी भाऊ सुरू करतो आणि खुसखुस् करत पोरं हसायला लागतात. सोप्यात भाऊ कधी बारक्या पोरांच्या गर्दीत बसतो आणि पोरींच्या वेण्या एकमेकींना गुमान बांधून टाकतो. त्याला मोठी लोकं कधी कधी ओरडतात, पण तसा तो दाद देत नाही.

घरात आमचे बापू सगळ्यात मोठे आहेत. ते रानात राहायचे, पण आता घरी असतात. नंतर आमची म्हातारी आई आणि बाबय. दोन्ही जावा जावा. बाबयचे माहेर आमच्या गावातीलच अगदी गल्लीतच. या जावा कधी सोप्यात बसून गप्पा मारतात, एकदम तुटक, काय म्हणायचे हे त्यांचे त्यांना कळते का नाही कोणास ठाऊक. या दोघी ठार अडाणी आहेत.

ना यांना रामायण माहीत का महाभारत. जात्यावर काही गाणी म्हणतात, पण ती ही काही धडाची नाहीत. सगळी पोरं या म्हाताऱ्यांना जाम छळतात. बाबय चिडली की म्हणते, नेलं तुला पांढरीला. पण रात्री त्यांची त्यांची नातवंडं यांना चिटकून सोप्यात झोपतात. रात्री सगळं आवरले की बायकांना आपल्या पोरांची आठवण येते आणि म्हातारीला चिटकून झोपलेल्या सगळ्यांच्या अंगावर वाकळ पडते.

दोन्ही घरांत पंधरा-सोळा पोरं, काही कळती तर काही चिल्ली पिल्ली. पण झाडाच्या पानावरून पावसाचा थेंब घसरत यावा तसे सगळं गुण तंतोतंत झिरपत आलेले. खाणे, पिणे, बोलणं, व्यवहार कशात शिस्त नाही. आचरट आणि उद्धट. एकच आक्का शांत आणि संयमी. सगळ्या मोठ्यांना अहोजावो करणारी. कदाचित तिच्या जन्मापासून लागलेलं दुखणं अपार करुणा तिच्यावर पसरवत असेल. सगळी शाळेत जातात हेच भाग्य. कपडालत्ता, साहित्य आणि तीन वेळेला पोटभर जेवणाची सुबत्ता.

अण्णा सतत रानात आणि कामात. कधीतरी घरी येतात मग सगळी बारकी पोरं त्यांच्या ताटात जेवतात. बैलं जुपून गाडी फिरवणारे आण्णा घरात एकदम राजा माणूस वाटतात. रानातल्या कामाची जुळणी झाली की मग आण्णांच्या अंगात उत्साह सरसरत असतो. ज्ञानू मामा, पंडा दादा, आबा, भाऊ आणि एकदोन बाहेरचं गडी जमले की मोठी जोडणी असते.

कधी नांगर तर कधी पेरणी, काढणी. अशा धामधुमीत सकाळी रानात आण्णाच्या बरोबर जायचे असे योजले की पहाटे तीनलाच ही मंडळी गायब होतात. मग रानात सकाळी जेवण घेऊन जाईपर्यंत नांगर संपलेला, माळ फाडून बैलं तोंडातून फेस काढत नाकपुड्या फाटेपर्यंत फुगवून श्‍वास घेताना दिसायची आणि तो खैंदुळ आमच्या मागे संपायचा. मग कधी कुळव, औत मारताना बैलं धरायला मिळायची. रानात वरच्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी असते. मग आण्णा मोट धरतात आणि दिवसभर घमेल्याला बांधलेल्या कासऱ्यावर बसायचे, अगदी मांडीवर वळ उठेपर्यंत!

तात्या रानात कमी पण गावात जास्त असतात. गावात कुणाचं निधन झालं तर ते सगळ्या विधीला थांबतात. बाकी सार्वजनिक, घरगुती कार्यक्रम असले तरी त्यांचा सहभाग असतोच. लोकं पोरांची लग्न ठरवायची असली की तात्यांच्या मागे लागतात. विशेषतः घरातील पोरांच्या आया तात्यांकडून आपलं म्हणणं वदवून घेतात. एकदा तात्या होय किवा नाही म्हणाले की विषय संपतो. सकाळी तात्यांची पूजा झाली की कोणीतरी बोलवायला येतो. तात्या चर्चेला जातात.

सामान्य रूपाची मुलगी लवकर उजवावी असे आईला वाटते मग ती तात्यांना स्थळ कसं योग्य आहे हे सांगते. तात्यांना मनातलं समजले की ते पाहुण्याची गोतावळी जुळवतात आणि लग्न ठरते. कधी बऱ्यापैकी दिसणाऱ्या मुलीला मागणी येते आणि आईची इच्छा नसते; मग तात्या खोट काढतात आणि मागणी नाकारली जाते. त्यामानाने पोरांची लग्न म्हणजे सोपा हिशेब. चर्चा कमी आणि यादी पे शादी. सकाळी पाहुणे आले की तासाभरात निर्णय, भटजीला मुहूर्त विचारून सकाळी याद्या की दुपारी लग्न.

तात्यांचे मित्रमंडळ पण मोठे आहे. ते सकाळी बाहेर पडले की दिवस डोक्यावर येईपर्यंत ते गावातच असतात. मी कधी कधी त्यांच्या मागून मामाच्या घरात जातो. मामाच्या पोरी तात्यांना चहा न चुकता देतात, अगदी साखर, पावडर नसली तरी मागून आणून देतात. तात्यांच्या गप्पा सुरू होतात. गुदस्ता याव झालं आणि त्याव झालं, हा पाहुणा कसा होता, किती भांडला आणि पुन्हा कसा सरळ झाला हे सुरू. आपण उगाच शेंगांच्या पोत्यावर बसून पुराण ऐकत राहायचं. मग दुपारी हळूहळू तात्या रानात पोहोचतात.

तात्या रानात आले की काम सुरू. दुपारची तात्यांची न्याहारी एकदम तब्येतीत. पाहत राहावी अशी. इतरासारखं रानाताच सावली बघून बसावं, हात न धुता कसेतरी दोन घास मोडायचे आणि मोग्यातल्या शिल्लक पाण्यावर कोरडा घास आत ढकलावा असं नाही. रानात फिरून तात्या ओला कांदा, शेंगा, कोथिंबीर, टोमॅटो जमवतील. मग स्वच्छ हातपाय धुतील. गार पाण्याचा मोगा भरून घेतील आणि सावलीत सप्पय जागेवर बसून शांत जेवतील. जेवून डबा धुऊन आरामात पायाला हाताची खुटी मारून डुलत बसतील. नंतर पुन्हा काम सुरू करतील. विहिरी, तालीवरील स्वच्छता असो वा भांगलन, काढणी. तात्या कामात व्यस्त होतात आणि दिवस पूर्ण बुडाला की घरी येतात.
----------
(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.) ९४२१२९९७७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com