
राज्यात बऱ्याच ठिकाणी तूर (RedGram) आणि कापूस (Cotton) ही पिके एकत्र घेतली जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांच्या म्हणण्यानूसार ही पिकपद्धती (Cropping system) चुकीची असून यातून फायद्यापेक्षा नुकसानच अधिक आहे. ही दोन्ही पिके अधिक कालावधीची म्हणजे साधारणतः सहा महिने कालावधीची आहेत. दोन्ही पिके उंच वाढतात. दोघांची मुळे खोल जातात. दोघांवर पडणाऱ्या किडी सारख्या आहेत. त्यामुळे या पिकांमध्ये स्पर्धा लागते. आंतरपीक (Intercrop) म्हणून एकमेकांना अजिबात फायदा मिळत नाही.
कापूस, तूर या पिकांची वाढ पहिले दोन महिने फार नसते. याच काळात मूग-उडीद जवळजवळ तयार होतो. अडीच महिन्यांत ही पिके काढणीला येतात. कापसात आंतरपिक घ्यायचे असेल आणि दोन ओळींचे अंतर चार फूट ठेवणार असाल तर एक-एक फूटावर दोन ते तीन ओळी उडीद मुगाच्या असाव्यात. एक एक फुटावर तीन ओळी मिळतात. एकाच क्षेत्रातून निदान पावणेदोन पट उत्पादन मिळेल. समजा फक्त कापसाचे एकरी उत्पादन दहा क्विंटल मिळणार असेल आणि मुग-उडदाचे सात क्विंटल. तर दोन्ही अंतरपिकांत मूग-उडीद पाच क्विंटल नक्की मिळतो. दोन्ही पिकांचे मिळून १५ क्विंटल मिळेल. म्हणजे दीडपट अधिक उत्पादन मिळते. टके पीक दोन अडीच महिन्यांत निघून जाते. मूग-उडीद १०० टक्के मिळणार नाही कारण चौथी ओळ कापसाची असेल. म्हणजे एक चतुर्थांश क्षेत्र कमी झाले. कापसाच्या कडेला असलेल्या दोन ओळींना कदाचित शेंगा कमी लागतील. एकूण सरासरी दोन तृतीयांश मूग-उडदाचे उत्पन्न मिळते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवामान बदलामुळे गेल्या ६ ते ८ वर्षापासून पाऊस लहरी झाला आहे. त्याचा परिणाम पिकपद्धतीवर होत आहे. अलीकडे ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. या काळात मूग, उडीद ही पिके काढणीच्या अवस्थेत असतात. अतिवृष्टीमुळे मूग-उडदाच्या शेंगा फुटून बी उगवते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. याशिवाय यंत्राने आंतरमशागत करता येत नाही आणि खुरपणीचा खर्च वाढतो. त्यामुळे शेतकरी कापूस किंवा तुरीमध्ये मूग उडीदाचे आंतरपिक घेण्यासाठी उत्सुक नसतात, असे कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथील तज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी सांगितले. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता आनंद गोरे यांच्या मते केवळ किडींचे योग्यरित्या व्यवस्थापन केले तर तूर- कापसाचे चांगले उत्पादन मिळते.
शेतकरी कापसात तूर का घेतात?
कापूस पिकातील जाणकार आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार कापसामध्ये तुरीचे आंतरपिक घेण्याची अनेक कारणे आहेत. तूर हे अधिक पैसा मिळवून देणारे पिक आहे, शिवाय दोन्ही पिकावरच्या किडी सारख्या असल्यामुळे वेगवेगळ्या किडनाशकांवर पैसे खर्च करण्याची गरज लागत नाही, असे अनेक शेतकऱ्यांना वाटते. तसेच दोन्ही पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे कोरडवाहू जमिनीत ही पद्धती फायदेशीर ठरते, असाही गैरसमज आहे. बीटी कपाशीमध्ये तूर लागवड केल्यामुळे हिरव्या बोंड अळीचे नियंत्रण करणे सोपे जाते, असा शेतकऱ्यांचा समज आहे. किडीमुळे कापसाचे उत्पादन नाही मिळाले तर तुरीचे उत्पादन बोनस म्हणून मिळते, असा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आहे.
शेतकऱ्यांचे अनुभव
मराठवाड्यात कापूस आणि तूर एकत्र लागवडीकडे जास्त कल दिसतो. मांडाखळी, ता. जि. परभणी येथील महादेव राऊत हे गेल्या दहा वर्षापासून जवळपास सात एकरावर कपाशीमध्ये तूरीचे आंतरपीक घेतात. कापसाच्या पाच ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरतात, त्यामुळे दोन्ही पिकांचा एकमेकांना अडथळा होत नाही. तूर साधारण दोन फुटापर्यंत वाढल्यानंतर छाटणी केली जाते. त्यामुळे शेंगा जास्त लागतात. मूग-उडदाचे आंतरपिक ते घेत नाहीत, कारण पावसाचा ताण पडल्यावर फुलगळ होते किंवा अतीवृष्टी झाली तर शेंगा फुटतात. कमी खर्चात तूरीचे बोनस उत्पादन मिळत असल्यामुळे त्यांनी ही पीक पद्धती स्विकारली आहे. तर
पेडगाव, ता. जि. परभणी येथील पांडूरंग सूर्यवंशी यांची कोरडवाहू शेती असून ते गेल्या पंधरा वर्षापासून दहा एकरावर कापसामध्ये तुरीचे आंतरपिक घेतात. कापसाच्या सहा ओळीनंतर तूरीची एक ओळ असते. शेणखताचा जास्त वापर करत असल्यामुळे उत्पादन चांगले मिळते. बोंडअळीमुळे कापसाचे उत्पादन कमी मिळाले तरी तूरीमधून होणारे नुकसान भरून निघते, अस ते सांगतात. गेल्या वर्षी त्यांना तूरीचे अठरा क्विंटल उत्पादन मिळाले. तूरीच्या बाजूच्या फांद्यांना शेंगा मात्र कमी लागतात. किड नियंत्रणासाठी कापसावर फवारणी करताना तूरीवरही फवारणी होते त्यामुळे किडनाशकावरचा खर्च वाचतो. मूग तोडणीसाठी मजूर मिळत नाहीत त्यामुळे ते मूग घेत नाहीत.
आंतरपिकासाठी इतर पर्यायी पिके
तज्ज्ञांच्या मते तूर आणि सोयाबीन ही आंतरपिक पद्धतीही फायदेशीर आहे. कारण सोयाबीन कापसाच्या तुलनेत कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांचा अडथळा होत नाही. ज्या भागात अतिवृष्टीची शक्यता नसते किंवा पाऊसमान वेळेवर आणि चांगले आहे त्या ठिकाणी कापूस आणि तूर पिकामध्ये मूग किंवा उडदाचे आंतरपिक घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
जमीनीची सुपिकता महत्त्वाची
डॉ. राजाराम देशमुख सांगतात की, तूर आणि कापूस एकत्र घेतल्यामुळे जमिनीची सुपिकता घटते. केवळ आर्थिक फायदा न पाहता जमिनीच्या सुपिकतेलाही महत्व दिले पाहिजे. कारण जमिन सुपिक असेल तरच शाश्वत उत्पादन मिळवणे शक्य होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.