Water Pollution : प्रदूषणाबाबत समाजात उदासीनता का?

Article by Satish Khade : प्रदूषण रोखण्याचे काम हे शासन किंवा शासननियुक्त यंत्रणांचे आहे, आणि ते करतील या भरवशावर राहिल्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे केवळच जलचरांच्या शेकडो प्रजाती नष्ट होतील, असे नव्हे तर माणसांचे आरोग्य आणि भविष्यातील अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उभे राहणार आहे. हे समजून घेऊन समाजाची उदासीनता कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
Pollution
PollutionAgrowon

सतीश खाडे

Effect of Pollution : सत्यजित रे हे जगप्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते, दिग्दर्शक. त्यांचा ‘गणशत्रू’ हा एक बंगाली चित्रपट आहे. त्या चित्रपटाची कथा साधारणपणे अशी आहे. एका गावात काविळीची जीवघेणी साथ झपाट्याने गावभर पसरते. गावातील ज्येष्ठ व अनुभवी डॉक्टर अशोक गुप्ता हे कावीळ कशी पसरली, याचा शोध घेऊ लागतात. गावातील मोठ्या मंदिरातील तीर्थ हेच प्रदूषित असून, तिथूनच काविळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे डॉ. गुप्ता यांच्या लक्षात येते.

या मंदिरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांवरच गावाची सारी अर्थव्यवस्था आधारलेली आहे. महत्त्वाचा आर्थिक स्रोत असलेल्या या मंदिराच्या व्यवस्थापनात साहजिकच राजकीय नेत्यांचे प्राबल्य आहे. डॉ. गुप्ता यांचा काही काळ मंदिर बंद ठेवण्याचा आणि प्रदूषण थांबवल्यावर ते पुन्हा खुले करण्याचा प्रस्ताव सगळेच धुडकावून लावतात.

अगदी जनतेला सावध करण्यासाठी लिहिलेला लेखही वर्तमानपत्रे दडपणामुळे छापत नाहीत. सर्व लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न समजावून सांगण्यासाठी डॉ. गुप्ता एक सभा आयोजित करतात. तीही उधळली जाते. थोडक्यात, जनतेच्या हितासाठी झगडणाऱ्या डॉक्टरांनाच जनता स्वतःचा शत्रू (गणशत्रू) ठरवते. ही कथा मला नेहमी आठवते. कारण पर्यावरण, प्रदूषण या बद्दल कोणी कळकळीने बोलू लागला तरी त्याला ‘विकास विरोधी’ असे हिणवून आपला कार्यभाग साधून घेणारे लोक समाजात अनेकदा दिसतात.

प्रदूषणाचा असाच आपल्याकडील एक किस्सा... दोन-तीन वर्षांपूर्वी नांदेड येथे गोदावरी नदीमध्ये हजारो मासे अचानक मरून पाण्यावर तरंगताना दिसले. तेथील पर्यावरणावर आणि पाणी विषयावर कळकळीने काम करणाऱ्या एका प्राध्यापकाने मासे मरण्याच्या कारणाचा शोध घेतला.

प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित यंत्रणेकडे केली. दोन-तीन आठवडे याचा सतत पाठपुरावा केला. त्यावर प्राध्यापकांना उत्तर मिळाले, ‘‘पाण्यात काहीही प्रदूषण नाही. चक्क ते पिण्यायोग्य असून, मासे मरण्याचे कारण प्रदूषण नाही.’’

प्राध्यापक त्यांना लगेच म्हणाले, ‘‘चला सर, असे असेल तर हेच पाणी तुम्ही एक ग्लास भरून प्या, मी एक ग्लास पितो.’’ साहजिकच संबंधित अधिकाऱ्याची तंतरली. त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. मित्रांनो, आपण यातूनच काय ते समजून घ्यायचे. हा किस्सा नांदेडसाठीचा एकमेव नाही, तर प्रातिनिधिक आहे.

Pollution
Pollution Testing : माती, पाणी प्रदूषणावर मात करण्यासाठी...

खरेतर महाराष्ट्रात कुठेही पाणी प्रदूषित आहे, असे झोपेचं सोंग घेतलेल्या संबंधित यंत्रणेला वाटतच नाही. अशा घटना समोर आल्या की प्रसार माध्यमातून त्याच्या बातम्या होतात. पहिल्यांदा त्याला या यंत्रणा दाद देत नाही. खूपच आरडाओरडा झाला की मग तेवढ्यापुरते यंत्रणा थोड्या हलल्यासारख्या करतात किंवा काहीतरी थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवते.

ते पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासतात. त्यावरही त्यांचे उत्तर ठरलेले असते, ‘या पाण्यातील सर्व प्रदूषक घटक घातक पातळीपेक्षा कमी प्रमाणात आहेत.’ या घटनांमागील राजकारण, अर्थकारण अगदी शाळकरी मुलगाही जाणू शकतो. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. खरे तर या यंत्रणेने आपले काम बिनचूक केले तर विकास, संपत्ती निर्माण होण्याबरोबरच पर्यावरणही खूप समृद्ध होईल. पण असे दुर्दैवाने असे होत नाही.

मला नेहमीच एक प्रश्‍न पडतो, की ही यंत्रणा किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारे प्रशासनातही माणसेच काम करतात. त्यांच्या जीवनावर, आरोग्यावर या दूषित किंवा विषारी असलेल्या हवा, पाणी, अन्नांचा काहीच परिणाम होत नसेल का? त्यांची मुले, म्हातारे आई-वडील, त्यांचे आप्तेष्ट यांच्यावर परिणाम होत नसेल का? आता नसला तरी भविष्यात तो होणारच नाही का? राखणदारच चोरांकडे दुर्लक्ष करतोय, त्यामुळेच हे प्रदूषण वाढत चालले असून, माणसांसह सर्व सजीवसृष्टीला विनाशाकडे नेत आहे. हे लोकांना कधी कळणार?

इथे कळकळीने एवढेच नमूद करावेसे वाटते, की प्रदूषणाचे दुष्परिणाम, कारखान्यांनी त्यासाठी घ्यायची काळजी आणि उपाययोजना यांची माहिती सामान्यांना देण्याची एखादी मोठी व्यवस्था असायला हवी. कायद्यात तशी तरतूद असली तरी त्या माहितीचा प्रसार करण्याची कुठलीही यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध दिसत नाही. कागदोपत्री असली तरी समाजात ती कार्यरत असल्याचे स्पष्टपणे दिसत नाही.

प्रशासन, शिक्षण विभाग, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक आणि जागरूक नागरिक यांनी या प्रसारासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आपणच आपल्या समाजासाठी राखणदार बनावे लागेल.

शासन किंवा शासननियुक्त यंत्रणा हे काम करेल या भरवशावर राहिल्यास प्रदूषित पाण्यामुळे केवळच जलचरांच्या शेकडो प्रजाती नष्ट होतील, असे नव्हे तर माणसांचे आरोग्य आणि भविष्यातील अस्तित्वावर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहणार आहे. सर्वसामान्य माणसांपर्यंत थोडे ज्ञान आणि माहितीचे शस्त्र देऊ शकल्यास तेच या समस्येला बऱ्यापैकी हाताळू शकतील, असे वाटते. हे कसे करता येईल, हे पुढील भागात पाहू.

Pollution
Water Pollution : शेतीतील रसायनांच्या वापराने पाणी प्रदूषणात वाढ

उद्योगांमुळे पाण्याचे प्रदूषण हे फक्त त्या औद्योगिक क्षेत्रासाठी आणि त्या भोवतीच्या जलस्रोतांपुरते मर्यादित राहत नाही. ते केवळ शहरे, शहराच्या आसपासच राहते असेही नाही, तर गावोगावी पसरत चाललेल्या कारखानदारीसोबत पसरत चालले आहे. हेच पाणी नदी नाल्यामार्फत भूजलामध्ये किंवा सिंचनाच्या पाण्यात मिसळले जाते.

ते शेतातून आपल्या अन्नसाखळीमध्ये शिरते. यातील खूपच कमी कारखाने प्रदूषण होऊ न देण्याबाबतची स्वतःची बांधिलकी मानतात. बहुतांश कारखाने प्रदूषणाच्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचा सर्वांचा अनुभव आहे. खरंतर यासाठी कडक कायदे आणि कायद्यात कडक शिक्षाही आहेत. पण तरीही प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्याची कारणेही साधारणपणे पुढीलप्रमाणे -

कारखान्याचे मालक व व्यवस्थापन प्रदूषण या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. नैतिकता व कायद्याचा धाक या दोन्हींनाही ते जुमानत नाहीत. नफ्यासमोर त्यांना अन्य सर्व सजीवांचे, माणसांचे जगणे किंवा जीवन एकदम क्षुद्र वाटते.

प्रदूषणाबाबतच्या कायद्याविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये जागरूकताच नाही. असे कडक कायदे व नियम आहेत, हेच सामान्यांनाच नव्हे, तर समाजातील बुद्धिजीवींनाही माहीत नाहीत.

ज्या यंत्रणेकडे ही लोकजागृतीची जबाबदारी आहे, तेही लोकांना अज्ञान ठेवण्यातच धन्यता मानते.

कायद्यानुसार ज्या ज्या प्रशासन यंत्रणेकडे प्रदूषणविषयक कार्यवाही करण्याचे अधिकार असतात. एकतर त्या यंत्रणा प्रदूषणाकडे दुर्लक्ष करतात किंवा प्रदूषण करणाऱ्यांना संरक्षण देण्यात पुढे तरी असतात, असे म्हणण्यास खूप वाव आहे.

कुणी जागरूक माणूस यावर काही बोलू लागला की लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या डॉक्टरांना केले तसे तक्रार करणाऱ्यालाच समाज किंवा विकास विरोधी वगैरे ठरविण्याचा प्रयत्न हितसंबंधीय करतात.

सामान्य माणसातील जागरूक नागरिकांनी थोडा पुढाकार घेऊन कारवाई करण्यास भाग पाडलेच तर पाण्याचा नमुना घेण्यापासून प्रयोगशाळेपर्यंत सर्वत्र दबाव, दडपण आणि आर्थिक तडजोडीद्वारे चाचण्यांचे निकालच बदलले जातात. मग कुणावर काही कारवाईचा प्रश्‍नच येत नाही. एखादी केस पुढे गेलीच तर हरित लवाद वा अन्य न्यायालयात सुद्धा अशा चाचणीच्या संशयाचा फायदा घेऊन निकाली काढल्या जातात.

वास्तविक पाहता आजवर हवा, पाणी, माती यांच्या उद्योगामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण आणि त्या प्रदूषणाबद्दल कारखान्यावर झालेल्या कारवाईची नुसती आकडेवारी तपासली तरी हे प्रमाण किती व्यस्त आहे, हे कुणालाही समजेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com