Pollution Testing : माती, पाणी प्रदूषणावर मात करण्यासाठी...

Article by Satish Khade : रसायनांच्या वापराबाबतचे अपुरे ज्ञान, त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवलेच गेले नाहीत. त्यावरील काही महत्त्वाच्या बाबी या लेखातुन पाहुयात.
Pollution Testing
Pollution TestingAgrowon

सतीश खाडे

Water, Waste Water and Soil Testing : मागील आठवड्यातील ‘शेतीतील रसायनांच्या वापराने पाणी प्रदूषणात वाढ’ या माझ्या लेखावर महाराष्ट्रातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात खूपच चांगली माहिती दिल्याबद्दलच्या भरपूर असल्या तरी एक- दोन प्रतिक्रिया अशाही होता. ‘शेतकऱ्यांना का दोष देता?’, ‘तुम्ही शेतकऱ्यांच्या द्वेषापोटी असे लिहिले आहे इ. मी त्यांना त्या वेळी समजावले,

‘‘मित्रांनो, या रसायनांच्या विषाचा पहिला बळी त्या शेतात काम करणारा शेतकरी, त्याचे कुटुंब आणि मजूर असतात. त्यानंतर खूप उशिरा किंवा शेवटी येतो तो शेतीमालाचा ग्राहक. म्हणजेच तुम्ही स्वतःच रसायनांच्या बेसुमार वापराचे पहिले बळी आहात. तुम्हीच स्वतःला, कुटुंबाला मोठ्या संकटात ढकलत आहात. बाकीच्यांचा विचार सोडा, किमान तुमच्या कुटुंबाचा तरी विचार करा!’’ बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नाही. आपण बऱ्याच गोष्टी अज्ञानापोटी करत चाललो आहोत, याची मला कल्पना आहे.

जंगलातील खाण्यायोग्य फळे, पाने, मुळे गोळा करण्यापासून माणसाचा सुरू झालेला प्रवास हळूहळू शेतीपर्यंत पोहोचला. शेतीची सुरुवात पर्यावरणीय किंवा नैसर्गिक शेतीने झाली. दरम्यान, लहानमोठे प्राणी त्याने पाळीव बनवले. पुढे त्याला जनावरांच्या शेण गोमूत्र यामुळे रोपांच्या वाढीला फायदा होत असल्याचे समजले. त्यांच्या साह्याने अनेक शतके सेंद्रिय शेती केली. गेल्या शतकात रासायनिक खतांचा वापर सुरू झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉम्ब, दारूगोळा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर झाला. त्यातील मोठा साठा युद्ध संपल्यावरही शिल्लक होता. त्यातील अनेक रसायनांपासून कीडनाशके, तणनाशके यांची निर्मिती झाली. त्याचे सुरुवातीला उत्तम परिणाम दिसून उत्पादनात काही प्रमाणात वाढही मिळाली. मात्र रसायनांच्या वापराबाबतचे अपुरे ज्ञान, त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवलेच गेले नाहीत. त्यामुळे फायदा होतोय, म्हणून रसायनांचा वापर बेसुमार प्रमाणात वाढत गेला. त्यामुळेच आजची परिस्थिती ओढवली आहे.

रासायनिक खतांचा बेसुमार वापर का होतो?

खते देण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. पण ते न करताच बहुतांश शेतकरी खते देतात. अनावश्यक खते दिली जातात. त्यातून पिकाला असमतोल अन्नघटक मिळतात. पिकाची सुदृढ वाढ तर होत नाहीच, पण खर्चात वाढ होते. पीक का वाढत नाही, म्हणून मग अजून जास्त खत घालत जाण्याची मानसिकता बळावते.

शेताची बांधबंदिस्ती व्यवस्थित केलेली नसल्यास थोड्याशा पावसानेही मातीचा वरील सुपीक थर वाहून जातो. याच थरात अन्नद्रव्ये, ती पिकांना उपलब्ध करणारे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात असतात. तीच वाहून गेल्यामुळे पुन्हा खत द्यावे लागते.

दुसऱ्या बाजूला जमिनीमध्ये तणनाशकाचा वापर वाढत चालला आहे. फवारणी करते वेळी कीडनाशके जमिनीवर सांडूनही उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. मग पुन्हा खते दिली जातात. यातून अन्नद्रव्याचा समतोल बिघडत जातो.

Pollution Testing
Water Pollution : शेतीतील रसायनांच्या वापराने पाणी प्रदूषणात वाढ

कीडनाशकांचा वापर का वाढत जातो?

गेल्या काही दशकांमध्ये किडींचा प्रादूर्भाव अगदी उद्रेकाच्या पातळीवर पोहोचत आहे. सर्वांत पहिली बाब म्हणजे तो का वाढत आहे?

बेभरवशाचे किंवा बदलते हवामान (उदा. सापेक्ष आर्द्रता, तापमान, पाऊस, पावसाचे दीर्घ खंड, ढगाळ हवामान इ.) यामुळे किडींचा जीवनक्रम बदलू लागला आहे.

कीडनाशकांचा अनियंत्रित वापर. (मात्रा शिफारशींपेक्षा अधिक वाढवणे)

शिफारस नसलेल्या कीडनाशकांचा वापर.

एका पिकावर आलेली कीड ही नंतरच्या किंवा आजूबाजूच्या अन्य पिकांकडे मोर्चा वळवते. मुख्य खाद्य उपलब्ध नसतानाही दुय्यम खाद्याच्या साह्याने तग धरून राहते.

एकच पीक शेतात सतत घेणे. (मोनो क्रॉपिंग)

एकात्मिक कीड नियंत्रणातील विविध उपायांचा वापर न करणे.

बऱ्याचदा रोग-किडी रोपवाटिकांच्या माध्यमातून शेतात प्रसारित होतात.

कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे मित्रकीटकांची संख्या कमी झाली आहे. साहजिकच, किडींची विशेषतः दुय्यम किडींची संख्या वाढली आहे.

बहुविध पीक पद्धतीचा अभाव.

झाडे काटक, मजबूत व निरोगी नसल्यामुळे प्रतिकारक्षमता कमी राहून किडी रोगांच्या प्रादुर्भावासाठी संवेदनशील राहतात. पिके कीड-रोगांना लवकर बळी पडतात. मग पुनः त्यावर कीडनाशक मारले जाते.

सतत एकाच प्रकारच्या कीडनाशकांचा वापर केल्यास किडींमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. त्या किडीची नवी पिढी कीडनाशकांना दाद देत नाही.

बाजारात बोगस, भेसळयुक्त रासायनिक किंवा कीडनाशकांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यांचा वापर केल्यास किडीचे नियंत्रण मिळेलच असे नाही.

किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न वा मोहिमेचा अभाव.

पाणी, सांडपाणी व माती परीक्षण झाले स्वस्त व सोपे

पाणी व माती परीक्षण करणे आता तुलनेने सोपे झाले आहे. एखादा शाळकरी मुलगाही आपल्याकडील स्मार्टफोनद्वारे ते करू शकतो. अशा प्रकारचे उपकरण आता बाजारात उपलब्ध आहे. पाण्याची गुणवत्ता म्हणजे त्यात असलेले विविध घटकांचे योग्य प्रमाण. हे प्रमाण तपासण्यासाठी फोटोमेट्री तंत्रज्ञानाचा उपयोग या उपकरणात केला आहे. यात दहा विशिष्ट द्रावण असलेल्या छोट्या बाटल्यांचे मिळून एक कीट आहे.

या दहा बाटल्यांत दहा प्रकारचे रसायने (रिएजंट) आहेत. यांच्या माध्यमातून पाण्यातील वा मातीतील दहा प्रकारच्या रसायनांचे प्रमाण जाणून घेता येते. उदा. आपल्याला पाण्यातील फ्लोराइडचे प्रमाण तपासायचे आहे. त्यासाठी पाण्याचा नमुना घेऊन त्यात कीटमधील फ्लोराइडसाठी असलेल्या रिएजंटचा एक थेंब टाकला की त्या पाण्याला विशिष्ट रंग येतो. त्या रंगाच्या फिकट, गडद, मध्यम शेडप्रमाणे आपल्याला मोबाइल कॅमेरा आणि ॲपच्या साह्याने त्या पाण्यातील फ्लोराइडचे प्रमाण लगेच समजते.

अशाच प्रकारे कीटमध्ये पाण्यातील लोह, फॉस्फरस, सल्फेट, नायट्रेट, हार्डनेस, क्लोराइड, मॅंगेनीज, क्रोमियम, बोरॉन, तांबे, झिंक इ. सर्व घटकांचे अस्तित्व व प्रमाण समजते. तसेच पाण्याचा सामू (pH) व पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाणही मोजता येते. एका किटमध्ये एका घटकाचे पन्नास व दहा घटकांचे माळून पाचशे नमुने तपासता येतात. त्याचा विचार केला असताना या किटची किंमतही खूपच माफक आहे. हे कीड वापरल्यास सिंचनाचे, पिण्याचे पाणी किंवा चक्क सांडपाणी यातील विविध रासायनिक घटकांचे (प्रदूषणाचे) प्रमाण जाणून घेता येते. जमिनीतील मातीतील रसायनांचे प्रकार व त्यांचे प्रमाणही जाणता येते. या माहितीच्या आधारे अचूक उपाययोजना ठरवता येतात.

Pollution Testing
Soil Pollution : मातीतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना

माती पाण्यातील रसायने घालविण्यासाठी...

मातीतील रसायने घालवणे -

शेतातील मातीत असलेली अतिरिक्त प्रमाणातील रसायने पूर्णपणे घालवणे खूप अवघड गोष्ट आहे. पण त्यांचे प्रमाण कमी करता येते. त्यासाठी एक उपाययोजना करावी लागते. शेतात उताराच्या सीमेवर एक मीटर खोलीचा चर घेतात. शेतात तुडुंब पाणी भरून त्या पाण्याचा निचरा या चराकडे होईल असे पाहिले जाते. या चरात पाण्यासोबत मातीतील रसायने वाहून येतात. त्यामुळे तिथे माणूस किंवा जनावरे खाणार नाहीत, अशा प्रकारची झाडे लावावीत.

चरात आलेली रसायने पाण्यासोबत झाडांकडून शोषली जातात. ‘बायोॲक्युमिलेशन’ नियमाप्रमाणे ती सर्व झाडात साठवली जातात. अशा झाडांचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी करता येतो. (उदा. दरवाजे, फर्निचर निर्मिती इ.) पाणी भरून निचरा करण्याची प्रक्रिया हंगामानंतर तीन ते चार वेळा केल्यास फायदा होतो. मातीतील विविध रसायने कमी होण्यास मदत होते.

पाण्यातून घातक रसायने घालवणे -

जमिनीतून प्रदूषके कमी करण्याचे उपाय हे तुलनेने कमी खर्चिक आहे. मात्र पाण्यातून प्रदूषके घालवणे ही अवघड व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे ती खूप खर्चिक ठरते. शेतासह दैनंदिन जीवनामध्येही रासायनिक घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे त्यांचे प्रमाण जलस्रोतात वाढत चालले आहे.

या जलस्रोतांवर आपले सिंचनाचे किंवा पिण्याच्या पाण्याची गणित बसवलेले असते. रसायनांचे प्रमाण इतके वाढू लागले आहे, की पाण्याच्या नियमित शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतूनही ती कमी होत नाहीत. यातील अनेक रसायने स्थायी स्वरूपाची असल्याने पाणी पृथक्करणातही ओळखू येत नाही. अगदी आर. ओ. प्लॅंट किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून ही रसायने बाहेर काढणे निदान आजतरी सर्वांत अवघड काम समजले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com