
डॉ. आदिनाथ ताकटे
Indian Agriculture : रब्बी हंगामात बहुतेक पिके ही उपलब्ध ओलाव्यावर येतात. अर्थात थोडे फार विहिरीचे पाणी दिले जाते. परंतु ते अपुरेच असते. अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून रब्बी हंगामामध्ये अधिक उत्पादनाच्या दृष्टीने आंतरमशागतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आंतरमशागतीचे फायदे
जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
हवा खेळती राहते.
दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पीक जोमदार वाढून अधिक उत्पादन मिळते
रब्बी हंगामात जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.
रब्बी पिकांत करावयाचे कामकाज
हेक्टरी रोपांची योग्य संख्या ठेवणे
पेरणीनंतर पिकानुसार आणि जमिनीतील ओलाव्यानुसार पाच ते आठ दिवसात उगवण होते. उगवण विरळ झाली असेल, उगवण व्यवस्थित झाली नसेल अथवा जास्त नांगे (गॅप) पडले असतील, तर तेथे ताबडतोब बी टोकावे. नांगे भरले नाहीत तर हेक्टरी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन कमी येते.
उशिरा नांगे भरले तर आधी उगवलेली रोपे आणि नंतर टोकण केल्यावर उगवलेल्या रोपांच्या वाढीमध्ये जास्त तफावत आढळून येते. उशिरा आलेल्या रोपांच्या अनिष्ट वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यासाठी लवकरात लवकर नांगे भरणे गरजेचे आहे.
दाट पेरणी झाली असल्यास एका ठिकाणी चांगले वाढलेले एकच रोप ठेवून विरळणी करावी.विरळणी उशिरा केली तर जमिनीतील ओलावा उपटून टाकणारी रोपेच घेऊन टाकतात. त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण कमी होते. परिणामी पीक फुलोऱ्यात आल्यावर पिकास ओलावा अपुरा पडून उत्पादनात घट येते.
कोळपणी
पिकांची चांगली उगवण झाल्यावर ताबडतोब वाफशावर पहिली कोळपणी करावी. पीक ३० ते ३५ दिवसांचे होईपर्यंत किमान दोन कोळपण्या कराव्यात. त्यामुळे पीक तणविरहित राहील.
कोळपणी केल्यामुळे मातीचा वरील थर भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. पिकांची वाढ चांगली वाढ होते. उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो. काही प्रमाणात पिकांच्या ओळींना मातीची भर पडते. यासाठी कोळपणी करणे महत्त्वाचे आहे.
खुरपणी
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात तणांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. पिकांत वाढलेले तण अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी पिकांबरोबर स्पर्धा करतात. त्यामुळे मुख्य पिकास प्रमुख घटकांची उपलब्धता कमी होते. पिकाची वाढ खुंटून उत्पादनावर परिणाम होतो.
कोळपणी करून काही प्रमाणात तणांचा बंदोबस्त होतो. परंतु पिकांमध्ये भरपूर तणांची उगवण झाली असल्यास खुरपणी करावी. खुरपणीमुळे दोन ओळींत तसेच दोन रोपांतील तण काढले जाते. तसेच जमिनीचा थर खालीवर होऊन जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे खेळती हवा राहते.
आच्छादनाचा वापर
जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी हेक्टरी ५ टन पालापाचोळा अथवा पाचटाचे लहान तुकडे किंवा गव्हाचा भुसा पिकाच्या दोन ओळींत टाकावा. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते तसेच तणांचा प्रादुर्भावही कमी होतो. उपलब्ध ओलाव्याचा उपयोग जास्त काळ होऊन पाण्याची बचत होते.
पीकनिहाय आगामी नियोजन
रब्बी ज्वारी
पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व १२ ते १५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत.
जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी तीन कोळपण्या कराव्यात. पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली, पाचव्या आठवड्यात दुसरी, तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी. त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीला पडलेल्या भेगा बुजतात. बाष्पीभवन थांबते.
आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी.
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्टरी पाच टन प्रमाणे काडीकचरा, पिकांची धसकटे यांचे दोन ओळींत आच्छादन पसरवावे. यामुळे जमिनीत ओल चांगली टिकून राहण्यास मदत होते.
अनियमित हवामान, अवर्षण पडल्यास ज्वारी पिकामधील प्रत्येक तिसरी ओळ काढून आंतरमशागत करावी.
हरभरा
पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत विरळणी करून दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे. आवश्यक तेथे नांगे भरावेत.
पेरणीपासून चार आठवड्यांच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी करावी.
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी रासायनिक तणनाशकांची फवारणी करावी.
करडई
रोप उगवणीनंतर १० दिवसांनी किंवा पेरणीपासून २० दिवसांनी विरळणी करावी. मध्यम जमिनीत दोन रोपांत २० सेंमी, तर भारी जमिनीत ३० सेंमी अंतर ठेवावे.
आवश्यकतेनुसार एखादी निंदणी करावी.
सूर्यफूल
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
विरळणी करताना मध्यम जमिनीत २० सेंमी, तर भारी जमिनीत ३० सेंमी अंतर ठेवावे.
पिकास १५ दिवसांच्या अंतराने एक ते दोन कोळपण्या तसेच एक खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे.
दोन ओळीमध्ये गव्हाचे भुसकट अथवा उसाचा पाचटाचे आच्छादन करावे.
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.