Baramati News : पुण्यासह सातारा आणि सोलापूरमधील शेतीसाठी नीरा देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, लोकसभेचे निकाल जाहीर होताच या प्रस्तावित कामाच्या प्रक्रियेचा वेग मंदावला आहे.
माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांचे निकाल सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेल्यामुळेच तर या प्रकल्पाचे काम थंडावले नाही ना, असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने निविदा प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
नीरा-देवघर योजनेच्या उजव्या कालव्याच्या वितरिकेसाठी ९६७ कोटी ७४ लाख, सांगलीतील म्हैसाळ येथील कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेसाठी ९७९.३५ कोटी आणि तापी खोरे विकास महामंडळाच्या सुलवाडे जामफळ -कनोली उपसा योजनेसाठी ८५८.८७ कोटी अशा सुमारे तीन हजार कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यापैकी दोन कामांची प्रक्रिया सुरू असून नीरा देवघर प्रकल्पाच्या कामाची प्रक्रिया थंडबस्त्यात गेली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर, साताऱ्यातील फलटण, सोलापुरातील माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष असून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली आहे.
इतर योजनांना निधी कसा?
एकीकडे नीरा देवघर योजना बंद करण्याचे ठरवले जात असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन सिंचन योजना सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. निधीअभावी एक योजना बंद करावी लागते आहे तर इतर योजनांना निधी कसा उपलब्ध होणार आहे? महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत अंदाजे ४००० कोटी रुपयांच्या योजना निविदा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
महाराष्ट्रातील इतर महामंडळांच्या अंदाजे १७४० कोटी रुपयांच्या योजना निविदा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. ५७४० कोटी रुपयांच्या योजना जानेवारी- मार्च २०२४ च्या नंतर जाहीर झालेल्या आहेत. या योजनांसाठी निधीचे नियोजन कसे केले जाणार आहे, याबाबत माहिती अवगत व्हावी, अशी मागणी सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.