
Latur News: पानगाव (ता. रेणापूर) येथील पन्नगेश्वर साखर कारखाना तेवीस वर्षांनंतर दिवाळखोरीत गेला आणि त्याची विक्री झाली. विमल ॲग्रो कंपनीने विकत घेतलेल्या या कारखान्याच्या हंगामावेळी हा प्रकार उघड झाला. यामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी कोण फेडणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कर्मचारी व शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात यासाठी दोन वेळा आंदोलनही केले.
कारखान्याची दिवाळखोरी व दुसऱ्या कंपनीच्या विक्रीवरही शंका व्यक्त केल्या जात आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने रेणापूर तालुक्यात रेणा व व्हटी या दोन मध्यम प्रकल्पांसह तीन साठवण तलावांची निर्मती झाली. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने या भागातील शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळले. ट्रॅक्टर व बैलगाडीने कमी खर्चात उसाची वाहतूक होऊन गाळप व्हावे, या दृष्टीने पानगाव येथे मुंडे यांनी २००० मध्ये पन्नगेश्वर कारखान्याची उभारणी केली.
तब्बल वीस वर्षे कारखाना जोमात सुरू राहिला. मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याला उतरती कळा लागली. २०२४ पासून कारखान्याचा हंगाम बंद पडला. दुसरीकडे कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर कर्ज दिलेल्या बँकांनी राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरणात (एनसीएलटी) धाव घेतली. एनसीएलटीने कारखान्याची संपत्ती, तिचे मूल्यांकन, कारखान्याची येणी व देणीचा तपशील निश्चित करण्यासाठी प्रतिनिधीची नियुक्ती केली. या प्रतिनिधीने बँकांचे ४६ कोटी आणि मोजक्याच कर्मचाऱ्यांचे दोन कोटी देणे दाखवले.
त्यानंतर कारखान्याची ४८ कोटींना विक्री विमल ॲग्रो कंपनीला झाल्याची चर्चा या भागातील शेतकऱ्यांमध्ये आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची देणी, शेतकऱ्यांनी शेवटच्या हंगामात शेवटच्या पंधरा दिवसांत पुरवठा केलेल्या उसाचे पैसे, भागभांडवलापोटी (शेअर्स) गुंतवलेली शेतकऱ्यांची रक्कम व वाहतूक तसेच तोडणी वाहतूकदारांची देणी तशीच आहेत.
कंपनीने पूर्वीच्या एकाही कर्मचाऱ्यांना कामावर न घेता गळीत हंगामाची तयारी सुरू केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. ही देणी कोण फेडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळखोरी व विक्रीबाबत नेमके काय झाले व कशामुळे झाले, असाही प्रश्न आहे. दरम्यान शेतकरी व कर्मचारी बुधवारी (ता. ६) कारखान्यासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करणार आहेत.
कारखान्याकडील देणी
साडेतीन हजार शेतकरी सभासदांचे शेअर्स - १५ कोटी वीस लाख
५७८ कर्मचाऱ्यांचे थकित वेतन व अन्य रकमा - १२ कोटी तीन लाख
ऊस गाळपासाठी बिगर सभासद शेतकऱ्यांच्या ठेवी - ६0 लाख रुपये
ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे बिलाचे - ३ कोटी ३५ लाख
तोडणी व वाहतूक ठेकेदार- तीन कोटी ६० लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.