
Politics Update: राज्यातील बड्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चाली तर भन्नाट आहेत. आता ते वजनदार खात्याचे मंत्री आहेत, शिवाय प्रदेशाध्यपदाचा लगाम हातात आहे. तरीही त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस रोज नवे आरोप करत आहेत. भाजप विरोधी पक्ष असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक केले होते. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांना आरोपांवरून तुरुंगात जावे लागले. त्यांनी राजीनामेही दिले.
मात्र धनंजय मुंडे यांना अजून भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेसने हात लावलेला नाही. या वादात आता बावनकुळे यांनी उडी घेत धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडवून आणली. त्यासाठी त्यांनी जेवणावळीचे निमित्त साधले आणि गोपनीय भेट किती वेळ चालली हे सांगून धस यांच्या फुग्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला. या अनाकलनीय धक्क्याने धस धुसफुसले पण सत्ताधारी नेत्याच्या चालीपुढे हतबलतेशिवाय हाती काहीच लागले नाही. बावनकुळे भाजपचे वजनदार मंत्री असले तरी त्यांच्या घरातील झालेल्या जेवणावळीचा ‘मेन्यू’ कुणी ठरवला हा चर्चेचा विषय आहे.
महायुती सरकारला सत्तेत आल्यापासून मंत्र्यांच्या कथित भ्रष्ट कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला बॉम्ब फुटला तो बीडमधील हत्याकांड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचा सहभाग. अतिशय निर्घृण पद्धतीने केलेल्या या खुनाच्या गुन्ह्यात सहभागी करून घेण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांना टाचा घासाव्या लागल्या. तरीही त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. एका बाजूला आमदार सुरेश धस आणि दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या रोज नव्या आरोपांनी मुंडे हैराण झाले आहेत.
नवे कृषिमंत्रीही चर्चेत
एक माजी कृषिमंत्री विविध आरोपांनी घेरलेला असताना नवे कृषिमंत्री वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत, किंबहुना टीकेचे धनी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी जुन्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची कैद आणि ५० हजार रुपये दंड झाला आहे. कोकाटे पेशाने वकील आहेत, पण बेधडक व्यक्तिमत्त्व असल्याने बोलून जातात. कृषी विभागाला असे वाटते, की शेतकरी त्यांच्या सल्ल्याने शेती करतो. त्यामुळे ते उंटावरून शेळ्या हाकत योजना आणतात आणि त्या योजनांवर भलतेच चरून जातात.
मात्र कोकाटे यांनी कार्यभार घेतल्यानंतर विभागनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका लावून त्यांना काय हवे आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, काय बदल केले पाहिजेत हे ऐकून घेत आहेत. चार-पाच तास ते शेतकऱ्यांचे ऐकून घेत आहेत. बैठकीत मांडलेला प्रत्येक मुद्दा लिहून घेतला जात आहे. मात्र या सगळ्यांची माती करण्याचे काम कोकाटे यांच्या एका वक्तव्याने केले. सध्या एक रुपयात पीकविमा योजना गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, एक रुपयात काय येते? आम्ही एक रुपयात पीकविमा देतो. अलीकडे भिकारीही एक रुपयाची भीक घेत नाही, असे सांगून त्यांनी आपल्याच चांगल्या उपक्रमाला गालबोट लावले. बीड जिल्ह्यात पीकविम्यात झालेला गैरव्यवहार त्यांना भ्रष्टाचार वाटत नाही. गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार या दोन वेगळ्या संकल्पना असल्याचे त्यांना वाटते. त्यामुळे आता नव्या संकल्पनांची शेतकऱ्यांना सवय करून घ्यावी लागेल की काय, अशी भीती आहे.
भाजपला पक्के माहीत आहे की आपली मुख्य लढाई आहे ती काँग्रेसशी पण काँग्रेसची लढाई आपल्याच नेत्यांशी असल्याचे अलीकडच्या काळात समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत संभाव्य अपयशानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा काटा आपोआप निघेल, असे मनसुबे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते रचत होते. मात्र ते मनसुबे चांगल्या निकालाने उधळले. मिळालेल्या यशाने नाना आणि त्यांची कंपनी इतकी हुरळली की विधानसभा निवडणुकीत एकेका जागेसाठी शिवसेनेशी प्रचंड ताणाताणी झाली.
बैठकीत एकमेकांना रेटायचे आणि ते पुन्हा चव्हाट्यावर येऊन जोरदारपणे मांडायचे. जणू काही भाजपचा जनाधार संपला आहे, एकनाथ शिंदे त्यांच्या कारभारामुळे बदनाम झाले आहेत आणि अजित पवारांना आता शरद पवार यांच्याकडे परतल्याशिवाय पर्याय नाही, असा समज करून घेतला होता. ऐन निवडणुकीच्या काळात रोज किमान दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी होत होती. पक्षाला बाळसे आल्याची ही लक्षणे होती.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा असा काही फटका बसला की काँग्रेसजन अजूनही त्या धक्क्यातून सावरायला तयार नाहीत. महाविकास आघाडी सत्तेत असताना नाना पटोले यांनी ऐनवेळी राजीनामा दिला आणि ते सभागृहात सदस्यांच्या जागेवर आले. त्यांना मंत्रिपदाची प्रचंड स्वप्ने पडत होती. ते विरोधकांना इतकी मदत करत, की आपल्याच मंत्र्यांना प्रश्न विचारून हैराण करत. नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील प्रत्येक नेत्याचा सविस्तर अहवाल राहुल गांधी यांच्यासमोर मांडला. आपण कुठे कमी पडलो याचे चिंतन केले आणि आपला राजीनामा देऊन मोकळे झाले. पण शेवटपर्यंत खिंड लढवत अनेक नियुक्त्याही त्यांनी केल्याचे कळते.
सपकाळ यांच्या ‘हाती’ काँग्रेस
नवा प्रदेशाध्यक्ष कोण, असा प्रश्न विचारला जात असताना आता खांदेपालट होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील सतेज पाटील किंवा विश्वजित कदम यांच्या गळ्यात माळ पडेल असे सांगितले जात होते. मात्र अचानक बुलढाण्याचा हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सभागृहात अथवा माध्यमांमध्ये कधीही न झळकलेले सपकाळ अचानक चर्चेत आले.
सर्वोदयी कार्यकर्ते आणि कट्टर काँग्रेसी हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती विखुरलेली महाराष्ट्र काँग्रेस आली आहे. पदग्रहण सोहळ्यातील त्यांचे भाषण अतिशय मार्मिक होते. आपली लढाई नेमकी कुणाशी आहे हे सूचकपणे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पैशांच्या, सोशल मीडियाच्या आणि भाजपच्या अन्य मोर्चांच्या लढाईत आपण टिकणार नाही. आपण जेवढे प्रयत्न करू त्यापेक्षा दुप्पट प्रयत्न भाजपचे असतील. त्यामुळे आता जमिनीवर काम करायची गरज असल्याचे सांगितले. गेल्या १० वर्षांत राज्यातही काँग्रेसला एकमुखी नेता नसल्याचे सिद्ध झाले आहे. कुणी कुणाचे ऐकत नाही, अशा काळात हर्षवर्धन सपकाळ यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.