
बाळासाहेब पाटील
Law and Order: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याची लक्तरे त्यांनी हिवाळी अधिवेशनात टांगली. त्याबरोबरच त्यांनी राज्यभरात निघालेल्या मोर्चांमधून बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या अब्रूची लक्तरे केवळ टांगली नाहीत तर त्याच्या चिंध्या करून रानोमाळ फेकून दिल्या.
त्याचवेळी परभणीत झालेल्या हिंसाचारादरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलिस कोठडीत हत्या झाली. त्यात चार पोलिस निलंबित झाले. एका पोलिसाने प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होत मारहाण केल्याची कबुली थेट मुख्यमंत्री फडणवीस देतात, तरीही राज्यात सर्व माध्यमांत लोकप्रिय असलेले धस ‘अण्णा’ मात्र पोलिसांना मोठ्या मनाने माफ करण्याचा गांधीवादी सल्ला देत आहेत.
स्वत:लाच रगेल संबोधून घेणारे सुरेश धस सध्या भलतेच चर्चेत आहेत. हिवाळी अधिवेशनात संपूर्ण सभागृह थरारून उठेल, अशारीतीने हत्याकांड प्रकरण आपल्या ओघवत्या पण त्यांच्याच रगेल भाषेत उभे केले. त्या वेळी त्यांनी ना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले ना, खंडणीप्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडचे नाव घेतले. पण त्यांनी तास-दीड तासाच्या भाषणात देवेंद्र फडणवीस गेल्या अडीच वर्षांपासून सांभाळत असलेल्या गृहखात्याची लक्तरे सभागृहात अक्षरश: टांगली.
पण ही लक्तरे टांगत असताना त्याचा रोख मात्र धनंजय मुंडे यांच्याकडे होता. किंबहुना तो तसा राहील, असा प्रयत्न होता. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे पारंपरिक विरोधक असले तरी धस यांची कोंडी न फुटण्यासारखी होती. दोन्ही मुंडेंपैकी धनंजय यांना थेट देवेंद्र फडणवीस यांचा तर पंकजा यांना भाजपचा खंबीर पाठिंबा असल्याने धस यांची गोची झाली होती. या खदखदीला त्यांनी तोंड फोडले ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून. धस यांनी हे प्रकरण धसास लावले आणि एकापाठोपाठ एक आरोपी जेरबंद झाले. तोपर्यंत पोलिस सिनेमातल्या पोलिसांसारखे निष्क्रिय होते.
याचदरम्यान परभणीत संविधान प्रतिकृतीची मोडतोड झाल्याचे प्रकरण घडले आणि याची प्रतिक्रिया म्हणून तेथे निघालेल्या मोर्चावेळी हिंसक घटना घडल्या. त्यानंतर अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय वाकोडे यांचा यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिस कोठडीत मारहाण केलेल्या पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड याला निलंबित करण्यात आले तर त्याच्यासोबत आणखी चार पोलिसांना निलंबित केले. मात्र हाच घोरबांड राज्यातील बड्या नेत्यांबरोबर फोटो काढून ते व्हायरल करतो. दरम्यान, न्यायासाठी परभणीतून निघालेला मोर्चा नाशिकपर्यंत २३ दिवस पायपीट करून येतो आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोर लावून बाजू मांडणारे सुरेश धस पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा म्हणतात?
सुरेश धस यांनीच राज्यातील पोलिस दलाची निष्क्रियता सभागृहात मांडली असताना त्यांचा कळवळा येण्याची उपरती नेमकी कशामुळे झाली, असा प्रश्न आता सर्वांना पडतो आहे. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात बाजू मांडत होते पण त्याचवेळी बीड जिल्हा नियोजन समिती, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख, पीकविमा योजनेतील गैरप्रकार असे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित पण आपल्या सोयीचे विषय मांडत होते. असे असले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते फोकसमध्ये राहिले.
धस प्रसिद्धीच्या शिखरावर चढत असताना त्यांना आपण दुसरे ‘अण्णा’ झाल्याचा भास होत होता. याच शिखरावर चढताना न्यायासाठी कोणत्याही नेतृत्वाशिवाय न्याय मागायला निघालेल्या आंबेडकरी जनतेला मोठ्या मनाने पोलिसांना माफ करण्याचा सल्ला देत आहेत. याच न्यायाने त्यांनी आणि त्यांचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने वाल्मीक कराड आणि त्याच्यासोबत अटक केलेल्या अन्य गावगुंडांनाही माफ करावे लागेल. प्रकरण अंगलट आल्यानंतर साळसूदपणे ते माझ्या विधानाची मोडतोड केली असे सांगत आहेत.
पण त्यांचे बोलणे स्पष्ट ऐकल्यानंतर ते कुणाची सुपारी वाजवतात हेही तपासणे गरजेचे आहे. त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर याही तडजोडीसाठी आणि कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा मुंबईत येता कामा नये, यासाठी २३ दिवस या आंदोलकांचा मुक्कामाच्या ठिकाणी प्रयत्न करतात. पण कोणत्याही नेतृत्वाशिवाय न्यायासाठी मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत नाहीत. किंबहुना प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे दलितांचे नेते म्हणणारेही यात लक्ष घालत नाहीत मात्र चर्चेसाठी ते थेट मुख्यमंत्र्यांची वेश मागतात, हे अनाकलनीय आहे.
हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस निरीक्षक घोरबांड हे काही प्रमाणात आक्रमक झाले होते हे खरे आहे, असे सांगत होते. तर सोमनाथ सूर्यवंशी अचानक ‘ब्रेथलेस’ म्हणजे श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने मृत्युमुखी पडल्याचे सांगितले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांचा थेट सहभाग असतानाही धस कुणाचे तरी दूत होऊन मोठ्या मनाने माफ करायला सांगत आहेत.
जुने नाट्य अंक नवा
महाविकास आघाडीतील फाटाफुटीचे वृत्त हे काही नवे नाही. दिल्लीत सरहद या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या ‘सरहद’ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार केला. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा संताप होणे स्वाभाविक आहे. या एका प्रकरणावरून राडा सुरू झाला आणि एरवी पवार यांच्याविरोधात टीका करणारी भाजप, शिंदे गट समर्थनासाठी सरसावला.
एका बाजूला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गट्टी जमत असताना एकाकी पण वेळोवेळी उपद्रवमूल्य दाखवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी थेट शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावली. यावरून संताप व्यक्त करणारा ठाकरे गटही सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतो. त्यावर प्रतिक्रिया न देता शरद पवार यांनी अगदी अलगद तिढा टाकत ठाकरे गटाला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत हे पवारांवर टीका करत असले, तरी त्यांच्या पक्षाचे तीन बडे नेते फडणवीस यांना भेटतात त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसरीकडे शिंदेंच्या सत्काराला संजय दीना पाटील आणि शिंदे गटातील अन्य एका खासदारांच्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार उपस्थित राहिले. मात्र बदलत्या परिस्थितीत तेही स्वातंत्र्य ते गमावून बसले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.