
Political Resurgence:
नष्ट कुछ भी नहीं होता, धूल का एक कण भी नहीं,
जल की एक बूंद भी नहीं, बस सब बदल लेते हैं रूप...
हिंदी कवी प्रियदर्शन यांच्या या सुप्रसिद्ध ओळी राजकारणातील बदलत्या परिस्थितीविषयी संकेत करतात. शरद पवार यांचे राजकीय पर्व संपले असे पहिल्या टर्मचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका दूरदर्शन वाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते. परिस्थिती अशी होती, की पवारांच्या पक्षाचा बांध फुटून अनेक बडे नेते भाजपमध्ये जात होते. त्यानंतर काही दिवसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्या.
या निवडणुकीत भाजप १०५ जागांवर विजयी होत सर्वांत मोठा पक्ष बनला. महायुतीत एकत्र असलेली शिवसेना साठ जागा गाठताना धापा टाकत होती. मात्र आता भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अचानक शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आणि युतीचे बिनसत गेले. शिवसेना आपल्याला सोडून जाते कुठे, असा ठाम विश्वास असलेल्या भाजपला कात्रजचा घाट दाखविण्यात आला. पवारांचे पर्व संपले असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पवारांनी आपल्या राजकीय कौशल्याचे एक उत्तम उदाहरण दाखवून देत महाविकास आघाडी आकाराला आणली आणि उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री बनले.
फडणवीस पुन्हा आले
मंत्रालयाचा सहावा मजला काही मीटर अंतरावर असताना तो अचानक कोसो दूर गेलेल्या फडणवीस यांना पुढील अडीच वर्षे विरोधात काढावी लागली. अडीच वर्षांनंतर राज्यसभा निवडणुकीत धक्का दिल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० च्या वर आमदार गुवाहाटी, गोवामार्गे पुन्हा मुंबईत आले. फडणवीस यांचा शपथविधीच काय तो बाकी आहे असे वातावरण असताना अचानक फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचविले.
आधी मंत्रिमंडळाबाहेर राहून काम करण्यास इच्छुक असलेल्या फडणवीसांना बळेबळेच उपमुख्यमंत्री म्हणून राहावे लागले. पुढील अडीच वर्षे ते दुय्यम भूमिकेत टिकून राहिले. आधी चाचपडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुर्चीवरील मांड पक्की केली. शिंदेंच्या आमदारांना हवे ते मिळत होते. इकडे महाविकास आघाडीची शकले होण्याची औपचारिकता बाकी आहे की काय असे वाटत होते. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत ३१ जागा जिंकून महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपली ताकद दाखवली. आता शिंदे आणि फडणवीस यांचे काही खरे नाही असे बोलले जाऊ लागले.
दरम्यानच्या काळात फडणवीस यांची सरकारमधील भूमिका दुय्यमच होती. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री सोडा मंत्री होतील की नाही असे बोलले जाऊ लागले. लोकसभा निवडणुका होऊन मंत्रिमंडळ तयार झाल्याने केंद्रातही संधी नाही. पुढील पाच वर्षे पक्षसंघटनेत काम करायचे. फडणवीस संपले असे सांगितले जाऊ लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश आले आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले.
दरम्यान, आपल्याशिवाय पर्याय नाही असे चित्र निर्माण करणाऱ्या आणि विजयाचे श्रेय घेऊ इच्छिणाऱ्या शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागल्याने अनेकांना वाटले की आता शिंदे संपले. पण ज्या पद्धतीने खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाच्या वाटणीत शिंदेंचा वरचष्मा राहिला तो पाहता शिंदेंनी आपले राजकीय कौशल्य दाखवले आहे. शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असले तरी त्यांना नगरविकास आणि गृहनिर्माण ही तगडी खाती आपल्याकडे ठेवली. दावोसला जाण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री जाहीर केले.
यात रायगड आदिती तटकरे आणि नाशिक गिरीश महाजन यांच्याकडे ठेवले. या जिल्ह्यांत अनुक्रमे भरत गोगावले आणि दादा भुसे यांना बाहेर ठेवले हे धक्कादायक होते. त्यामुळे नाराजी दाखवण्याचे केंद्र बनलेल्या दरे या गावी शिंदे गेले. त्यानंतर लगेचच या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदांना स्थगिती दिली. नव्या सरकारमध्ये शिंदे यांची फरफट होईल, असे बोलले जात असताना शिंदे यांनी इतके सोपे नसल्याची चुणूक दाखवून दिली आहे.
किटाळ कसे जाईल?
शिर्डीत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने शिबिरे घेत शक्तिप्रदर्शन केले. यांपैकी भाजपने शिर्डीतून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले. तर राष्ट्रवादीच्या शिबिरावर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे किटाळ होते. पहिला दिवस छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमुळे चर्चेत होता. तर दुसरा दिवस फर्डेबाज भाषणाने धनंजय मुंडेंभोवती फिरला. त्यानंतर किटाळ धुऊन काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांची पाठ थोपटली.
अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी जेव्हा आमदार शरद पवार यांच्याकडे परतले तेव्हा दुपारनंतर मुंडे यशवंतराव चव्हाण सेंटरवर आले. माध्यमांनी त्यांना घेरले असता आपण मित्राच्या घरी झोपलो होतो. मला याबाबत काहीच माहीत नाही असे सांगितले. मात्र शिर्डीतल्या भाषणात त्यांनी अजित पवार यांची मनधरणी करत होतो.
त्यांना पक्षातून काढण्याचा डाव आहे असे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे पवार यांना मुंडे यांच्या भाषणाची दखल घेऊन भलामण करावी लागली. पण मुंडेंचे रोज नवे कारनामे बाहेर येत असताना हे किटाळ कसे धुऊन काढणार, याकडे लक्ष लागले आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह भाजपच्या बीडमधील नेत्यांनी मुंडे यांना घेरल्याने त्याची खदखद शिर्डीतील भाषणात मुंडे यांनी व्यक्त केली.
मिशन मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईत झालेल्या मेळाव्यांमध्ये ठाकरे आणि शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे गद्दारांना जागा दाखवून भाजपच्या हिंदुत्वाला पुन्हा डिवचले. तर शिंदे यांनी आम्हाला जनतेच्या न्यायालयात जागा दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली असे बाहुबल दाखवून देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. ही उणीदुणी आता महाराष्ट्राला तोंडपाठ झाली आहेत.
पण ती पुन्हा नव्याने मिशन मुंबईसाठी आहे. ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईवरील मांड सोडलेली नाही. त्यामुळे भाजप स्वबळावर लढल्यास प्रमुख तीन पक्षांत लढत होईल. त्याचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसू शकतो. एकीकडे ठाकरेची ‘वज्रमूठ’ आणि दुसरीकडे शिंदेचे ‘सैल’ हात असा प्रमुख सामना असेल. तर ज्याची सर्वाधिक चेष्टा झाली त्या पन्नाप्रमुखांच्या बळावर भाजप जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.