

Indian Farmer Dignity: मी या आठवड्यात विविध मित्रांना फोन करून बोललो. एकंदरीत त्यांचं कसं आणि काय चालू आहे हे जाणून घेण्याच्या हेतूने. एका अधिकारी मित्राला विचारलं, की काय चाललंय नवीन? तो बोलला, नवीन काय, तेच चालू आहे. नोकरी आणि वरकमाई... मी म्हटलं, की तू ज्याला वरकमाई असं गोंडस नाव देतोयस, तो तर भ्रष्टाचाराचा पैसा आहे. वर्षानुवर्षे हे करताना तुला काहीच वाटत नाही का? त्यावर मित्र बोलला, ‘‘मी ज्या व्यवस्थेत जगतोय तिथं भ्रष्टाचार हा शब्दच नाही. वरकमाई हेच नाव आहे. ही एक सामान्य बाब आहे. अगदी वरपासून खालपर्यंत याची मजबूत साखळी आहे.
तुझ्यासारखे मूठभर लोक त्याला भ्रष्टाचार म्हणतात. कायद्याने तो गुन्हा आहे, हे सामान्य माणसांना कळावं म्हणून अधूनमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळा रचतो. त्यात एखादा तलाठी, ग्रामसेवक नाही तर कारकून सापडतो. त्याला माध्यमांमध्ये ठळक प्रसिद्धी मिळते. मग तुमच्या सारख्यांची खात्री पटते, की कायद्याचे राज्य आहे. अशा प्रकरणात जे कोणी बिचारे सापडतात, तेही काही महिन्यांत नोकरीवर रुजू होतात. फक्त त्याची बातमी येत नाही, एवढंच! एखादा कलेक्टर, एस.पी., आमदार, खासदार, मंत्री अशा सापळ्यात अडकल्याची एखादी तरी घटना तुला आठवते का?
मी म्हटलं, की तू जे सांगतोयस ते मला पूर्वीपासून माहीत आहेच. यात माझ्यासाठी नवीन काही नाही. कायदा सामान्य माणसांना भीती घालण्यापुरताच आहे, हे सगळ्यांनाच कळतंय. पण मी तुझ्याकडं वेगळ्या दृष्टीने बघत होतो. तू गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला, मातीशी नाळ जुळलेला होतास, म्हणून...
तो गंभीरपणे म्हणाला, ‘‘मला माहीत आहे, तू मला मित्र म्हणत असलास तरी ती आता औपचारिकता आहे. तुला माझ्याबद्दल जिव्हाळा वा आदर वाटण्याचं कारण नाही. कारण तुझ्या दृष्टीने मी चोरच !’’
‘‘मी नोकरीला लागलो तेव्हा समाजासाठी, लोकांसाठी काही तरी काम करावं, अशी भावना होती. ज्या मातीतून आलो त्या मातीशी नाळ होती. पण काही दिवसातच या व्यवस्थेचा भाग बनलो आणि सगळं विसरून गेलो. मातीशी कसलंच नातं राहिलं नाही. फक्त पैशाशी नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं.’’
त्याला मध्येच थांबवत मी म्हटलं, की काही काळ वरकमाई करणं ही तुझी गरज असेल. बंगले, गाड्या, सोनं, तुझं, लेकरांचं करिअर... अशी तुझी विविध स्वप्नं असतील. पण ती केव्हाच पूर्ण झालीत. मग आता तुला वरकमाईची गरज काय?
मित्र बोलला, ‘‘तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. तशी मला आता पैसे मिळविण्याची अजिबात गरज नाही. पण पैसे मिळविण्याचं व्यसनच लागलंय. पैसे आले नाहीत तर अस्वस्थ होतो. ते आले की खूष होतो. पैशाशिवाय करमत नाही बघ...’’
मी म्हटलं, एवढ्या पैशाचं काय करणार आहेस तू?
तो बोलला, ‘‘याचं उत्तर माझ्याकडं नाही. पैशामुळं मी समाधानी आहे असंही नाही. पण पैसे मिळविण्याची इच्छा काही संपत नाही.’’
मी म्हटलं, सहज विचार करून बघ. तुझं मातीशी नातं टिकून राहिलं असतं तर तू पैशाच्या एवढा आहारी गेला असतास का?
तो बोलला, ‘‘तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे; पण आता त्याचा उपयोग नाही! आता माघारी फिरणं शक्य नाही. हे आयुष्य असंच जाणार!’’
मी म्हटलं, की तुला तुझ्या कामाचा पगार मिळतो, तरीही तू वरकमाई करतोस. तू देशासाठी, समाजासाठी काही करीत नाहीस. देशाच्या
उत्पादनात कसली भर घालत नाहीस. तरीही तुम्ही नोकरदार स्वत:ला श्रेष्ठ कसे समजता?
तो बोलला, ‘‘मी तसं समजत नाही; पण या व्यवस्थेचं हे श्रेष्ठत्व आम्हा नोकरदारांना बहाल केलंय. भलेही आम्ही भ्रष्ट, अकार्यक्षम, कामचुकार असू!’’
एका व्यापारी मित्राला फोन केला.
‘‘काय चाललंय?’’
‘‘तेच पोटापाण्याचं, दुसरं काय करणार?’’
‘‘चाळीस वर्षांपासून मी बघतोय. तुझा तोच व्यापार चालू आहे. सुरू करताना तो पोटासाठी होता, हे माहिताय मला. आता एवढ्या वर्षांनंतरही तुझा पोटापाण्याचा प्रश्न सुटला नाही का? पोट भलतंच मोठं दिसतंय तुझं. साठी ओलांडली तरी यातून बाहेर पडावं, असं का वाटत नाही?’’
‘‘बसल्या जागी पैशाला लागून पैसा येतोय. धंदा चांगला चालू आहे. दुसरं काय करणार?’’
‘‘धंदा बघायला तुझी मुलं आहेतच की. तू का बाहेर पडत नाहीस यातून?’’
‘‘सहज मिळणारा पैसा का मिळवू नये?’’
‘‘आयुष्याच्या या टप्प्यावर वेगळं काही करावं वाटत नाही का? पैसे म्हणजेच सर्वस्व का?’’
‘‘व्यापार हा पैसे कमावण्यासाठीच असतो. ते काही धर्मार्थ काम नाही.’’
‘‘पैसा कमावण्यासाठी लांड्या-लबाड्याही चालतात का?’’
‘‘व्यापारात सगळं काही चालतं. सरळ मार्गाने कोणी लखपती, करोडपती होत नाही.’’
‘‘आता वयाच्या या टप्प्यावर तरी तुला हे सगळं सोडावं असं वाटत नाही का?’’
‘‘तसं वाटायला तुझ्यासारखा मी लेखक, कवी थोडाच आहे?’’
‘‘लेखक, कवींना तर पैशाची हाव खूपच असते. त्यांचं सोड, तुझं बोल.’’
‘‘तू तुझी मातीशी असलेली नाळ तोडलीस म्हणून तू असा पैसाप्रेमी बनलास, असं तुला वाटत नाही का?’’
‘‘तिथं मातीत भरपूर पैसे घातले की! कंटाळून सोडलं शेत. कशाला आठवण करून देतोस...’’
‘‘तू मातीशी नातं जोडायला, तिच्यासोबत जगायला गेला नाहीस. तू तिथंही व्यापार करायला गेलास. तिथं तुला पैसे मिळाले नाहीत, त्याचा दोष तू मातीला देतोयस. साहजिकच तिथला आनंद तुला घेता आला नाही. पैसा म्हणजेच सुख...असं तुला वाटतं.’’
तो चिडला असावा. ‘‘उगं डोक्यावरून जायचं बोलू नको. भेटून बरेच दिवस झाले, रात्री जेवायला जायचं का सांग?’’
मी म्हटलं, की तुझ्यापेक्षा शेतकरी जास्त समाधानी असतो. तुला किती पैसे मिळाल्यानंतर तू हे सोडशील, याचं उत्तर देत असशील तर आपण जेवायला जाऊ.’’
मित्राच्या फोनची रेंज गेली असावी किंवा चार्जिंग संपलं असावं. त्याचा फोन बंद झाला. मी पुन्हा फोन केला तरी त्यानं उचलला नाही.
पत्रकार मित्राला फोन केला. तो गेल्या दहा वर्षांपासून पेपर बंद करायचाय, त्यात काही कमाई राहिली नाही, असं म्हणतो. त्याला विचारलं, की नवीन काय चाललंय? तो बोलला, ‘‘नवं काहीच नाही. चालूय पेपर रडत पडत.’’
‘‘कधी बंद करणार आहेस पेपर?’’
‘‘ज्या दिवशी तोटा सुरू होईल तेव्हा बंद करायचा...’’
‘‘इतक्या वर्षांपासून पत्रकारिता करतोस, तुझं समाजासाठी योगदान काय?’’
‘‘मी माझं पोट भरण्यासाठी पेपर काढला. तो व्यवसाय आहे. त्याचा समाजाशी काय संबंध!’’
‘‘काही लिहितो, वाचतोस का?’’
‘‘रिकामा वेळ कुठाय अशा गोष्टींसाठी? व्हॉट्सअॅपवर आलेलं बघतो कधीमधी.’’
‘‘इतरांसाठी कसलंही योगदान नसतानाही पत्रकार प्रतिष्ठित कसा?’’
‘‘आम्ही थोडंच तसं मानतो...लोकच आम्हाला तसं समजतात!’’
यानंतर निवृत्त पोलिस, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक अशा दहा-बारा मित्रांशी बोललो. ‘तुमचं समाजासाठी योगदान काय?’ याचं उत्तर कोणालाही देता आलं नाही. ज्यांना वरकमाई करणं शक्य नव्हतं, त्यांनी नोकरी करीत, इतर व्यवसाय करून चांगले पैसे कमावलेत. आज त्यांच्याकडं भरपूर पैसे आहेत, तरीही आणखी पैसे मिळविण्याची त्यांची लालसा संपलेली नाही. पैसे मिळवणं म्हणजेच जगणं, असं ते मानतात. या सगळ्यांनी आयुष्यभर जे काम केलंय, त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळालाय. तरीही ते समाजाला सेवा दिली, असं म्हणतात. वरवर आमचं छान चाललंय, असं ते दाखवत असले तरी असमाधानी आहेत. पण त्यांनाही समाजात प्रतिष्ठित म्हणून मान्यता आहे.
राजकीय पुढाऱ्यांबद्दल तर बोलायलाच नको. सत्तेसाठी पैसा आणि सत्तेतून पैसा, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. ते जे जे करतात, त्यात त्यांचा स्वत:चा स्वार्थ असतोच. त्यालाच ते समाजासाठीचं योगदान मानतात. बघता बघता करोडपती, अब्जोपती बनतात. ते सगळे प्रतिष्ठितांच्या यादीत नंबर एकवर आहेत. ही यादी खूप मोठी आहे.
या देशात सगळ्या बांडगुळांना प्रतिष्ठा आहे, पण शेतकऱ्यांना ती नाही!
कारण शेतकरीच स्वतःला प्रतिष्ठित समजत नाहीत. शेतकरी कोणाला फसवत नाहीत, कोणाला लुबाडत नाहीत. फुकटचं कोणाचं काही घेत नाहीत. शेती करणं म्हणजे एका दाण्याचे शंभर दाणे होताना बघणं. निसर्गाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी होऊन त्याचा आनंद घेणं. शेतकरी स्वत:साठी शेती करतो, असं मानलं तरी तो इतर कितीतरी जणांना जगवतो. फक्त माणसंच नव्हे तर शेकडो पशू-पक्षी, कीटक, जिवाणू शेतीवरच जगतात. अप्रत्यक्षपणे इतक्या सगळ्यांना जगवणारा शेतकरी स्वतःला प्रतिष्ठित का मानत नाही?
शेतीत शारीरिक कष्ट आहेत, जोखीम आहे; पण आनंदही आहे. शेतकरी स्वतः जगताना देशाच्या जीडीपीतही भर घालतोय. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतोय. तरीही तो इतर घटकांसारखा पैशाच्या मागे धावत नाही. तो पैशात सुख शोधत नाही. याचं कारणही शेतीतच दडलं आहे. खरं तर शेती ही इतर कोणत्याही नोकरी, व्यवसायापेक्षा अधिक प्रतिष्ठेची बाब आहे. शेतकऱ्यांनी ही बाब समजून घेण्याची गरज आहे. शेतीत खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल, तर तुमची शेतीशी नाळ जुळलेली हवीच. मातीशी जिव्हाळ्याचं नातं असायला हवं.
ज्यांनी जीवनपद्धती म्हणून शेती स्वीकारलीय, असे कितीतरी शेतकरी आनंदी आयुष्य जगताहेत. शेतीबाहेरचे कथित प्रतिष्ठित लोक अधिक सुखी-समाधानी आहेत हा भ्रम आहे. पैसाअडका असला तरी त्यांच्या आयुष्यात एक भयंकर पोकळी आहे, ती कशी भरून काढायची हा प्रश्न त्यांचा पिच्छा सोडत नाही. मातीशी नाळ जुळलेला शेतकरी त्यांच्या तुलनेत आनंदी आहे. त्याला आपल्या जगण्याचा उद्देश सापडलेला आहे. सुख म्हणजे आणखी काय असतं?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.