
Rural India Reality: आमच्यासोबत शिकणारे जे मुलगे दहावी-बारावीत नापास झाले. त्यातल्या काहींनी पुन्हा परीक्षा दिली. काही जण पुन्हा नापास झाले. नापास तरुण नाइलाजाने शेती करू लागले. पास झालेल्यातले बहुतेक कला शाखेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिकले. बी.ए./बी. कॉम. होऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून शेती करणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात मोठी आहे. शिकलेले धडपड न करणारे तरुण बेरोजगार राहण्याची ती सुरुवात होती.
तीन चार दशके आधी शेती ही नापासांची शाळा होती. दहावी-बारावीत मागे पडलेले तरुण शेती करत असत. पदवी घेतलेल्या आमच्यासोबत शिकलेल्या तरुणांनी शेती सुरू केली आणि ‘नापसांची शेती शाळा‘ आता पासांची शाळा बनली. शेती करणाऱ्या तरुणांना ‘अपयशी‘ समजले जात नव्हते. त्यांना बायको मिळायची, त्यांची लग्न होत होती. हे तरुण बाजारपेठेवर लक्ष ठेवून पिके घेऊ लागले. आधुनिक तंत्रज्ञान कास धरून शेती करणारे अनेकजण प्रगतीशील शेतकरी बनले.
तीन चार दशकांपूर्वी गळतीचे प्रमाण मोठे होते. आजच्या काळात दहावी-बारावीच्याही परीक्षेत पास होणे तुलनेने सोपे आहे. बी.ए., एम. ए., बी. कॉम., एम. कॉम., बी. एससी., एम. एससी., असे कोर्सेस सोडाच; आठ दहा लाख रुपये खर्चून बी. इ. म्हणजे इंजिनीअर होऊन, एम. बी. ए. किंवा या प्रकारचे भारी कोर्सेस पूर्ण करूनही नोकरी, रोजगार न मिळणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
विभाजन होऊन शेतीचा आकार कमी झाला आहे. आजच्या प्रचंड महागाईच्या काळात पोट भरण्याइतपतही शेती उरली नाही. त्यात शेतीची चाकं तोट्याच्या गाळात खोल रुतली आहेत. इतर उद्योग करायला बँका दारात उभ्या करतीलच याची खात्री देता येत नाही. त्यात ए. आय. तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील नोकऱ्या आणखी खाऊन टाकणार असल्याचे उघड्या डोळ्यांनी बघता येतेय. वर्षभरात दहा वीस तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होतात. त्यांचे बोर्ड लागतात. तेच यश म्हणून साजरे केले जाते. स्पर्धा परीक्षांच्या जीवघेण्या स्पर्धेत दोन चार गुणांनी मागे पडणाऱ्यांना अपयशी ठरवले जाते.
बरं हे सगळं सोडून कोणता उद्योग व्यवसाय केला म्हणजे यश मिळेल हे समजत नाही. मनात मोठा गोंधळ आहे. शिक्षण घेऊन नोकरी मिळाली किंवा गेला बाजार एखादा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि चांगला चालला म्हणजे यश अशी तरुणांच्या ‘यशस्वी आयुष्याची‘ व्याख्या केली जाते. बरं नोकरी अशी तशी नव्हे पॅकेज लाखांत हवे असते...
म्हणजे आजच्या विपरीत परिस्थितीत समाज ज्याला यश म्हणतो, मानतो त्या प्रकारे स्वतःला सिद्ध करण्याची आणि यशस्वी होण्याची सक्ती तरुण मुलग्यांवर लादली गेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलं बापाचं बोट धरून परंपरेने शेती व्यवसाय करू लागायची. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि नोकरी निमित्त दूर परगावी गेलेल्या नोकरदारांच्या मुलग्यांची कोंडी झाली आहे. शेती करण्याची कौशल्ये, क्षमता कमlवलेली नाहीत आणि शिकूनही नोकरी मिळाली नाही.
ज्यांना प्रबोधनकार वगैरे म्हणतात तेच निवृत्ती महाराज देशमुख बेरोजगारी वाढत असल्याबद्दल सरकारांना, राजकीय पक्षांना आणि समाज धुरिणांना एकही प्रश्न न विचारता विचित्र मनोवस्थेत सापडलेल्या तरुणांचा हुरूप न वाढवता उगीचच त्यांना झोडपत आणखी खजील करताहेत. त्यांचे प्रबोधन त्यांना लखलाभ. असो. इथे मुलींना कमी लेखायचे नाहीये. मात्र नापास होणाऱ्या मुलींची तेव्हाही लग्न होत होती. आज निवड करताना मुलींना अधिक चॉइस आहे! मुलग्यांना ही मुभा नाहीये.
देशात इतक्या मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या तरुणांच्या हाताला व्यवस्था काम देण्यात अपयशी ठरलेली आहे. कथित अपयशाचे खापर तरुणांच्या माथ्यावर फोडले जाते आहे. खरे तर दुनियेत होणारे बदल लक्षात घेऊन नोकरी, रोजगार, कौशल्य विकास या अंगाने शिक्षणाची कालसुसंगत मांडणी करण्यात धोरणकर्ते, भविष्यवेत्ते आणि सरकारांना अपयश आले आहे. ‘नोकरीसाठी शिक्षण‘ हे कालबाह्य होत गेलेले तुणतुणे तुम्ही आणखी किती दिवस वाजवत बसणार?
साक्षरतेच्या अंगाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पट मांडताना समजा नोकरी मिळाली नाही तर काहीतरी करता येईल, अशी कोणती क्षमता निर्माण केली, कोणती कौशल्ये तुम्ही मुलांच्या अंगी बाणवली? उठता बसता केवळ मुलांना नाव ठेवून कसे चालेल? शिक्षणाच्या नावाने मुलग्यांची अशी फसवणूक आणखी किती दिवस करणार आहोत आपण? उत्तर कोण देणार? कोणाकडे मागायचे उत्तर?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.