Climate Change : करतोय कोण अन् भोगतोय कोण ? - महारुद्र

Article by Maharudra Mangnale : मी ' हवामान बदल ' या विषयाचा तज्ज्ञ नाही किंवा अभ्यासकही नाही. मी सजग पत्रकार आहे.शेतीत राहातो, शेती करतो.ते अनुभव सातत्याने नोंदवत राहातो.
Climate Change
Climate ChangeAgrowon

Weather Article : मी ' हवामान बदल ' या विषयाचा तज्ज्ञ नाही किंवा अभ्यासकही नाही. मी सजग पत्रकार आहे.शेतीत राहातो, शेती करतो.ते अनुभव सातत्याने नोंदवत राहातो. सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी शेतीतील हे अनुभव फेसबुकवर टाकतो. त्याची पुस्तकं मी प्रकाशित केलीत.त्यामुळं या सगळ्या नोंदी अभ्यासासाठी माझ्याकडं उपलब्ध आहेत.मी शेती कशी करावी, उत्पादन कसं वाढवावं, शेतमालाचा व्यापार कसा करावा, असलं शहाणपण कोणाला शिकवत नाही. कारण शेतकरी हा इतर कोणा मार्गदर्शकापेक्षा अधिक हुषार असतो, असं माझं मत आहे. शिवाय याचा उपयोगही नाही.

मी शेतीतील दुखणी मांडतो. सरकार हे शेतीसमोरचं सगळ्यात प्रमुख आणि गंभीर दुखणं आहे. शेतीमालाला खुल्या बाजारात चांगला भाव मिळू नये,यासाठी सरकार आयात-निर्यातीचा जो खेळ करते,तो भयंकर चीड आणणारा आहे. जगातील कुठलंच सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांविरूध्द अशा खेळी करणार नाही. त्यामुळं सरकार ही पहिली जोखीम आहे. ही टाळणं शेतकऱ्यांना शक्य नाही. दुसरी महत्त्वाची जोखीम आहे, भारतातील मध्यमवर्ग. त्यांना पेट्रोल,डिझेलसह शेकडो चैनीच्या वस्तुंच्या  किमती वाढल्या तरी,तक्रार नसते.या दरवाढीला ते महागाई मानत नाहीत.

मात्र शेतीमालाच्या किमती वाढल्या की,यांच्या डोळ्यातून पाणी येतं.भाजीपाला, अगदी कांदा, लसूणचे भाव वाढले तरी यांचं बजेट कोसळतं आणि हरामखोर मिडीया ओरडू ओरडू हे सांगू लागतो. भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, किती खर्च करावा लागतो, याच्याशी या मध्यमवर्गाला आणि मिडीयाला काहीही देणंघेणं नसतं. ही ओरड सुरू झाली की,लगेच सरकार हस्तक्षेप करून भाव पाडतं.

याचं कारण हा मध्यमवर्ग मतदार म्हणून सरकारला सांभाळायचा असतो.शिवाय आयात-निर्यातीच्या या खेळात केंद्र सरकारला, त्या मंत्र्यांना करोडो रूपये लाच स्वरूपात मिळतात. साहजिकच हे निर्णय रातोरात घेतले जातात. सरकारने हा हस्तक्षेप करू नये,असा दबाव गट अद्याप तरी, शेतकऱ्यांना निर्माण करता आलेला नाही. सरकार व मध्यमवर्गाच्या पापाची फळं वर्षानूवर्षे शेतकरी भोगतोय. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होतेय. खतं,बि-बियाणे, कीटकनाशकं ,मजुरी दरवर्षी वाढतेय. पण सोयाबीन, ज्वारी अशा शेतमालाचे भाव दहा वर्षांपूर्वी जेवढे होते, तेवढेच आहेत.त्यामुळं शेती फायद्याची होणं शक्य नाही.

Climate Change
Climate Change : हवामान बदलाचा करूया कृतिशील सामना

वन्य प्राणी हे शेतीसमोरचं गंभीर संकट आहे. पण सरकारसह समाजही हे मानायला तयार नाही. हरीण, ससे, मोर,रानडुक्कर, सायाळ, वानर, माकड, रानगाई ही काही नावं आहेत. त्या त्या भागात इतरही प्राणी आहेत. या प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण कसं करावं, याचं उत्तर शेतकऱ्यांकडं नाही. काही मुठभर शेतकरी तारेचं कुंपण, झटका मशीन, आवाज करणाऱ्या मशीन असे उपाय योजतात पण सगळ्यांना हे करणं शक्य नाही. शेवटी हे प्राणी कुठल्या ना कुठल्या शेतीतील पिकांचं नुकसान करणारचं. यापैकी कोणत्याही प्राण्यांना मारणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी थेट कारावासाची शिक्षा आहे. त्यामुळं या प्राण्यांना मारता येत नाही. या प्राण्यांनी पिकांचं नुकसान केल्यास, वन विभागाकडे नुकसान भरपाई मागता येते. मात्र ती एवढी तुटपुंजी असते की, भीक नको पण कुत्रा आवर, असं म्हणण्याची पाळी येते. या संकटापुढेही शेतकरी हतबल बनला आहे.

चौथा महत्त्वाचा घटक आहे तो हवामान बदलाचा. हे हवामान बदलवण्यात शेतकऱ्यांचा कदाचित नाममात्र वाटा असेल. जगभरातील बड्या कंपन्या कार्बन वायुचं उत्सर्जन वाढवत आहेत. त्यामुळे हवामानात अचानक बदल होतोय, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्याबाबत शेतकरी काहीच करू शकत नाही. हवामान बदल लक्षात घेऊन शेती करा,असं कथीत तज्ज्ञ सांगत असतात. पण याचा आराखडा कोणाकडंच नाही. यावर्षीचं आमच्या आंब्याचं उदाहरण याबाबतीत बोलकं आहे. सुरूवातीला भरपूर मोहोर लागला. छोटे छोटे आंबेही तयार झाले.

Climate Change
Climate Change : वर्षभरात सहा चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आम्ही आंब्याच्या झाडांची भरपूर काळजी घेतलीय. छोटे आंबे बनण्याच्या काळात झाडांना गांडूळ खत देऊन भरपूर पाणी दिलं. दोन वेळा डि कंपोजरचाही डोस दिला. मित्राने सल्ला दिला म्हणून पहिल्यांदा आंबा गळती होऊ नये व आंबा पोसला जावा यासाठी दोन फवारण्या घेतल्या.वाटलं यावर्षी विक्रमी आंबे होतील.पण अचानक काय घडलं कळायला मार्ग नाही.

आंब्याची जी गळती सुरू झालीय,ती थांबायला तयार नाही. २५पैकी १५ आंब्याच्या झाडांना एकही आंबा राहिलेला नाही. आठ-दहा आंब्यांना थोडे आंबे आहेत. हे बऱ्यापैकी मोठे झालेत. मात्र त्यांचीही गळती थांबलेली नाही. मोठे आंबेही गळत आहेत. पडणाऱ्या आंब्याला कसलाही डाग नाही. चांगल्या स्थितीतील आंबा गळून पडतोय, हे आम्हालाही चकीत करणारं आहे. चार दिवसांपूर्वी २५ मिनीटं झालेला झड पाऊस सोडला तर, यावर्षी गारपीट नाही. मोठा पाऊस, मोठी वादळं नाहीत.

तरीही ही गळती चालू आहे. याआधीची सलग चार-पाच वर्षे पाऊस,गारपीट आणि वादळ होती.तरीसुद्धा अशा पध्दतीची आंबा गळती झालेली नव्हती. ढगाळ वातावरण ही नेहमीची बाब आहे. बऱ्याच आंब्यांना पालवी फुटलीय. यामुळे आंबे गळती होतेय, असं म्हणाव तर, याआधीही असं घडलयं. फुटवा आला म्हणून आंबा गळाला असं याआधी घडलेलं नाही. यावर्षी ही आंबा गळती नेमकी कशाने होतेय, हे कळायला मार्ग नाही. आताची आंबा गळती बघितली तर, दोन-चार रस खाण्यापुरते तरी आंबे शिल्लक राहतात की नाही, याची खात्री देणं कठीण आहे.

अशा विपरीत, प्रतिकूल परिस्थितीत शेती कशी करायची हा माझ्यापुढचा खरा प्रश्न आहे. मला शेती सोडायची नाही आणि रडायचंही नाही. कितीही पैसे खर्च केले तरी, वरील जोखमींमुळे फायदा होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत खर्च कमी करणे, एवढा एकमेव पर्याय माझ्यापुढं आहे. तो कसा कमी करायचा, यावर मी गंभीरपणे विचार करतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com