
डॉ. सूर्यकांत कदम
Animal Husbandry : कुशल व्यक्तीकडून उच्च वंशावळीच्या सिद्ध वळूचे अतिशीत वीर्य कृत्रिम योनिमार्फत संकलित करून, आहे त्या स्थितीत किंवा त्याची मात्रा वाढवून नियमित माजावर आलेल्या मादी जनावराच्या प्रजनन संस्थेत योग्य वेळी व योग्य ठिकाणी कृत्रिम रेतन नळीद्वारे गर्भाशयात सोडण्याच्या पद्धतीला कृत्रिम रेतन असे म्हणतात. आज भारतात वाढलेले दुग्धोत्पादन हे कृत्रिम रेतनाचेच फलित आहे. जास्त दूध देणाऱ्या परदेशी वळूचे वीर्य हे देशी गायीमध्ये १०० टक्के, ७५ टक्के, ५० टक्के अशा प्रमाणात वापरले जाते. प्रामुख्याने कृत्रिम रेतनासाठी गाईमध्ये जर्सी, होल्स्टिन फ्रिजियन आणि म्हशीमध्ये मुऱ्हा, सुरती यांच्या वीर्याचा वापर केला जातो. गायीमध्ये कृत्रिम रेतन मोठ्या प्रमाणावर केले जाते. याशिवाय म्हशी, शेळी, मेंढी, वराह यांच्यातही कृत्रिम रेतन केले जाते.
कृत्रिम रेतन केल्यानंतर घ्यावयाची काळजी
कृत्रिम रेतन केल्यानंतर क्लिटोरिस जवळ थोडा वेळ मसाज केल्यास गर्भ धारणेचे प्रमाणात वाढ होते.
कृत्रिम रेतनानंतर वापरलेल्या रेतकांडीवरील वळू क्रमांक, वळू जात, सीमन स्टेशन, वर्ष तसेच रेतन केलेली वेळ, तारीख आणि ४५ दिवसांनंतर गर्भतपासण्याची तारीख यांची नोंद वहीत लिहून ठेवावी.
रेतनानंतर जनावरांना १५ मिनिटे विश्रांती द्यावी, उत्तेजित करू नये, त्यानंतरच मोकळे सोडावे.
माजावर आलेल्या तसेच कृत्रिम रेतन केलेल्या जनावरांना मारू नये.
कृत्रिम रेतन केल्यानंतर जनावराच्या अंगावर गार पाणी टाकावे.
कृत्रिम रेतन केलेल्या गायी जर २१, ४२ व ६३ दिवसांनंतर परत माजावर आल्या नसतील तर गाभण असण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी तज्ज्ञ पशू वैद्यकीय अधिकाऱ्याकडून गाईची तपासणी करावी.
जनावरे गाभण नसतील तर लगेचच उपचार चालू करावा आणि गाभण असतील तर शास्त्रोक्त पद्धतीत आहार चालू करावा आणि देखभाल घ्यावी.
कृत्रिम रेतनाचे फायदे
जास्त दूध देण्याची आनुवंशिक क्षमता असलेल्या वळूंचा उपयोग करता येतो.
एका चांगल्या वळूने एका वर्षांत ५० ते ६० गायी भरवता येतात पण कृत्रिम रेतनाने वर्षाला दहा हजार गायींना रेतन करू शकतो.
प्रत्येक गोपालकास वळू ठेवण्याची गरज भासत नाही, त्यामुळे वळू पोसण्याचा खर्च वाचतो. (कृत्रिम रेतनाचा खर्च वळू पोसण्याच्या खर्चापेक्षा बराच कमी असतो.)
नैसर्गिक प्रजननाने पसरणारे जननाचे रोग कृत्रिम रेतनाने पसरत नाहीत.
नैसर्गिक प्रजननात वळूचे वीर्य अयोग्य असल्याचे लवकर लक्षात येत नाही, परंतु कृत्रिम रेतनात वीर्याची अगोदर तपासणी केली जाते.
जखमी, मोठ्या वळूंचाही उपयोग करता येतो.
अयोग्य वळूस त्वरित बाहेर काढता येते. त्यामुळे भविष्यातील हानी टाळता येते.
गाय माजावर आल्यावर मालकाला वळू शोधण्याची गरज पडत नाही.
वेगवेगळ्या लहान, मोठ्या आकाराच्या जनावरांमध्ये उपयुक्त तंत्रज्ञान आहे.
गर्भधारणा होण्याची निश्चिती असते.
वळूचे वीर्य परदेशात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून जनावरास रेतन करता येते.
कृत्रिम रेतनाच्या मर्यादा
कुशल व प्रशिक्षित व्यक्तींची आवश्यकता असते. स्वच्छ व निर्जंतुक उपकरणांची आवश्यकता असते.
या पद्धतीमुळे वळूचे महत्त्व कमी होते. बाजारात त्यांची किंमत कमी होते.
जुन्या चालीरीती आणि अज्ञानामुळे ग्रामीण भागात यावर मर्यादा आहेत.
डॉ. सूर्यकांत कदम, ९६२३८४०४७०
(पशू प्रजनन व प्रसूतिशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.