Chemical Pesticides : रासायनिक कीटकनाशके आपल्या शरीरात येतात कोठून?

रासायनिक कीटकनाशकांच्या निर्मितीपासून ते निर्माल्यापर्यंतच्या प्रवासावर या लेखमालिकेत प्रकाश टाकण्यात येईल. कीटकनाशकांचे मुख्यतः दोन प्रकारे दुष्परिणाम जाणवतात.
Pesticide
Pesticide Agrowon

गेल्या महिन्यात केरळ उच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिर (Shanrimala Temple) ट्रस्टला ते भक्तांना वाटत असलेला प्रसाद थांबवण्याचे आदेश दिले. असं काय झालं, की न्यायालयाला चक्क देवाचा प्रसाद थांबवण्याचे आदेश द्यावे लागले.

त्याचं झालं असं, की एका ‘एफएसएसआय’ प्रमाणित प्रयोगशाळेने शबरीमाला मंदिरातील प्रसादाचे नमुने तपासले. तपासाअंती हा प्रसाद विषारी असल्याचं दिसून आलं. या प्रसादात त्यांना कीटकनाशकांचे अंश मोठ्या प्रमाणात सापडले.

प्रसाद बनवायला जो वेलदोडा (Cardamom) वापरला गेला त्यामधून ही कीटकनाशकं प्रसादात आल्याचं लक्षात आलं. ठेकेदाराने जे वेलदोडे पुरवले होते, त्यामध्ये १४.०४ मिलिग्रॅम प्रतिकिलो डायथायोकार्बामेट मिळाले.

एमआरएल म्हणजे मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट. एखाद्या पदार्थात जास्तीत जास्त किती रासायनिक कीटकनाशके (Chemical Pesticide) असावीत त्यानुसार हे प्रमाण ठरते. या मानकानुसार डायथायोकार्बामेटचे प्रमाण ०.०१ मिलिग्रॅम प्रतिकिलोपेक्षा कमी असायला हवे होते.

म्हणजे मर्यादेपेक्षा हजार पट जास्त डायथायोकार्बामेट प्रसादात सापडले. त्याव्यतिरिक्त दुसरे कीटकनाशक सायपरमेथ्रीनचे प्रसादातील प्रमाण हे १.१० मिलिग्रॅम आढळले. जे की ०.०१ मिलिग्रॅम प्रतिकिलोपेक्षा कमी असणे अपेक्षित होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशके मिळून सुद्धा, ठेकेदाराचा कोर्टात दावा होता, की प्रसादात अत्यल्प प्रमाणात वेलदोडे टाकले जातात. प्रसाद बनवताना २०० अंश तापमानाला ते तापवले जातात. एवढ्या तापमानात कीटकनाशके कशी टिकतील? पण एक गोष्ट ते विसरले,

की सायपरमेथ्रीन २२० अंश तापमानापर्यंत तापवलं तरी विघटित होत नाही. अगदी गुगल केलं तरी ही माहिती मिळू शकते. बऱ्याचदा विघटन झालेल्या कीटकनाशकाचे मेटॅबोलाइट देखील नुकसान पोहोचवतात. सायपरमेथ्रीनपेक्षा त्याच्या विघटनातून तयार होणारे मेटॅबोलाइट जास्त विषारी असतात, हे संशोधनांती सिद्ध झालंय.

हे मेटॅबोलाइट म्हणजे काय भानगड आहे हे समजून घेऊया. मेटॅबोलाइट म्हणजे कीटकनाशकाचे होणारे संभाव्य तुकडे. थोडक्यात, सांगायचे झाल्यास एखाद्या कीटकनाशकाचे तुकडे होत होत शेवटी पाणी, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनसारख्या मूळ घटकांपर्यंत त्याचे विघटन होणे.

हे तुकडेसुद्धा बऱ्याचदा घातक असतात. किंबहुना, मूळ कीटकनाशकापेक्षा ते जास्त विषारी असू शकतात. प्रयोगशाळेत तपासताना आपण कीटकनाशकांचे अंश शोधत असतो, पण त्यांचे मेटॅबोलाइट मात्र त्यातून सुटतात.

युरोप, अमेरिकेत कीटकनाशकांच्या अंशांबरोबर त्यांचे मेटॅबोलाइटचे प्रमाणदेखील तपासले जाते. वेगवेगळ्या देशात कीटकनाशकां एमआरलचे प्रमाण ठरलेले आहे. भारतात साधारणतः २६८ शेती रासायनांचे अंश तपासले जातात. हीच यादी युरोपमध्ये आठशेच्यावर जाते.

Pesticide
Fertilizer Stock : सातारा जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा

आपण म्हणाल या कीटकनाशकांचे नक्की काय परिणाम होतात? हे जाणून घेण्यासाठी त्या कीटकनाशकाची किड्यांवर काम करण्याची पद्धत लक्षात घ्यावी लागेल. काही कीटकनाशके पोटविष प्रकारात मोडतात.

काही हवेतून किड्याच्या श्‍वसनसंस्थेमार्फत हल्ला करतात तर काही त्याच्या संपर्कात आल्यावर किड्याच्या त्वचेमधून जाऊन विषारी गुणधर्म दाखवतात. जसे ते किड्याच्या पोटात, त्वचेवर आणि श्‍वसनसंस्थेवर हल्ला करतात, त्याच पद्धतीने माणूस आणि पशुपक्ष्यांवर देखील दुष्परिणाम घडवतात.

कीटकनाशकांचे मुख्यतः दोन प्रकारे दुष्परिणाम जाणवतात. पहिला ॲक्यूट, म्हणजे तीव्र. त्यांचा लगेच दुष्परिणाम जाणवतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे क्रोनिक म्हणजे दीर्घकालीन. ज्यामध्ये खूप दिवसांनी, महिने किंवा वर्षांनी उद्‍भवणारे दुष्परिणाम.

पहिल्या प्रकारात उलटी, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे यांसारखी लक्षणं दिसतात. दीर्घकालीन परिणामात कॅन्सर, जन्मदोष, वांझपणा, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, अल्झायमर, लठ्ठपणा, ल्युकेमिया, पार्किन्सन यासारखे रोग उद्‍भवतात. एवढंच नाही, तर मधुमेहाच्या जागतिक पँडेमिकमध्ये कीटकनाशकांचा मोठा सहभाग आहे.

हे रसायनांचे अंश येतात तरी कुठून? आणि पसरतात कसे? तर याचं उत्तर आहे अन्न, पाणी आणि हवेतून. माणसाच्या पंचेंद्रियांवर बाहेरून येणार विष काम करतं.

तोंड, नाक आणि त्वचेद्वारे ते शरीरात प्रवेश करतात. (तुम्ही विचाराल की डोळे आणि कानांचे काय? तर त्यांच्याद्वारेही नको असलेले विचार आणि दृश्य मेंदू जातात. ते ही एका प्रकारचं विषच आहे की.)

आता हे विष अन्नात कुठून येतं ते पाहूया. तुम्ही म्हणाल कीटकनाशकांचे अंश शेतातून येतात तर ते पूर्णसत्य नाहीये. आपल्याभोवतीच्या कीटकनाशकांच्या विषारी जाळ्याला फक्त शेतात फवारलेली कीटकाशके आणि खते जबाबदार आहेत, असं नाहीये.

शेतातून पीक बाहेर पडल्यावर पुढे काढणीपश्‍चात प्रक्रियेत, साठवणुकीदरम्यान वापरलेली रसायने देखील येतात. पुढे जाऊन खाद्यपदार्थांच्या प्रक्रियेत देखील ही रसायने येतात.

दुभत्या जनावरांच्या अंगावर रासायनिक कीटकनाशकांचा आठवडी किंवा मासिक फवारा पडतो. किड्यांपासून सुटका होण्यासाठी इंजेक्शन मारले जाते. एवढेच नाही, अनेक ठिकाणी दूध काढण्याआगोदर पान्हवण्यासाठी इंजेक्शन टोचून दूध काढले जाते.

भेसळबहाद्दर फॅट वाढवण्यासाठी त्यामध्ये युरिया आणि अजून काहीबाही रसायने टाकले जातात. युरिया काय फक्त शेतात पडत नाही तर दुधाच्या कॅनमध्ये देखील पडतो.

या प्राण्यांना खाऊ घातल्या जाणाऱ्या चाऱ्यावरदेखील रासायनिक कीटकनाशके पडतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या शरीरातून दुधामार्फत किंवा माणसामार्फत हे रसायन महाराज आपल्या ताटात अवतरतात.

सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत ताजे भाजीपाले आणि फळे खाणे कमी झालेय. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाण्याची फॅशन झालीये.

ताज्या पदार्थाला टिकवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह वापरले जातात. नैसर्गिक रंगाला अव्हेरून कृत्रिम रंगात रंगलेले पदार्थ खाल्ले जाताहेत. त्यामुळे अजून जास्त रसायने ताटात येऊन पडताहेत.

अजून एका चोरवाटेने रासायनिक कीटकनाशके आपल्या घरात येतात, ते म्हणजे घरात केले जाणारे पेस्ट कंट्रोल. नैसर्गिक प्रायरेथ्रीन आणि बॅसिलस थुरिंजिनसिसी इस्रालिन्सिस (बीटीआय) सोडल्यास जैविक कीटकनाशकाची भारतात सीआयबीद्वारे शिफारस केलेली नाही.

सेंद्रिय भाजीपाला आणि दूध ज्या किचनमध्ये वापरले जातात, त्याच स्वयंपाकघरात मुंग्या, झुरळांच्या नियंत्रणासाठी फिफ्रोनील, इमिडाक्लोरीड, सायपरमेथ्रीन यांसारखे रासायनिक कीटकनाशके मानाने येऊन बसतात.

भाजीपाला, फळे, मांस अंडी यांसारख्या अन्नातून कीटकनाशके आपल्या शरीरात येतातच पण ते पाण्यात देखील येतात. वापरलेली कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबर नदी-नाल्यांत पोहोचतात. जमिनीत झिरपून ते भूजल प्रदूषित करतात.

हेच प्रदूषित पाणी आपल्या घरात येते. नदी, धरण, विहिरीतून आपल्या घरात येणारे पाणी गाळले जाते, त्याच्यावर तुरटीची प्रक्रिया केली जाते. त्याचा सामू, पाण्याचा जडपणा आणि ईसी तपासला जातो. परंतु त्यातील रसायनांचे अंश तपासले जात नाही.

याचबरोबर हवेत पसरलेल्या रसायनांचा फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो. अशा प्रकारे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी रसायने पोहोचली आहेत. हे रासायनिक व्हिलन देवाप्रमाणे सर्वव्यापी झाले आहेत.

Pesticide
Fertilizer : पुण्यासाठी रासायनिक खते उपलब्ध

कीटकनाशकांचा परिणाम फक्त माणसावरच होत नसून पशु, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव, जलचर, किडेमुंग्या यांच्यावर देखील होतो. गाई-म्हशींवर फवारलेल्या कीटकनाशकांचे अंश त्यांच्या रक्तात उतरतात.

रक्तातून ते दुधात, दह्यात आणि तुपातदेखील पोहोचतात. काही ठिकाणी कोंबड्यांना हार्मोन्सची इंजेक्शन्स वापरली जातात. अनेक ठिकाणी मुलींमध्ये वेळेआधी मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते.

अँटिबायोटिक टोचलेल्या जनावरांचं मांस खाणाऱ्या गिधाडांवर त्यांचा कुप्रभाव जाणवायला लागलाय. गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या रोडावतेय. जलचरांवरदेखील कीटकनाशकांच्या अंशाचा विपरीत परिणाम होतोय. माश्यांच्या बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.

शेतात फवारले जाणारी कीटकनाशके जरी शत्रूकिड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी वापरले असले तरी हे रसायने मित्र किड्यांवर देखील वार करतात.

परत जेव्हा शत्रूकीड येते तेव्हा तिला विरोध करायला मित्रकीड नसते. अशा परिस्थितीत जास्त नुकसान होते. मधमाशी, गांधीलमाशी रसायनग्रस्त झाल्या आहेत.

मित्रांनो, रासायनिक कच्चा माल वापरून फॅक्टरीत तयार झालेले रासायनिक कीटकनाशकांचे उत्पादन, रजिस्ट्रेशन, वापर यापासून ते विघटन होऊन कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि पाणी अशा मूळ पदार्थात निर्माल्य होईपर्यंतच्या प्रवासाची माहिती या लेखमालिकेतील लेखांत आपण घेणार आहोत.

(लेखक कृषी रसायन विषयातील जाणकार असून, ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक आहेत. ) ९९२२४५९७८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com