Marking Seeds : बिब्ब्यांच्या बिया बागेत आल्या कोठून?

Article by Maharudra Mangnale : पक्षी झाडावर बसलेले, चिकू,आंब्याच्या कैऱ्या खात असलेले,एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडताना मधूर स्वरात एकमेकांना साद घालताना दिसतात.
Marking Nut Tree
Marking Nut TreeAgrowon
Published on
Updated on

महारुद्र मंगनाळे

पक्षी झाडावर बसलेले, चिकू,आंब्याच्या कैऱ्या खात असलेले,एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडताना मधूर स्वरात एकमेकांना साद घालताना दिसतात. क्वचित त्यांचा कलकलाटही कानावर येतो. पण हे पक्षी एकमेकांशी भांडताना कधी दिसत नाहीत. उन्हाळा तीव्र होतोय तशी रुद्रा हटच्या बागेतील नव-नव्या पक्षांची संख्या वाढताना दिसतेय. सतत कुठल्या ना कुठल्या पक्षाचा आवाज कानावर येतोच.

बागेत फळझाडं आहेत, पाणी आहे, त्यामुळे त्यांचा रुद्रा हटवरचा वावर नैसर्गिकच म्हणावा लागेल. परवा बागेत आलेला एक मित्र बोलला,ही पाखरं चिकूचं आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करताहेत. यांचा काही तरी बंदोबस्त कर बघ..नाही तर तुझ्या हाताला काहीच लागणार नाही. मी त्याला हसत म्हटलं, आम्हाला खाण्यापुरती फळं ते नक्की ठेवतील, तू चिंता करू नको. मात्र हवामान बदलामुळे होणारं नुकसान मी थांबवू शकत नाही, त्याचं काय? 

बागेत येणाऱ्या पक्ष्यांना हाकलून लावण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही...त्याचं असणं म्हणजेच तर बाग..पक्ष्यांशिवाय बाग? ती कसली बाग?... शिवाय मला या फळांचे पैसे करायचे नाहीत! थोडीशी खायला मिळावीत एवढाच हेतू आहे.

तो मित्र म्हणाला, तुला काही सल्ला न देणंच चांगलं. मी म्हटलं, नक्कीच. मी न मागता कोणी सल्ला दिला तर मला त्याचा राग येतो. शिवाय माणसांपेक्षा पाखरांसोबत जगणं किती आनंददायी असतं ,ते तुला कसं कळणार? त्यानं वाद वाढवला नाही.

Marking Nut Tree
Women Unity : सामूहिक शेतीतून महिलांचे एकीचे बळ

काल बागेत फिरताना मला जागोजाग बिब्याच्या काळ्या बिया दिसत होत्या. या बिया बघून मी चकीत झालो. सगळीकडंच्या बिया गोळा केल्या तर त्या दोनशेपेक्षा अधिक भरतील. या बियांची समोरची पिवळी फुलं पाखरांनी खाल्लेली दिसत होती. मला दोन प्रश्न पडले.या बिया कोणत्या पक्षांनी आणल्या? आणि कोठून आणल्या? 

तसं तर बिब्बा हे माझं आवडीचं फळं. आमच्या वीस वर्षांपूर्वीच्या शेतात(ते शेत विकलयं) बिब्बीची पाच-सहा झाडं होती. या झाडांना मोहोर लागला की,छोटी छोटी हिरवी फळं तयार होतात. ती परिपक्व होऊ लागतात तेव्हा मागचा गराचा भाग पिवळसर बनतो आणि बी काळं होतं. पिवळेजर्द बिब्बे काढून आणण्याचं काम मी पाचवी ते बी.ए.असं सलग दहा वर्षे तरी निष्ठेनं केलं असावं. घरात सगळ्यांनाच बिब्बे आवडायचे. आठवणीने आणणारा मीच होतो.

बिब्बीची झाडं कमी उंचीची असतात. झाडावरील फांद्या-फांद्यांवर जाऊन बिब्बे काढायचे. समोरचं बी फिरवून काढायचं नि पिवळे बिब्बे एखाद्या गवताच्या काडीत किंवा वेलीत ओवून आणायचे. हे बिब्बे भाजून छान लागतात.पुरणासारखे. पण जास्त खाल्ले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वाळवून पुन्हा सवडीने खाणं व्हायचं. उन्हाळ्यात ही आवडीने खाल्ली जातात. या काळ्या बिब्ब्यातील तेल तीव्र असतं. अंगावर पडलं की ऊततं.त्याची जखम होते. पायात काटा मोडला नि तो निघत नसेल तर,ती जागा टोकरून सुईने तिथं बिब्याचं तेल सोडत. त्यामुळं काट्याची ठणक कमी व्हायची. पुढे काटाही बाहेर यायचा.

बऱ्याचदा बिब्बा नसेल तर रूचकीचं दुध वापरलं जाई. याचा अनुभव मी अनेकदा घेतलाय. या तेलाने सुप, दुरड्याही सारवल्या जात. या काळ्या बियात निघणारी पांढरी,थोडीशी पिवळसर गोडंबी चवदार व पौष्टिक असते. भोई समाजाच्या स्त्रिया ती गोडंबी विकत. सातवीत असताना हे बिब्बे फोडून गोडंब्या काढल्याचा प्रसंग आजही जसाच्या तसा स्मरणात आहे.बिब्बे फोडल्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही हात, पाय व चेहऱ्यावर तेल ऊतलं. जखमा झाल्या. बराच त्रास झाला. त्यानंतर पुन्हा काळ्या बिब्ब्यांच्या वाटेला गेलो नाही.

Marking Nut Tree
Success Story : फळांची टिकवणक्षमता वाढवणारा युवकांचा ‘स्टार्ट अप’

शेती विकल्यानंतरही दोन-चार वेळा त्या बिब्बीचे बिब्बे काढून आणले. बहुतेक २०१६ला शेवटचं गेलो. नंतर शेतमालकाने बिब्बीचं झाडं तोडल्याचं कळलं. २०२०-२१मध्ये कोरोना काळात हर्ष, गबरूला घेऊन त्या भागात फिरायला जायचो. शिवेपलिकडं  दोन छोटी बिब्बीची झाडं होती. ते बिब्बे तीन-चार वेळा आणले. बिब्बा आवडता असूनही, त्याचं एकही झाड आपल्याकडं नाही, याची खंत मी बऱ्याचदा व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच मी सविताला म्हटलं होतं की,येत्या पावसाळ्यात मी दोन-चार बिब्बीची रोपं लावणार. नर्सरीत ही रोप मी बघितलेली नाहीत. काळ्या बिब्ब्यापासून रोप तयार करणं हाच पर्याय होता. मी बियाच्या शोधात होतो...आणि  योगायोग बघा..कमीत कमी २००बिया पक्ष्यांनी बागेत आणून टाकल्यात. किती रोपं तयार करू मी याची?

पक्षांनी या बिया बऱ्याच लांबून आणलेल्या आहेत. मी आमच्या शेताच्या चारही बाजुने शोध घेतलाय.दिड किलोमिटरच्या परिघात तरी, बिब्ब्याचं झाडं नाही. शिवाय एवढ्या बिया काही एकटा-दुकटा पक्षी आणणं शक्य नाही. या काळ्या बियांच्या बाजुला पिंपळाची फुलं ही मोठ्या प्रमाणावर पडली आहेत.

हे मोठं सुचक होतं. पिंपळाची फळ खायला बाहेरून मोठ्या संख्येने फक्त वटवाघूळ आले होते.रात्री पिंपळावरून बागेतील झाडांवर ते फिरत होते. त्यांनी बिब्बे आणि पिंपळाच्या फळांचा एकत्रित नाष्टा केला असावा. याचा कालावधीही जुळणारा होता. मी या निर्णयाप्रत आलो की,हे वटवाघूळाचंच काम असावं!

मी यासंदर्भात अंबाजोगाईचा मित्र सुर्यकांत पाटील याच्याशी चर्चा केली तेव्हा त्याने खात्रीच दिली की,हे वटवाघूळांचंच काम आहे. मला प्रश्न पडलाय की,तेवढ्या लांबून बिब्बे इथं आणून खाण्याचं त्यांचं काय प्रयोजन असावं? बिब्बे त्याच झाडावर वा परिसरात खायला हवेत...इथंपर्यंत त्यांनी ते का आणले? की त्यांना कळलं की,मी बिब्ब्याच्या बियांच्या शोधात आहे म्हणून? की महादेवानं पाठवलं? चमत्कार वाटावे असे योगायोग असतात हे!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com