Silk Farming : रेशीम कोष उत्पादनासह तुती रोप विक्री व्यवसायात यशस्वी वाटचाल

Silk Farming in Maharashtra: हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा देववाडी (ता. कळमनुरी) येथील सुधाकर पंडित हे रेशीम कोष उत्पादन, तसेच तुती रोपवाटिकेद्वारे रोपे निर्मिती विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

शेतकरी नियोजन ः रेशीम शेती
शेतकरी ः सुधाकर पंडित
गाव ः देववाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
एकूण क्षेत्र ः ५ एकर
तुती लागवड ः ३ एकर
तुती रोपवाटिका ः २ एकर

Silk Worms : हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा देववाडी (ता. कळमनुरी) येथील सुधाकर पंडित हे रेशीम कोष उत्पादन, तसेच तुती रोपवाटिकेद्वारे रोपे निर्मिती विक्रीचा व्यवसाय करत आहेत. देववाडी शिवारात त्यांची पाच एकर पडीक, माळरान जमीन होती. त्यापैकी दीड एकरांवर २०१२ मध्ये तुती लागवड केली. रेशीम कीटकांसाठी ३० बाय १५० फूट आकाराचे संगोपनगृह तयार केले. पहिल्या वर्षी प्रत्येकी २०० अंडीपुंजाच्या तीन बॅचपासून ५ क्विंटल रेशीम कोष उत्पादन मिळाले. रेशीम कोष उत्पादनातून खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्यामुळे २०१४ मध्ये त्यांनी तुती लागवडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आणखी ३ एकरावर तुती लागवड केली.

संगोपनगृहातील रेशीम कीटकांच्या रॅकची संख्या वाढविली. सध्या ते वर्षभरात प्रत्येकी २५० ते ३०० अंडीपुंजांच्या ६ ते ७ बॅच घेत आहेत. त्यातून वर्षाकाठी १० क्विंटलपर्यंत कोष उत्पादन मिळते. कोरोना काळात लॉकडाउनमुळे विक्रीमध्ये अडचणी आल्या. कमी दराने कोषाची विक्री करावी लागले. मात्र, खचून न जाता पंडित यांनी रेशीम कोष उत्पादनात सातत्य राखले आहे.

Silk Farming
Silk Farming : रेशीम व्यवसायात पायवाट केली भक्कम

तुती बाग व्यवस्थापन ः
- रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होण्यासाठी तुतीच्या व्ही वन या वाणाची लागवड केली आहे. संपूर्ण लागवड ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर आहे.
- तुती बागेस ठिबक संचाद्वारे पाणी दिले जाते.
- रेशीम कीटकांच्या बॅचच्या नियोजनानुसार तुती बागेची छाटणी केली जाते. जेणेकरून रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होईल.
- प्रत्येक छाटणीनंतर १५ः१५ः १५ तसेच डीएपी खतांच्या मात्रा दिल्या जातात.
- काटेकोर व्यवस्थापनातून तुतीच्या सकस पाल्याचे उत्पादन मिळते. परिणामी दर्जेदार कोष उत्पादन मिळत आहे.

संगोपनगृहाचे व्यवस्थापन ः
पुरेशा प्रमाणात तुती पाला उपलब्ध होत असल्यामुळे वर्षातील १२ महिने कोष उत्पादन सुरू असते. विविध ऋतूमध्ये रेशीम कीटकांच्या वाढीसाठी संगोपनगृहात आवश्यकतेनुसार बदल केले जातात. संगोपनगृहात योग्य तापमान राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. उन्हाळ्यात छतावर ठिबकद्वारे पाणी सोडले जाते.

कोष विक्री नियोजन ः
सुरवातीच्या काळात कर्नाटकमधील रामनगरम येथील मार्केटमध्ये रेशीम कोष विक्रीसाठी पाठविले जात असे. त्यानंतर तेलंगणातील जनगाव येथे कोष विक्री करण्यास सुरुवात केली. मात्र मागील काही वर्षांपासून पूर्णा (जि. परभणी) आणि जालना येथील रेशीम कोष मार्केटमध्ये कोषाची विक्री करत आहेत.

तुती रोपवाटिका ः
- दिवसेंदिवस रेशीमशेतीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. राज्याच्या विविध भागांतून रोपांची मागणी अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन पंडित यांनी तुती रोपे निर्मितीवर भर दिला आहे. तुती रोपांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी २०१९ मध्ये १ एकरावर तुती रोपवाटिका सुरू केली.
- सध्या जानेवारी आणि सप्टेंबर असे वर्षातून दोन वेळा रोपनिर्मितीसाठी तुती खुंटाची लागवड केली जाते.
- रोपवाटिकेसाठी वाफे तयार करून त्यात ६ इंच अंतरावर तुती बेण्याच्या खुटांची लागवड केली जाते. खुंट लागवडीपूर्वी जमीन तयार करताना ऊस मळीचा वापर केला जातो. त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. दोन एकरातून तुतीची २ ते २.५ लाख रोपे तयार केली जातात.
रोपे उपटण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. जेणेकरून रोपे उपटताना रोपांच्या मुळांना इजा होणार नाही. मागणीनुसार रोपांच्या जुड्या बांधून त्यांची विक्री केली जाते.नोकरी करत शेतीवर लक्ष ः
सुधाकर पंडित व त्यांच्या पत्नी वर्षा पंडित हे कृषी विभागात कृषी सहायक पदावर कार्यरत आहेत. पंडित दांपत्य मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तव्यास आहे. सुधाकर यांच्या आई रेश्माबाई या शेतातील घरामध्ये राहतात. पंडित दांपत्य आठवड्यातील प्रत्येक शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ शेतावर जातात. तुती बागेस पाणी, खते देणे, रेशीम कीटकांना खाद्य देणे, कोष काढणीसह अन्य कामे स्वतः करतात. शिवाय बागेचे व्यवस्थापन आणि रेशीमकीटकांच्या व्यवस्थापनासाठी एक सालगडी ठेवला आहे. रेशीम शेती, तुती रोपवाटिकेसह अन्य शेती कामांसाठी वर्षभर आवश्यकतेनुसार महिला मजूर लावले जातात.

मागील कामकाज ः
- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुती बागेची छाटणी केली आहे.
- त्यानंतर आंतरमशागतीची कामे करून शेणखताची मात्रा दिली. शिवाय डीएपी आणि १५ः१५ः१५ या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. त्यानंतर २५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली.
- आंतरमशागत आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापरामुळे तुती बागेची चांगली वाढ झाली आहे. दर्जेदार पाने उपलब्ध झाली आहे.
- जानेवारीत लागवड केलेल्या रोपवाटिकेतील तुती रोपांना पाणी दिले. रोपवाटिकेत मजुरांच्या मदतीने तण व्यवस्थापन केले.
- मे महिन्यापासून रोपाची विक्री सुरू झाली आहे.


आगामी नियोजन ः
- नवीन बॅच घेण्यासाठी रेशीम कीटक संगोपनगृहाची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण केले जाईल.
- नवीन बॅचसाठी २५० अंडीपुंजाची (चॉकी) आगाऊ मागणी नोंदविली आहे.
- साधारण २५ जुलै दरम्यान नवीन बॅच सुरू केली जाईल.
----------------
सुधाकर पंडित, ९३७०५७५१४४
(शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com