Climate Change : वातावरण बदलामुळे अन्नसुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह

Agriculture Effect : वातावरण बदलाच्या समस्येमुळे मानवी आरोग्य आणि शेती यावर मोठा परिणाम होत आहे. त्याचा अन्न व पोषण सुरक्षा यांच्याशी थेट संबंध आहे, भविष्यात ही जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात.  
Climate Change Issues
Climate Change Issues Agrowon

Climate Change Effects on Agriculture : सध्या उन्हाने त्रस्त झालेल्या जिवांना पावसाची आस लागली आहे. कधी एकदाचा पाऊस येतोय आणि थंडावा पसरतो, असं झालं आहे. रानात करवंद-आंबे-कोकम-फणस मुबलक असले तरी या उन्हामुळे कशाचाच रसास्वाद घेता येत नाही. उलट आजार, तणाव वाढत आहे. इतक्या उन्हाच्या चढत्या तापमानात वेगळेच आजार डोके वर काढत आहेत. या आजारांचा थेट संबंध वाढत्या तापमानाशी आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

कसेही करून स्वतःला थंड ठेवण्यासाठी पंख्यांच्या ऐवजी कुलर, ए.सी. असे उपाय केले जातात, पण त्यामुळे येणारे विजेचे बिल व पर्यावरणावर होणारा परिणाम बघता तो शाश्‍वत उपाय नाही. वातावरण बदल प्रत्यक्षात अनुभवायला येत आहे. झाडे लावा, वातावरण बदलाशी सामना करण्यासाठी कर्ब उत्सर्जन कमी करण्याचे उपाय करा, वातावरण बदलाशी सामना करू शकेल अशी पिके व त्यांची बियाणे जतन करा, असे वारंवार ऐकले होते. ज्यांना याची जाणीव होती त्यांनी आपापल्या परीने उपाय योजले. पण आपल्या देशात अजूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

मागच्या लेखात आपण शाश्वत अन्न ही संकल्पना समजून घेतली होती. वातावरण बदलाच्या समस्येमुळे मानवी आरोग्य, शेती यावर काय परिणाम होत आहेत आणि त्याचा अन्न व पोषण सुरक्षा यांच्याशी काय संबंध आहे, भविष्यात त्याची जोखीम कमी करण्यासाठीच्या उपाययोजना याचा ऊहापोह आज करू.

आपल्याकडे शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर होते. खरिपात भात-बाजरी-नाचणी-ज्वारी व काही कडधान्ये घेतली जातात. रब्बीमध्ये गहू, कडधान्ये घेतली जातात. आपल्या देशातील संपूर्ण अन्नसुरक्षा या शेती हंगामावर अवलंबून असते. पाऊस चांगला व नियमित झाला तर पिके उत्तम येतात. पण अलीकडच्या काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. कधी अवेळी पाऊस येतो तर हवे तेव्हा दडी मारतो, याचा परिणाम थेट पिकांच्या उत्पादकतेवर होतो.

उदाहरणार्थ, २०२३ चा पावसाळा इतका तुटक होता की अनेक भागांत त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. त्यामुळे धान्यांचे उत्पादन घटले. याचा परिणाम भाववाढीत झाला. ज्वारी, बाजरी, तांदूळ हे दैनंदिन आहारातील घटक महागले. महागाई वाढली की आहारावरील खर्चात कपात केली जाते आणि त्याचा परिणाम पोषण व जीवनमानावर होत असतो.

दुसरे उदाहरण देता येईल ते लिंबाचे. जेवणाची चव वाढवणारा लिंबू आपण नियमित वापरतो. याशिवाय लिंबू सरबत व लिंबाचे गोड-तिखट लोणचे हा आपल्या आहाराचा नियमित घटक. मागच्या काही महिन्यांपासून बाजारातून लिंबू एकतर गायब झाला किंवा अतिशय निकृष्ट (आकार व गुणवत्ता) दर्जाचे लिंबू चढ्या भावात विकत घ्यावे लागतात. माझ्या भावाच्या- साहेबराव गोपाळे याच्या- गावात खूप वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लिंबाची शेती केली जाते. जसे पेरू, आंबे, द्राक्ष यांची बाग असते तसे इथे लिंबोणीची बाग असते. गावात प्रत्येकाच्या घरी दोन-चार एकरची बाग. साधारण ४० वर्षांपूर्वी लिंबू बागांचे प्रमाण मोठे होते. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील त्याच्या गावाचे नाव ‘लिंबगाव’ नंतर झाले की आधीच होते माहीत नाही.

Climate Change Issues
Climate Changes : बदलत्या हवामानात लागवड तंत्रही बदला

साहेबराव सांगतो, “लिंबाचे पीक हे खूप सोपे होते. शेणखत, शेण-गोमूत्र स्लरी बागांना दिली जायची. १५ दिवसांतून एकदा पाणी भरले की याला पुरेसे असायचे. वर्षातून दोनदा बहर धरला जायचा. पिकून खाली पडलेलीच फळं गोळा करायची. तेव्हा भाव कमी असायचे तरीदेखील ही शेती परवडायची. पण मागच्या १० वर्षांत रोगांचे प्रमाण वाढले, रासायनिक फवारण्या वाढल्या. पाण्याची गुणवत्ता देखील ढासळली. अति उष्णतेमुळे झाडांवर रोग जाऊ लागली, फळे निकृष्ट लागली व भाव जास्त मिळत असला तरी ते परवडत नाही, म्हणून आता गावात १० टक्क्यांपेक्षा कमी बागा शिल्लक आहेत. त्याही अजून किती काळ राहतील, हा प्रश्‍न आहेच.’’ वातावरण बदल व शेतीतील रासायनिक निविष्ठांचा वापर यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आता शाश्‍वत लिंबूशेती सोडून इतर पिकांकडे

वळावे लागले. आज १५० -२०० रु किलो भाव देऊनही चांगल्या दर्जाचे लिंबू बघायला देखील मिळत नाही. काही वर्षांपूर्वी डाळिंब शेती अशीच मोठ्या प्रमाणात बाधित झाली व डाळिंब खाणे ही चैन बनली. अनेक पिकांना असा फटका बसताना दिसत आहे. काहींची मोजदाद होते, काहींची नाही.

मागच्या महिन्यात रब्बी ज्वारीची कापणी करतानाच पाऊस आला. त्याने दाणे काळे पडले, हीच बाब दरवर्षी बाजरीच्या पिकाबाबत होत आहे. दरवर्षी कापणीच्या हंगामात पावसाची धाकधूक असते. तो आला की बाजरी भिजवतो व आतले दाणे काळे पडतात. अशी भिजलेली बाजरी खाण्यासाठीही उबट लागते. अशा प्रसंगांची वारंवारता वाढत आहे. काळ्या पडलेल्या दाण्यांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न घटते. अशा वेळी शेतकरी अशा पिकांचा नादच सोडून द्यायच्या मनःस्थितीत असतात.

समजा, भविष्यात या अशा प्रसंगांची वारंवारता वाढत गेली, तर अन्न-धान्य निर्मितीमध्ये अनेक अडचणी येऊन शेती व्यवस्थित पिकवणे जोखमीचे होऊ शकते, यासाठी पर्याय काय असू शकतात? ग्रामीण शेतकरी अन्न पिकवतो तेव्हा शहरी लोकांना ते मिळते. वातावरण बदलाला सामोरे जाण्यासाठी या दोन्ही घटकांनी तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

Climate Change Issues
Climate Change : तापमानवाढीचा ‘ट्रेलर’

तातडीने करावयाच्या गोष्टी

वातावरण बदलाचा सामना करणे ही गुंतागुंतीची बाब आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण वैयक्तिक स्तरावर तातडीने काही पावले उचलली तर त्या दिशेने किमान वाटचाल तरी सुरू होईल. त्यासंदर्भात पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :

ऊर्जा, इंधन व इतर नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर आपण करू शकतो. अगदी छोटीशी गोष्ट काळजीपूर्वक करणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आवश्यकता नसल्यास व वापरून झाल्यास विजेची बटणे त्वरित बंद करणे ही सवय लावून घेणे.

प्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमीत-कमी केला पाहिजे. शेतीतील रसायनांचा अति वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय पर्यायांची निवड केली पाहिजे. रसायने जमीन खराब करतात पण त्याबरोबर पिण्याचे पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित करत असतात. हेच पाणी पिण्यासाठी, आपले अन्न पिकविण्यासाठी आपण वापरत असतो.

शेतात आपण वापरत असलेल्या रसायनांना अगदी कमी खर्चात पर्याय उपलब्ध आहेत. त्यात थोडे श्रम आहेत. जसे की शेण-गोमूत्र, काही वनस्पतींचे पाने तर काही उपलब्ध असलेल्या जैविक कल्चरचा वापर करून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीकडे वळता येऊ शकते. या माध्यमातून रसायनांचा वापर किमान अर्ध्यावर आला तरी मोठे प्रदूषण टाळता येईल. तसेच उत्पादन खर्च देखील कमी होईल.

वाढत्या तापमानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून पारंपरिक बियाण्यांचा वापर आपण वाढवू शकतो. हे बियाणे काटक असतात शिवाय पाण्याचा ताण देखील सहन करू शकतात. धान्य, तेलबिया व भाजीपाला यासाठी हे बियाणे आपण सहज वापरू शकतो.

योग्य पिकांची निवड हा देखील यातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी भरडधान्य पिके उपयोगी पडू शकतात. ही पिके वातावरणाशी मिळते-जुळते घेतात. तसेच माणसांच्या व गुरांच्या पोषणासाठी ते सरस असतात.

वृक्षतोड कमी करून शक्य तितके झाडे लावणे आवश्यक आहे.

थोडक्यात, शाश्‍वत शेती करण्यासाठी आता तरी आपण तयारीला लागायला हवे. वातावरण बदलाचे संकट आपण टाळू शकत नाही, परंतु त्याला सामोरे जाण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. आपल्या परिसरात कोणती पिके चांगली येऊ शकतात, त्यासाठी लागणारे बियाणे माझ्या भागात आहे का, नसेल तर ते कोठे उपलब्ध होईल, मिळालेले बियाणे वाढवणे, व इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, अन्नासाठी उपयुक्त वृक्षांची बांधावर जास्तीत जास्त लागवड, हे प्रत्येक शेतकऱ्याने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजायला हवे. कारण भविष्यातील अन्नसुरक्षेची हमी देण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

: ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com