
अमोल साळे
गणेश, एका खेड्यातील शेतकरी कुटुंबातला मुलगा. डोळ्यात मोठी स्वप्नं, पण हातात नोकरी नाही. भविष्याच्या चिंतेने ग्रासलेला. एक दिवस त्याच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला, जणू काही आशेचा किरणच. मेसेज होता, ‘शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि महिन्याला १२ टक्का परतावा मिळवा. तुमचे पैसे वाढवा आणि श्रीमंत व्हा!’ निराश गणेशला वाटले, चला, नशिबाने एक संधी दिली.
आता आपणही इतरांसारखे ‘शेअर मार्केट इन्व्हेस्टर’ बनणार. त्याने मेसेजमध्ये दिलेल्या लोकांशी संपर्क साधला. सुरुवातीला थोडे पैसे गुंतवले. आणि काय आश्चर्य! काही दिवसांतच त्याला चांगला परतावा मिळाला. त्याचा विश्वास बसला. आता तो स्वतःला एक यशस्वी गुंतवणूकदार समजू लागला. त्याने मित्रांकडून, नातेवाइकांकडून पैसे उसने घेतले. त्याला वाटले, हे पैसे गुंतवून आपण श्रीमंत होऊ आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढू.
पण एका दिवशी, तो व्हॉट्सअॅप ग्रुपच बंद झाला. गुंतवणुकीसाठी पैसे घेणारे सर्व लोक गायब झाले. त्यांचे ऑफिस बंद होते, फोन लागत नव्हते. गणेशचे स्वप्न एका क्षणात भंगले. तो पूर्णपणे खचला, कर्जबाजारी झाला आणि नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला.
गणेशची कहाणी ही काही काल्पनिक नाही. महाराष्ट्राच्या गृह विभागाने गेल्या वर्षी दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक फसवणुकीच्या हजारो घटना घडल्या आहेत:
पुणे ग्रामीण : ४,६२८ घटनांमध्ये लोकांनी ४३४ कोटी रुपये गमावले.
नागपूर ग्रामीण : १,६२० घटनांमध्ये लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
नाशिक ग्रामीण : २,७८८ घटनांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले.
ठाणे ग्रामीण : १,२३६ घटनांची नोंद झाली.
याशिवाय, सोलापूर, लातूर, बुलडाणा आणि चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्येही हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही वरवर पाहता साधी आकडेवारी वाटत असली तरी ती गणेशसारख्या हजारो उद्ध्वस्त कुटुंबांची शोककथा आहे.
शेवगावची शोकांतिका ः
एखादा घोटाळा केवळ लोकांचे पैसेच नाही, तर संपूर्ण तालुक्याचे अर्थकारण आणि समाजकारण कसे उद्ध्वस्त करू शकतो, याचे भीषण उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडलेला प्रकार. सुमारे चार वर्षांपूर्वी, साई कवडे नावाच्या तरुणाने शेवगाव तालुक्यातील कुरुडगाव येथील एका शेतातून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या कामाला सुरुवात केली.
त्याने ‘ॲसिटेक सोल्यूशन ट्रेडिंग कंपनी’च्या नावाखाली लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा १२ टक्के परतावा देण्याचे आकर्षक आमिष दाखवले. सुरुवातीला, विश्वास बसावा म्हणून त्याने काही लोकांना वेळेवर परतावा दिला. हे पाहून शेतकरी, शिक्षक, छोटे व्यावसायिक आणि अगदी नोकरदार वर्गानेही आपल्या जमिनी विकून, सोने गहाण ठेवून आणि कर्ज काढून कोट्यवधी रुपये त्याच्याकडे गुंतवले.
अशा रीतीने त्याने लोकांकडून करोडो रुपये जमा केले. जेव्हा खूप मोठी रक्कम जमा झाली, तेव्हा साई कवडेने परतावा देणे बंद केले आणि तो फरार झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. लोकांची आयुष्यभराची कमाई बुडाली होती. अखेरीस, अनेक महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी साई कवडेला गुजरातमधील सुरत येथून अटक केली. पण तोपर्यंत त्याने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळवली होती.
पैसे दुप्पट करण्याचे आमिष ः
हा फसवणुकीचा एक जुना पण अत्यंत प्रभावी प्रकार आहे. यात लोकांना कमी वेळेत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते. घोटाळेबाज सुरुवातीला काही गुंतवणूकदारांकडून पैसे घेतात आणि त्यांना वचन दिल्याप्रमाणे परतावा देतात. हा परतावा प्रत्यक्षात नवीन गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांमधून दिला जातो. जेव्हा मोठी रक्कम जमा होते, तेव्हा हे घोटाळेबाज अचानक गायब होतात.
पतसंस्थांमधील घोटाळे ः
गावागावांतील पतसंस्था आणि सहकारी बँका या विश्वासाचे दुसरे नाव आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागांत मोठ्या बँकांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे, या संस्था स्थानिक लोकांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आधारस्तंभ ठरतात. त्यामुळे त्यांना त्वरित सेवा उपलब्ध होते आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते.
परंतु, काही स्वार्थी व्यक्तींकडून पदाचा गैरवापर केल्यामुळे जनतेच्या पैशांचा अपहार झाल्याच्या घटना घडतात. अशा घटनांमुळे केवळ ठेवीदारांचेच नव्हे, तर सहकारी चळवळीचे आणि आर्थिक व्यवस्थेचे मोठे नुकसान होते. छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत झालेला सुमारे २०० कोटींचा घोटाळा हे अशा घोटाळ्यांचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
या प्रकरणात, सामान्य लोकांनी विश्वासाने ठेवलेले करोडो रुपये बुडाले. त्यामध्ये अनेक गरीब-मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आयुष्यभराच्या कमाईचा समावेश होता. ठेवीदारांना प्रचंड मनस्ताप झाला. त्यांना स्वतःच्या पैशांसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला, मोर्चे काढावे लागले, परंतु अपेक्षित न्याय मिळाला नाही.
या अशा घोटाळ्यांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर लोकांचा सहकारी बँका आणि पतसंस्थांवरील विश्वास डळमळीत होतो. फसवणूक झालेला माणूस आतून खचून जातो. पतसंस्थेत पैसे बुडाल्यावर, समाजात आपली पत जाईल, या भीतीने तो कोणाला काही सांगू शकत नाही. या मानसिक तणावातून अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर नियम आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर, ठेवीदारांनी कोणत्याही संस्थेत पैसे ठेवण्यापूर्वी तिची विश्वासार्हता आणि आर्थिक स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. कारण, स्वतःच्या कष्टाच्या पैशांच्या सुरक्षिततेची अंतिम जबाबदारी ठेवीदारांचीच असते. या फसवणुकींचा परिणाम केवळ आर्थिक नसतो, तो कुटुंबांना उद्ध्वस्त करतो आणि समाजातील विश्वास संपवून टाकतो.
तुटलेला विश्वास ः
नागपूर जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेत रामण्णाराव मुसलिया बोल्ला नावाच्या एका भात गिरणी मालकाने एक मोठा घोटाळा रचला. त्याने २०१७ च्या ओल्या दुष्काळानंतर सरकारी मदतीचे आमिष दाखवून १५१ शेतकऱ्यांकडून त्यांचे आधार आणि पॅन कार्ड घेतले.
कॉर्पोरेशन बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून, त्याने शेतकऱ्यांच्या नकळत त्यांच्या नावावर प्रत्येकी ४५ ते ५० लाख रुपयांचे बनावट कृषी कर्ज उचलले. ही तब्बल ११३ कोटी रुपयांची रक्कम त्याने स्वतःच्या १२ कंपन्यांच्या खात्यात वळवली. जेव्हा शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीच्या नोटिसा आल्या, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या धक्क्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.
संरक्षणाची ढाल ः
या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे लढावे लागेल. केवळ सरकार किंवा पोलिसांवर अवलंबून न राहता, आपल्याला स्वतःची आणि आपल्या गावाची ‘संरक्षणाची ढाल’ बनावे लागेल.
बचत गटांची ताकद ः
महाराष्ट्रात महिला बचत गटांचे जाळे खूप मजबूत आहे. हे बचत गट माहितीच्या देवाणघेवाणीचे आणि संरक्षणाचे एक मोठे केंद्र बनू शकतात. बचत गटांच्या बैठकीत नवीन प्रकारच्या फसवणुकीबद्दल, मग ती ऑनलाइन असो वा पतसंस्थेतील, चर्चा होऊ शकते. प्रत्येक बचत गटात एक-दोन महिलांना ‘डिजिटल सखी’ म्हणून प्रशिक्षण दिले जाऊ शकते. सुरक्षित डिजिटल व्यवहार कसे करायचे, हे त्या इतरांना शिकवू शकतात.
ग्रामपंचायतीची भूमिका ः
ग्रामपंचायत हे गावाचे सरकार आहे. त्यांनी या लढ्यात पुढाकार घेतला पाहिजे.
जागरूकता शिबिरे ः
ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने गावात नियमितपणे सायबर सुरक्षेवर आणि आर्थिक फसवणुकीवर जागरूकता शिबिरे आयोजित करावीत. पालघर पोलिसांनी ‘सायबर क्राइम फ्री व्हिलेज’ उपक्रम सुरू केला आहे, जो प्रत्येक गावात पोहोचायला हवा.
योजनांची पडताळणी ः
कोणत्याही सरकारी योजनेची किंवा गुंतवणुकीच्या आकर्षक योजनेची माहिती मिळाल्यास, तिची सत्यता ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन तपासावी.
- आपण काय करू शकतो?
- ओटीपी (OTP) आणि पिन शेअर करू नका
- तुमचा बँक ओटीपी किंवा एटीएम पिन हा तुमच्या तिजोरीच्या चावीसारखा आहे. तो कोणालाही देऊ नका.
- आमिषांना बळी पडू नका
- ‘लॉटरी लागली’, ‘जास्त व्याज मिळेल’ किंवा ‘पैसे दुप्पट होतील’ अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नका.
- गुंतवणुकीपूर्वी चौकशी करा
- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी (SEBI) नोंदणीकृत सल्लागाराचाच सल्ला घ्या. कोणत्याही अनोळखी ॲप किंवा वेबसाइटवर विश्वास ठेवू नका.
- तक्रार करा
- तुमच्यासोबत फसवणूक झाल्यास, लाज न बाळगता त्वरित सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर फोन करा किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा.
डिजिटल क्रांती आणि सहकाराची चळवळ ही आपल्या फायद्याची आहे, पण तिचा वापर डोळसपणे करायला हवा. गणेशसारख्या तरुणांची स्वप्ने अशा घोटाळ्यांमुळे भंगू नयेत आणि शेवगाव / नागपूर सारखी शोकांतिका पुन्हा घडू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. प्रगतीच्या वाटेवर फसवणुकीचे काटे आहेत; पण ते दूर करण्याची ताकद आपल्या एकजुटीत आहे. ज्ञानाचा आणि जागरूकतेचा दिवा घरोघरी पोहोचवूनच आपण या दुहेरी संकटाचा सामना करू शकतो आणि आपल्या महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित करू शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.