Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

Language Matters: भाषा शिकणे म्हणजे केवळ बोलायला, वाचायला आणि लिहायला येणे नव्हे! शब्द ऐकताच मनात, हृदयात त्या शब्दामुळे भाव प्रगटीकरण होते. ‘आई’ शब्द उच्चारताच प्रेम, वात्सल्य आणि ममत्व भाव प्रकट होतो. शिक्षणातून बौद्धिक विकासाप्रमाणेच भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होणे गरजेचे आहे.
Indian Language
Indian LanguageAgrowon
Published on
Updated on

Feel the Language: आपल्या जीवनात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व असते. याविषयी एक भावस्पर्शी प्रसंग वाचनात आला, तो असा. रसूल गमजातोव हा एक प्रसिद्ध रशियन कवी होता. त्यांचे ‘माझे दागिस्तान’ हे प्रसिद्ध पुस्तक आहे. गमजातोव फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे कवी संमेलनासाठी जातात. त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गावाकडील मित्र भेटतो. तो मित्र गमजातोव याच्याकडे त्याच्या आईसाठी काही भेटवस्तू देतो. परत आल्यानंतर गमजातोव त्या वस्तू घेऊन मित्राच्या आईकडे जातो. आई गमजतोव याचा पाहुणचार करते.

त्यांच्यात गप्पागोष्टी होतात. मित्राची आई गमजातोवला विचारते, ‘‘तुम्ही पॅरिसला भेटल्यावर माझा मुलगा कोणत्या भाषेत बोलला?’’ त्यावर गमजातोव म्हणतो, ‘‘रशियन भाषेत.’’ रशियातही अनेक भाषा बोलल्या जातात. आई म्हणते, ‘‘काय, तुम्ही आपल्या दागिस्तानी अवारी भाषेत बोलला नाही?’’ गमजातोवने नाही म्हणताच आई घरात जाते आणि काळे वस्त्र घालून बाहेर येते. दागिस्तानात काळे वस्त्र घरात दुःखद घटना घडते त्या वेळी घातले जाते. गमजातोव मित्राने पाठविलेल्या वस्तू आईला देऊ करतो, मित्राची आई त्या वस्तू घेण्यास नकार देते. ती म्हणते, ‘‘जो मुलगा मातृभाषेला विसरला, तो माझ्यासाठी संपला.’’

मातृभाषा ही आपल्या स्वत्वाचा आधार असते. मातृभाषा ही केवळ भाषा नसते, तर मागील पिढीचे सारे संचित आपल्यापर्यंत घेऊन येते. आपण ज्या कुटुंबात जन्मतो, त्या समाजाची कित्येक पिढ्यांनी जोपासलेली संस्कृती, परंपरा आपण मातृभाषेतून शिकत असतो. त्यामुळे शिक्षणात मातृभाषादत्त शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा आणताना केवळ व्यापारी दृष्टिकोनातून विचार न करता बालमानसशास्त्र, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हा निर्णय तपासून घ्यावा लागेल.

Indian Language
Zadiboli Language: गोड लहेजा झाडीपट्टीबोलीचा...

भावजागृतीसाठी स्वभाषा शिक्षण

भाषा शिकणे म्हणजे केवळ बोलायला, वाचायला आणि लिहायला येणे नव्हे! शब्द ऐकताच मनात, हृदयात त्या शब्दामुळे भाव प्रगटीकरण होते. ‘आई’ शब्द उच्चारताच प्रेम, वात्सल्य आणि ममत्व भाव प्रकट होतो. छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकताना साहसी वृत्ती अंगात संचारते. शिक्षणातून बौद्धिक विकासाप्रमाणेच भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होणे गरजेचे आहे. बालवयात एकापेक्षा अधिक भाषा शिकण्याची घाई केल्यास मुले अधिकच्या भाषा शिकतीलही कदाचित, मात्र त्यातून भावनिक विकास थांबण्याची भीती आहे.

आई म्हणजे माँ आणि माँ म्हणजे मदर अशा भाषा शिक्षणातून भावशून्य अंतःकरणाची पिढी तयार होईल. भावनिक बुद्धिमत्तेचे पालनपोषण करण्यासाठी भाषा हा महत्त्वाचा घटक असतो. आत्मजागरूकता येऊन स्वतःच्या भावना व इतरांच्या भावना ओळखणे. इतरांच्या भावनांचा विचार करणे यासाठी मातृभाषेतील शिक्षण अधिक उपयोगी ठरते. संवाद, संभाषण यातून आत्मिक व सामाजिक विकास घडून येतो. पैकीच्या पैकी गुण मिळविणे, बालवयातच अधिकच्या भाषा शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे!

याच वयात मुलांचा आत्मिक विकास होणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ चुकीच्या शिक्षण पद्धतीत दडलेले आहे. छोट्या - छोट्या कारणांनी आत्महत्या करणारी मुले, वाढती व्यसनाधीनता, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा अभाव, ढासळती कुटुंब व्यवस्था, संस्कार, संस्कृती आणि मूल्यांचे होणारे पतन यातून गंभीर सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. शिक्षणातून बुद्धीबरोबर भावजीवन समृद्ध व्हावे. स्व - जाणीव, स्व - नियमन, स्व - अभिभक्ती, सामाजिक जाणीव शिक्षणातून यावी. नैतिक व लोकशाही मूल्य, संस्कार, संस्कृतीची रुजवणूक करण्यासाठी प्राथमिक स्तरावर मराठी भाषा सक्षमपणे शिकवली पाहिजे.

Indian Language
Marathi Language : आता सर्वठायी वाचा, बोला, लिहा मराठी

भाषा आणि संस्कृती

भाषा ही महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. समाजाची निर्मिती, अस्तित्व आणि विकास या गोष्टी भाषेमुळेच शक्य झालेल्या आहेत. भाषा वापराचा आणि संस्कृतीचा परस्पर संबंध आहे. या संदर्भात डॉ. तेजपाल चौधरी यांनी ‘समाजभाषाविज्ञान की भूमिका’ या ग्रंथामध्ये एक मार्मिक उदाहरण दिले आहे. त्यांनी अशी कल्पना केली आहे की एक व्यक्ती रामायण ही कथा सांगताना कथेचा प्रारंभ खालीलप्रमाणे करते.

‘‘पुराने जमाने मे दरिया के किनारे अयोध्या नाम का एक महशूर शहर था। वहाँ बादशहा दशरथ हुकूमत करते थे। उनकी तीन बेगमे और चार शहाँजादे थे।’’ या उदाहरणावरून ते पुढे सांगतात, की भाषिक स्तरावर विचार केला तर या वाक्यांमध्ये काहीही दोष नाही. परंतु रामायण या कथेची सुरुवात केल्यानंतर अपेक्षित वातावरण आणि भावप्रगटीकरण त्यातून होत नाही. कथेचा मूळ आत्मा हरवल्यासारखा वाटतो. भाषा आणि संस्कृतीच्या समन्वयाचा अभाव यातून दिसून येतो. डॉ. तेजपाल पुढे लिहितात, की दरिया और नदी, किनारा और तट, महशूर और प्रसिद्ध , बादशाह और राजा, हुकूमत और शासन, बेगम और राणी, शाहजादा और राजकुमार हे सर्व वरवर पाहता समानार्थी किवा पर्यायवाची शब्द जरूर आहेत.

पण त्यामागील सांस्कृतिक भिन्नतेमुळे त्याच शब्दांचे वेगळेच अर्थ किंवा चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. प्रत्येक भाषा व त्यातील शब्दाची आपली स्वतःची एक भावविशिष्ठता असते. त्या त्या संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. भाषा बदलली की संस्कृतीदेखील बदलते. यामुळेच तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेत ‘स्व- भाषे’ला देखील महत्त्व देण्यात आले होते. आपल्या रूढी, परंपरा, प्रथा, सण - उत्सव, कुटुंबपद्धती, धर्म, देवदेवता, नीतिकल्पना, कला, संगीत, शिल्प याचबरोबर संस्कृती संवर्धनासाठी संतानी मांडलेले विचार आपल्याला मराठी भाषेतूनच मिळतात.

परभाषेतही व्हा पारंगत

परदेशातील शिक्षण, नोकरी, परदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय व्यापार, राजकीय, सांस्कृतिक संबंध यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपली मुले ही केवळ भारताचे नागरिक नाही, तर ते जन्मतः जगाचेदेखील नागरिक आहेत. जागतिक स्वीकार्यता मिळविण्यासाठी बहुभाषक होणे आवश्यक आहे, हे कोणी अमान्य करणार नाही. पहिलीपासून अधिक भाषा शिकवण्याचा हट्ट चुकीचा आहे.

पु. ल. देशपांडे म्हणत, ‘‘आपल्या आईशी जो प्रेम करतो, त्यालाच मातृत्व म्हणजे काय, वात्सल्य म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय हे कळते. तसेच ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता येते, त्यालाच इतरांच्या भाषेवर प्रेम करता येते. स्वभाषा चांगली आत्मसात असणारा व्यक्ती इतरही भाषा अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतो.

- शिवाजी काकडे, ७८८७५४५५५७

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com