
प्रा. केशव देशमुख
Save Our Languages: श्रम वेचणारा प्रचंड मोठा लोकसमूह भाषेला धरून संस्कृतीला सतत नवे आयाम देत आला आहे. जिथे ज्ञानधारणा असलेल्या शिक्षणाची अट नाही किंवा छापील पुस्तकांचे सान्निध्य नाही. उलट, परंपरेचा प्रवाह, भाषिक ऐश्वर्य आणि भूगोलास व्यापून असलेली पर्यावरणीय जाणीव, असा प्रचंड ऐवज जपत बोली आणि ती बोलणारा लोकसमूह भाषिक-सांस्कृतिकतेला वरदान ठरलेला आहे. इथे ग्रंथभाषा अथवा शिक्षणभाषा कोरडी ठरावी, इतका गोडवा आणि केवढी उच्चारगामी मधुरम विविधता बोलीत सामावून आहे. झाडीबोली या मधुरमतेचा, अर्थात गोडीच्या बाबतीत उच्चांकस्थापित करणारी बोली आहे. ती लाघव आहे. ही अशी झाडीबोली गोडीने, उच्चाराने, श्रवणाने आणि शब्दरूपाने ऐकणाऱ्यास वेड लावणार नाही तर नवल!
या झाडीबोलीचा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा असा चौफेर व्यापलेला मुलूख आहे. या मुलखात झाडी लोकरंगभूमी आहे जी झाडीबोलीने बहरलेली आणि मनोमनी रुजलेली आहे. धनराज खानोरकर या प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि झाडीमंडळातील लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकोत्सव यात साक्षात सामीलकी असलेल्या अभ्यासकाने ‘संजोरी’ या नावाचा एक मजबूत ग्रंथ सिद्ध करून झाडीबोलीचे रसरशीत आभाळच वाचकांपुढे ठेवले आहे. एखाद्या बोलीचा पैस आणि तिचा आवाका किती प्रचंड असू शकते, याचा ताजा दाखला म्हणून संजोरीचे मोल कोणाही वाचकास अचंबित करू शकणारे ठरावे.
बोली संवर्धन जिवंत काम
कोणत्याही बोलीचा लहेजा अफाटच असतो हे तर उघड आहे. कारण बोली मूळात बोलता समाज सांभाळतात, आणि याउलट बोलणारा समाज हा बोलीस सांभाळतो. पण काळाच्या या पटावर बोलीचे दस्तऐवजीकरण करणे हे बोलीच्या जतनानुषंगाने आवश्यक असते. यामुळे भाषेच्या इतिहासाची नवी मांडणी व्हायला मदत होते. बोलीचे नवे पान भाषिक-इतिहासाच्या सामग्रीला जोडले जाते. नागपुरी, चंदगडी, मराठवाडी, कोकणी, अहिरानी, तावडी, वऱ्हाडी, दख्खनी अशा अजून पुष्कळ बोलींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी मराठीत चालविलेले प्रकल्पनिष्ठ प्रयत्न हे बोलीक्रांतीची वाट रुंदावणारे मौलिक प्रयत्न आहेत.
यात सुखावह बाब अशी, की शासनाचे मराठी भाषा धोरण, नव्याने सरकारने उभे केलेले रिद्धपूर (अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठ आणि केंद्रातून मराठीला प्राप्त झालेला अभिजात भाषेचा दर्जा या तीन खूपच मोठ्या घडामोडी बोलीभाषांच्या संदर्भात बोली-उद्धाराची कामं हाती घेतील. त्यामुळे आता बोलीचे दिवस खऱ्या अर्थाने सुरू झाले! असे संबोधायला वाव आहे. आज हे कागदावर नोंदवलेले काम आहे. तशी परिपत्रके जवळ जवळ निघाली आहेत. फक्त यंत्रणा कामाला लागल्या पाहिजेत.
सर्व लोकांना सोबत घेऊन बोलीचे काम तत्काळ सुरू झाले पाहिजे. केवळ इमारतीत बसून ज्ञानवंतांनी करावयाचे हे काम नाही. हा मैदानी आणि लोकांत जावून तसेच लोकांना सोबत घेऊन करावयाचा प्रकल्प आहे. कारण मोठा असा पैशांचा खर्च, भूगोलीय भ्रमंती, अत्याधुनिक साधनांचा वापर, वस्तुनिष्ठ नोंदी आणि लोकभावना, लोकभाषा यांचा संवेदनशील विचार करून करावयाचे हे जिवंत काम आहे. समतातत्त्व आणि सकारात्मकता ध्यानी-मनी जपतच भाषेचे कोणतेही काम करावे लागते, याचा विसर लोक आणि बोली यासंबंधी काम करताना नजरेआड होऊ देता येत नाही.
झाडीबोलीची शब्दरूपे
वस्तुतः कोणतीही बोली नीट पारखून घेतच तिची विश्लेषकता सादर करावी लागते. उचलला विषय आणि मांडला, अशा घाईत बोली वा भाषेचे काम मुळीच पुढे जाणारे नसते. म्हणजे बोलीचा लहेजा, तिची उच्चारशीलता, तिची श्रवणशीलता, पिढ्यांचे अवलोकन, लिंगभेदानुसार उच्चारातील ढब, लोकांची अन्नव्यवस्था, त्यांचे सणोत्सव, विशेषत: ग्रामरचनेत राहणाऱ्या महिलांच्या बोलीचा पोत हे समजून घेत त्याची मांडणी करावी लागते. यातून बोलीच्या संशोधनाचे बांधकाम मजबूत होणारे असते. याच अनुरोधाने झाडीबोलीची भाषिक रूपे केवढी विलक्षण, तद्वतच गोड आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत याचे काही दाखले याप्रमाणे... झाडीबोलीची शब्दरूपे कंसाबाहेर दर्शविलेली आहेत.
उदाहरणार्थ : देल्लो (दिले), झडकरी (लवकर), त्थो, त्थालं (तो, त्याला), उजवणे (लग्न होणे), त्थुई (तुझी), कोन्टा (कोपरा, बाजू), बुडगे (वयस्कर पुरूष), वेटाळ (गल्ली), भेदरू (टमाटर), हट्टेकट्टे (धडधाकट, मजबूत), टोरी (मोहाच्या वृक्षाचे बी), ठुसा (शिजलेल्या मटणाचा तुकडा), हांडी (मटण शिजविण्याचे भांडे), झेंडीमुंडी, चक्रीखेळ, तीनपत्ती (जुगारातील खेळांचे नमुने), मुनारी (दवंडी पिटवणे), आबीदुबी, लपासपी, कंचोऱ्या (मुलांचे खेळ-प्रकार), चुरपू चुरपू (चोखून चोखून जसे की आंबा खाण्याची ढब), धानपट्टा (भाताचा प्रदेश), धुवार (दव), अशा विपुल शब्दरूपांची आकर्षक पखरण ही झाडीबोलीची एक निराळीच लज्जत दर्शविणारी आहे.
खानोरकरांसारख्या आणि कुणाला फारसा माहीत नसलेल्या संशोधक, ललित लेखकानं त्यांच्या संजोरी-मधूनही बोलभाषिक ऐवज जो पेश केला तो सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, पारंपरिक भाषिकदृष्ट्या खूपच मोलाचा आहे. झाडीमंडळात चालणारे हे भाषिक अभिसरण झाडी लोकरंगभूमी आणि बोरकर, मोहरकर आणि इतर अनेक मान्यवर असे लेखक, कवी, कथनकार, नाटककार झाडीपट्टी बोलीच्या जपणूकीसाठी, तिच्या प्रतिष्ठेसाठी जिवाचे रान करीत काम करताना दिसतात.
वस्तुतः राज्य सरकारने खरं तर या झाडी कला, नाटक, काव्य, उत्सव आणि कलावंत आणि सर्वप्रकारच्या कलांची जपणूक करणाऱ्या मातीवरच्या या प्रतिभावंतांसाठी एका विशिष्ट थोर बजेटची तरतूदच करायला हवी. कारण, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी बोलीप्रधान असलेली झाडी जन-रंगभूमी ही दानशूरांच्या, तेथील जनतेच्या आणि ज्या त्या गरीब, श्रमकरी, कलावंत रंगकर्मी यांच्या तसेच प्रेक्षक मायबाप यांच्या पदरच्या पैशातून उभी आहे. झाडी बोलभाषा सांभाळणारा हा मोठा असा लोककलावंताचा समुदाय आहे.
यांच्याकडे सरकारने अधिकचे लक्ष देत त्यांना भरीव अर्थसहाय्य करायला हवे. अन्यथा, भाषेचा हा अभिजात रत्नसाठा हा असाच लोकांच्या खिशाला खार लावत चालत राहिल आणि एक दिवस पैसा कमी पडला तर हे बोल-भाषिक-धन सांभाळणे कठीण होईल. हे लोक जपले पाहिजे, या लोकांच्या कलांचा सांभाळ केला पाहिजे. त्यांच्या श्रम आणि कौशल्याशी लगडून असलेली झाडीबोली, तिचे सर्वस्तरीय रक्षण केले गेले पाहिजे. कारण ही बाब जशी भाषारक्षणाची आहे तशीच ती लोक, समूह, समाज, बोली, परंपरा, संस्कृती, मुलूख आणि भाषिक अस्मितीचीही आहे!
९४२२७२१६३१
(लेखक बोली-भाषातज्ज्ञ आणि राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.