

Indian Agriculture: महामंडळाच्या बसने प्रवास करताना उभा राहिलेलो होतो, त्याचवेळी शेजारच्या सीटवर बसलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनवर चर्चा चालू होती. पीक थोडं बरं होतं पण भावाने मारले असं एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगत होते. हे शब्द माझ्या कानावर पडले, कान टवकारले आणि तिकडे जास्त लक्ष गेलं.
दुसरा शेतकरी म्हणाला, "आम्हाला तर ३८०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. खूपच भाव पडले आहेत. खर्च केलेले पैसे देखील परत मिळाले नाहीत. पण एक बरं झालं तेव्हाच विकले ते आता तर ३ हजारावर आलं आहे."खिडकीला बसलेला शेतकरी म्हणाले "दोन महिन्यांपूर्वी ४० क्विंटल सोयाबीन ४ हजार रुपये क्विंटलने विकले. पण माझेही तसं झालं सोयाबीनला झालेला खर्च पण मिळाला नाही. एक वर्ष मागे गेल्यासारखं झालं हाय."
मला राहवलं नाही. त्यांच्या चर्चेत सामील झालो, कोठून आलात. कोठे जाणार आहात ते विचारले. त्यावर आमची चर्चा सोयाबीनवर पुन्हा नव्याने सुरू झाली. सोयाबीनवर शेतकऱ्यांना म्हणालो, "तुम्ही विकलेले सोयाबीन ५ हजार रुपये किंवा शासनाच्या आश्वासनानुसार ६ हजार रुपये क्विंटलने विकले असते तर किती पैसे वाढीव मिळाले असते."
खिडकीचा शेतकरी म्हणाले की, ५ हजाराने ४० हजार आणि ६ हजार रुपये क्विंटलने ८० हजार रुपये जास्तीचे मिळाले असते.
मी म्हणालो, समजा, सोयाबीन बाजारात विकलेच नाही तर काय होईल?.
त्यावर खिडकीतील शेतकरी म्हणाले, खर्चाला पैसे लागतात?. म्हणून विकल्याशिवाय पर्याय नाही.
म्हणालो, सोयाबीन ऐवजी इतर पर्यायी पिकांचा विचार का करत न्हाईत?.
शेतकरी म्हणाले, सोयाबीन जसं विकले जाते, तसं इतर पिके विकले जात नाहीत.
मग म्हणालो, सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून काय प्रयत्न केले आहेत?.
शेतकरी म्हणाले, काहीच केले नाहीत.
म्हणालो. मग तुमचे प्रयत्न नसतील तर शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकार आणि व्यापाऱ्यांनी जबाबदारी का घ्यायची? तुम्ही किमान त्यांना चांगला भाव मिळावा ही मागणी आहे, ती प्रत्यक्षाने जाणवायला हवी. शेतकऱ्यांची बाजू नेहमी दुसऱ्यांनीच का घ्यावी? मतदार संघात आमदार खासदार येतात तेव्हा त्यांना याविषयी सांगतात का? ते देखील सांगत नसाल तर प्रश्न कसा मार्गी लागणार आहे.
पुढे म्हणालो , सोयाबीन भावावर किती शेतकरी जागृत आहेत?, तुमच्या गावातील शेतकऱ्यांचा विचार करा? किती शेतकऱ्यांनी ठरवले की ६ हजाराच्या खाली सोयाबीन विकणार नाही. मी समजू शकतो की पैसे लागतात. पण कोठेतरी शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन भूमिका घ्यावी लागणार आहे.
सोयाबीन पिकवणे कमी करून दैनंदिन लागणारे खाद्यान्न पिकवून घरीच खाण्यासाठी वापरावे लागणार आहे. विकत घेण्याऐवजी घरीच पिकवा. त्याचा हिशोब ठेवा, तुम्हाला कळेल की किती पैसे लागतात? यावर शेतकरी थोडं शांत झाले आणि म्हणाले, तुम्ही म्हणतात ते देखील खरं आहे. पुढे म्हणालो, शेतकरी हक्कासाठी भांडत नाही. मात्र शेतकरी सन्मान निधीचे ६ हजार रुपये कधी मिळतील याकडे आशावादी भूमिकेतून पाहत असतात.
शेतकरी थोडं विचार करू लागले. म्हणाले हे देखील खरं आहे. पुढे म्हणाले, आमचे ४० ते ८० हजार रुपये काढून घेतले आणि आम्हाला ६ हजारासाठी वाट पहायला लावली जाते. नंतर आमची चर्चा इतरही प्रश्नांवर चर्चा झाली. पुढे माझे उतरण्याचे ठिकाण आले. मी उतरलो पण या घटनेला ५ दिवस झाले आहेत, तरी ते शेतकरी नजरेच्या आड होईना. त्यांनी कमी भावात विकलेले सोयाबीन मनात घर बसले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.