
भीमाशंकर बेरुळे
Property Share Transfer: तुमच्या नावावर एखादी मालमत्ता असेल किंवा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असाल आणि तुमच्याकडे तुमचे नातेवाईक हक्कसोड पत्र मागत असतील तर यातील कायदेशीर बाबी माहिती असणे आवश्यक आहे. एखाद्या मालमत्तेमध्ये सामाईक नाव असल्यास आणि त्या मालमत्तेमधून मग ती मालमत्ता शेती असेल किंवा घर, काहीही असू शकेल त्यामधून आपला हिस्स्यावरील मालकी हक्क सोडून देण्यासाठी हक्कसोड पत्राचा दस्त केला जातो. हक्कसोडपत्र कायदेशीररीत्या परिपूर्ण बनवून घेतले तरच त्याला कायदेशीर मान्यता असते.
हक्कसोडपत्र कोण तयार करू शकते?
केवळ मालमत्तेचे सामाईक हिस्सेदार मालमत्तेतील त्यांचा हिस्सा सोडू शकतात. तसेच, ते केवळ त्या विशिष्ट मालमत्तेच्या दुसऱ्या सहमालकाच्या हक्कात त्यांचा हक्क सोडू शकतात, इतर कोणीही नाही.
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
पुरावा म्हणून न्यायालयात दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी न केलेले हक्कसोडपत्र स्वीकार्य नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेसाठी हक्क सोडपत्र कायद्याच्या न्यायालयात मान्य होण्यासाठी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत, केवळ हक्कसोडपत्र असणे पुरेसे नाही. पुरावा म्हणून न्यायालयात मान्य होण्यासाठी हक्कसोडपत्राची सक्षम दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.
हक्क सोडपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे,मालमत्तेची नोंदणीकृत कागदपत्रे, लेखी दस्त ,सर्व सह्दायकांचा तपशील.
एकदा नोंदणीकृत झालेले हक्कसोडपत्र सामान्य परिस्थितीमध्ये रद्द केले जाऊ शकत नाही. १९०८ च्या नोंदणी कायद्यांतर्गत हक्कसोडपत्राची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही निर्णय बदलू शकत नाही. परंतु, तो फक्त पुढील परिस्थितीतच रद्द केला जाऊ शकतो.
जर तुम्हाला हक्क सोडपत्र करण्यास तुमच्या मर्जीच्या विरुद्ध भाग पाडले किंवा प्रभावित केले असेल तर.
जर तुमची हक्कसोडपत्र घेण्यासाठी फसवणूक झाली असेल तर.
जर हक्कसोडपत्रात चुकीचा मजकूर लिहिला गेला असेल तर.
हक्कसोडपत्रात विसंगती असल्यास.
हक्क सोडपत्र रद्द करण्याची कालमर्यादा
हक्कसोडपत्राचा दस्त अंमलात आणल्यानंतर तीन वर्षांच्या आत वरील परिस्थितीमध्ये हक्कसोडपत्र रद्द केले जाऊ शकते. तीन वर्षानंतर हक्कसोडपत्राचा दस्त रद्द करता येणार नाही.
हक्कसोडपत्राच्या दस्ताची नोंदणी करणे आवश्यक
नोंदणी कायदा, १९०८ च्या कलम १७(१) ब नुसार, स्थावर मालमत्तेबाबत एकतर हक्क निर्माण किंवा हस्तांतरित केले जाणारे दस्त नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. म्हणून, आवश्यक कायदेशीर प्रमाणीकरण देण्यासाठी हक्कसोडपत्राचा दस्त नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
नोंदणी कायद्याच्या कलम ४९ मध्ये असा आदेश आहे, की जर हक्कसोडपत्राची नोंदणी केलेली नसेल तर, वाद उद्भवल्यास अनोंदणीकृत हक्कसोडपत्रचा दस्त कायद्याने न्यायालयात स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे हक्कसोडपत्र कायदेशीर वैधतेसाठी नोंदणीकृत केले पाहिजे.
गुजरात हायकोर्टाने ७ जुलै २०२१ रोजी सांगितले, की ज्या दस्तऐवजाखाली मालमत्तेवरील अधिकार सोडला जात असेल, अशा दस्ताची नोंदणी कायद्यांतर्गत औपचारिकपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.
हक्कसोडपत्र तयार करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
१९०८ च्या नोंदणी कायद्याच्या कलम १७ अंतर्गत स्थावर मालमत्तेचा हक्कसोडपत्र तयार करणे अनिवार्य आहे.
हक्कसोडपत्र दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत तयार केले जाते.
सर्व संबंधित पक्षांनी कागदपत्रावर रीतसर स्वाक्षरी करावी.
हक्कसोडपत्राचा दस्तावेज पैशाच्या मोबदल्यात किंवा त्याशिवाय तयार केले जाऊ शकते.
शेवटी, जेव्हा सह-हिस्सेदाराला त्याचा/तिचा हिस्सा दुसऱ्या सह-हिस्सेदाराला हस्तांतरित किंवा सोडायचा असेल तेव्हा हक्कासोडपत्राची आवश्यकता असते.
हक्कसोडपत्र कोणाला करता येते?
ज्या व्यक्तीचा ठरावीक मालमत्तेमध्ये हक्क आहे त्याच व्यक्तीला हक्कसोड पत्र करता येते. वारस हक्काने आई वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींना देखील वाटा शासनाने कायद्याप्रमाणे असल्याचे नमूद केले आहे त्यामुळे मुली त्यांचा हक्क घेतात किंवा हक्कसोड प्रमाणपत्र देऊन शासकीय कागदपत्रांवर सही करून देतात. हक्कसोडपत्र हे आपल्या हिश्शाच्या काही भागाचे किंवा संपूर्ण भागाचे करता येते.
मालमत्तेच्या वाटाघाटींमध्ये हक्कसोडपत्राचे महत्त्व
शहरी आणि ग्रामिण भागात दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यांमध्ये हक्कसोड प्रमाणपत्र तयार केले जाते. एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असतील तर ते त्यांचा हिस्सा सोडत असल्यास त्यांच्या नावे हक्कसोड प्रमाणपत्र देतात. त्यानंतर वंशपरंपरागत मालमत्तेतील त्यांचा काहीही हक्क नाही असा त्याचा अर्थ होतो. एकदा नोंदणीकृत पद्धतीने हक्कसोड पत्र दिल्यानंतर मालमत्तेतून हक्क सोडलेल्या व्यक्तीचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही.
एखादी व्यक्ती हक्कसोडपत्र रद्द करू शकते का?
जर हक्कासोडपत्र करून देणाऱ्याची हक्कसोडपत्र मिळविण्यासाठी फसवणूक केली गेली असेल, किंवा त्याला हा हक्कासोडपत्र करण्यासाठी भाग पाडले गेले असेल किंवा त्याचा प्रभाव पडला असेल तर हक्कासोडपत्राचा दस्त सक्षम दिवाणी न्यायालयामार्फत रद्दबातल केला जाऊ शकतो.
हक्कसोडपत्र रद्द करण्याची कालमर्यादा
हक्कासोडपत्राचा दस्त केल्यापासून तीन वर्षांच्या आत हक्कसोडपत्र रद्द केले जाऊ शकते. त्यासाठी सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून मा.दिवाणी न्यायलय पुराव्याअंती व सुनावणी नंतर बेकायदेशीर झालेले हक्कासोडपत्राचा दस्त रदबातल करू शकते.
कोणत्या प्रकारच्या मालमत्तेमध्ये हक्कसोडपत्र केले जाऊ शकते?
केवळ वारसाने मिळालेल्या व ज्या मालमत्तेमध्ये हक्कासोडपत्राचा दस्त करून देणाऱ्याचा हिस्सा असेल असा सह-हिस्सेदारच मालमत्तेच्या बाबतीत हक्कसोडपत्र करून देऊ शकते.
हक्कसोड पत्राच्या दस्तात कोणत्या गोष्टी नमूद करण्यात येतात?
हक्कसोड पत्र नोंदणीकृत पद्धतीने आणि कायद्यानुसार करताना त्यामध्ये काही कायदेशीर बाबींचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात येतो.
हक्कसोडपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव,वय,पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील.
हक्कसोडपत्र घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील.
एकत्र कुटुंबाच्या वंशावळीचा कागद.
एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सानिहाय विवरण.
दोन साक्षीदार व त्यांची नावे, वय, पत्ता याचा संपूर्ण तपशील.
हक्कसोडपत्राचा अंमल कुठे होतो?
हक्कसोडपत्राचा अंमल ७/१२ वर वारसांची व इतर अधिकार सदरी असलेली नावे कमी करण्यासाठी होतो. दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रत तलाठी कार्यालयात द्यावी लागते. संबंधित व्यक्तीने सादर केलेले सर्व कागदपत्रे आणि तपशील तलाठी कार्यालयात तपासले जातात. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असले तरच गाव नमुना ६ मध्ये त्याची तलाठीद्वारे नोंद केली जाते आणि सर्व हितसंबंधितांना नोटिस बजावली जाते. अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करणे अवैध आहे.
: bvberule@gmail.com (लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.