
भीमाशंकर बेरुळे
Property Disputes: सर्वसाधारण नियम असा आहे की, एकदा हिंदू एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये करण्यात आलेली वाटणी कायमस्वरूपाची असते, त्यात पुन्हा फेरबदल करता येत नाही. वाटणीनंतर वाटणी हिस्सा आलेल्या क्षेत्रात काळी सकस माती टाकून, जलसिंचनाची सोय करून, नगदी पिके घेण्याच्या दृष्टीने तो त्याच्या वतनी हिश्शाच्या क्षेत्राचा विकास करतो व त्यामुळे इतर सहदायक नंतर त्यांची वाटणी बदलून मिळण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणूनच एकदा झालेली वाटणी ही कायमस्वरूपी असते.
परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये व ठरावीक कारणांमुळे एकदा झालेली वाटणी पुन्हा उघडता येते. (Partition Re-open) अर्थात, वाटण्या होऊन जी संपत्ती विभागली गेलेली असते. त्या सदस्यांचे हिस्से रद्द करून पुन्हा संपत्ती एकत्रित करण्यात येते. त्याचे पुन्हा विभाजन करण्यात येते. याला वाटणी पुन्हा उघडणे असे म्हणतात. एकदा झालेल्या वाटण्या रद्द करून संपत्ती पुन्हा एकत्र करून त्याच्या पुन्हा वाटण्या, खालील परिस्थितीत करता येतात.
आईच्या उदरातील गर्भ
पूर्वीच्या काळी आजच्या तुलनेत वैद्यकीय सुविधेचा अभाव असल्याने आणि बहुपत्नीत्व यामुळे देखील बऱ्याच वेळा एकत्रित कुटुंबाची वाटणी होत असे. वाटणीवेळी गर्भात असणारा सदस्य वाटणीनंतर जन्माला येत असत. गर्भधारणा म्हणजेच मुलाचा जन्म असे होत असून, वाटणीवेळी एकत्रित कुटुंबाच्या कर्त्याची पत्नी गर्भवती असेल, तर सदर गर्भधारणा कालावधीपर्यंत वाटणी करू नये किंवा जर वाटणी झालीच तर गर्भातील मुलाचा/मुलीचा देखील हिस्सा ठेवण्यात यावा असे कायद्याने अपेक्षित आहे.
परंतु काही सहदायक यास बगल देत वाटणी करून घेतात. सदर गर्भातील मुलाचा/मुलीचा हिस्सा काढून ठेवत नाहीत. त्यामुळे वाटणी झाल्यानंतर जन्मास आलेल्या मुलास/मुलीस देखील वाटणी सर्व मालमत्तेत त्याचा हिस्सा मिळतो, अशावेळी झालेली वाटणी रद्दबातल होऊन नव्याने वाटणी होते. वाटणी होताना कुटुंबाचा एखादा सदस्य जर काही कारणास्तव वारस होण्यापासून वंचित झाला असेल तर नियोजन जसे की, एखादा सदस्य कोणत्याही कारणास्तव वाटणी मागण्यास वाटणी समयी अपात्र झाला असेल, जसे की एखाद्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असेल, किंवा वाटणी समयी सहदायकाने हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर केले असेल,
नपुंसक असेल, दुर्धर आजाराने ग्रस्त असेल तर अशा सहदायकास वाटणीमध्ये वाटणी हिस्सा दिला जात नाही. म्हणजेच तो सदस्य वाटणी मागण्यास अपात्र झाला, परंतु जर नंतर न्यायालयाने निर्दोष केले असेल, परत हिंदू धर्मात आला असेल, त्याचे आजारपण संपुष्टात आले असेल, म्हणजेच वाटणी समयी तो ज्या कारणामुळे वाटणी मागण्यास अपात्र झाला असेल ते कारण संपुष्टात आले असेल, अशा परिस्थितीत झालेली वाटणी पुन्हा उघडता येईल व नव्याने वाटणी करण्यात येते.
वाटणीनंतर आईची गर्भधारणा
पूर्वीच्या काळी, आजच्या एवढ्या वैद्यकीय सुविधा नसत व त्यामुळे मासिक धर्म पूर्ण होईपर्यंत स्त्रिया मुलांना जन्म देत असत. त्यामुळे वाटणी झाल्यानंतर एकत्रित कुटुंबाच्या कर्त्याची पत्नी मुलांना जन्म देत असत. त्यामुळे वाटणीनंतर जन्मास आलेल्या एकत्रित कुटुंबाच्या कर्त्याची पत्नीच्या मुलीस/मुलास देखील पहिल्या जन्मलेल्या सदस्याएवढाच समान वाटणी हिस्सा मिळतो. त्यासाठी सदर सदस्य जन्मास येण्यापूर्वी झालेली वाटणी रद्दबातल होते आणि नव्याने वाटणी करता येते.
वाटणीच्या वेळी अनुपस्थित सदस्य
हिंदू एकत्रित कुटुंबातील कोणत्याही सदस्याने वाटणी करून त्याचा हिस्सा मागणी केली तर सर्व सदस्यांमध्ये वाटणी होऊन सर्वाना हिस्सा देणे अपेक्षित आहे. परंतु काही वेळा वाटणी होत असताना एखादा सदस्य हा बाहेरगावी असतो, लष्करी सेवेमध्ये असतो, किंवा तीर्थयात्रेस गेलेला असतो, किंवा एखादा सदस्य त्याच्या कोणत्याही वैद्यकीय कारणास्तव वाटणी घेण्यास उपलब्ध नसेल, फरार असेल, घर सोडून निघून गेलेला असेल तर त्याचा वाटणी हिस्सा न देता किंवा न काढून ठेवता, इतर सदस्य आपापसात वाटणी करून घेतात. त्यानंतर सदर गैर-हजर सदस्य परत आला किंवा त्यांचे वैद्यकीय असमर्थता दूर झाली तर झालेली वाटणी रद्दबातल होते. नव्याने वाटणी होते आणि वाटण्या पुन्हा उघडता येतात.
अवयस्क सदस्य
जर परिवाराची वाटणी होत असेल आणि सदर वाटणी वेळी एखादा सदस्य अज्ञान असेल, तर त्याला देखील सदर वाटणीमध्ये इतर सदस्याएवढाच समान हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे. सदर वाटणीमध्ये जर सदर अज्ञान सदस्यास वाटणी दिली नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर त्याचा वाटणी हिस्सा मिळू शकतो. म्हणून वाटणीच्या वेळी आवश्यक असलेला सदस्य, वयस्क झाल्यावर वाटणी पुन्हा उघडण्यात येते. सर्व मालमत्तेचे पुन्हा नव्याने विभाजन होते.
जर वाटण्याच्या वेळी काही फसवणूक झाली असली तर ...
अनेकदा आपण पाहतो, की, एकत्रित कुटुंबाची मालमत्ता व त्याचे व्यवस्थापन हा घरातील ज्येष्ठ पुरुष पाहत असतो. इतर सदस्य त्यास मदत करीत असतात किंवा काही सदस्य अज्ञान असतात. एखाद्या सदस्याने एकत्रित कुटुंब असताना, वाटणीपूर्वी एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नातून काही संपत्ती अर्जित केली, परंतु ती इतर सदस्यांपासून लपवली असेल व वाटणी नंतर ती उघडकीस आली असेल तर एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नातून अर्जित केलेल्या सदर मिळकतीमध्ये इतर सर्व सदस्यांचा देखील समान हिस्सा येतो, परंतु वाटणी वेळी सदर मालमत्ता ही त्या सदस्याने लपविली असल्याने इतर सदस्यांची फसवणूक झाली असे म्हणता येईल. सदर वाटणीवेळी समाविष्ट न केलेली/लपविलेली मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या इतर सर्व मालमत्तेमध्ये समाविष्ट करून पहिली वाटणी रद्दबातल करून नव्याने वाटणी करता येते.
वाटण्याच्या वेळी काही चूक झाली असल्यास...
अनेकदा असे दिसून येते की, एखाद्या सहदायकाला वाटणीमध्ये देण्यात आलेली मालमत्ता गहाण ठेवण्यात आली होती, किंवा सदर मालमत्ता संपादित झाली होती, किंवा एखाद्या मालमत्तेवर एकत्रित कुटुंबाची मालकी नव्हती, परंतु वाटणीमध्ये सदर मालमत्ता सहदायकाला वाटून देण्यात आली आहे व नंतर सदर चूक माहिती झाली असेल तर, झालेली वाटणी रद्दबातल होते. उर्वरित मालमत्तेमधून त्या सदस्यास त्याचा हिस्सा देण्यासाठी वाटणी उघडली जाऊ शकते.
सोडलेल्या किंवा वगळलेल्या मालमत्तेचा भाग
संयुक्त मालमत्तेचा काही भाग चुकून, अपघाताने किंवा फसवणुकीने विभाजनातून सोडला किंवा वगळला गेला असेल, किंवा संयुक्त मालमत्तेमधून मुलींनी किंवा एका मुलीने मिळकतीमधील तिचा हिस्सा, तिच्या भावांच्या हक्कात सामाईक सोडला असेल, तेव्हा झालेली वाटणी रद्दबातल होऊन नव्याने वाटणी होते.
वाटणी झाल्यावर देखील पुन्हा एकत्र येणे शक्य
अपवादात्मक परिस्थितीमध्ये एकदा झालेली वाटणी रद्दबातल करून नव्याने वाटणी करता येते, तशीच, वाटणी झाल्यावर देखील पुन्हा एकत्र होता येते. वाटणी ही सुखकर घटना नसून, वाटणीमुळे एकत्रित कुटुंबाचे अस्तित्व संपुष्टात येते. एकत्रित कुटुंबाची शक्ती विखुरली जाते. प्रेममय वातावरण बिघडते. सुख, दुःख, आपुलकी याची परिभाषा बदलते. त्यामुळे त्वेषाने वाटणीची मागणी करणारे सर्वच सदस्य वाटणीने व परिवारापासून विभक्ती करणाने आनंदी नसतात.
अनेकदा वाटणी नंतर वेगळे राहिल्याने आनंद,प्रेम, आपुलकी कमी होते, म्हणून काही सदस्य वाटणीनंतर परत एकत्र होण्याचा मानस जाहीर करतात. अशा परिस्थितीमध्ये त्या सदस्यास एकत्रित येण्याचा त्याचा मानस हा “हक्क” म्हणून बजावता येणार नाही, मात्र इतर सदस्यांच्या संमतीने व त्यांचा मर्जीने झालेली वाटणी रद्दबातल करूनच परत एकत्र राहता येते.
वाटणी नंतर एकत्र येण्याचा हा अधिकार सर्वांना नसून केवळ वाटणी करून विभक्त झालेल्या एकत्रित कुटुंबाच्या सदस्यांनाच आहे. जे की, मूळ विभाजनाचे सदस्य होते, त्यांनाच पुन्हा एकत्र होता येते. वाटणी करून आपापले हिस्से वेगळे करून घेतल्यानंतर ही प्रेमापोटी सहदायक त्यांच्यातील वाटणी रद्द करून पुन्हा एकत्रित होऊन राहू शकतात.
एकत्र होण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे लिखित कराराची आवश्यकता नाही. एकत्र झाल्यावर पुन्हा सर्वांची संपत्ती ही संयुक्त ‘कुटुंबाची संपत्ती’ होते. एकत्रित हिंदू कुटुंबाप्रमाणे पुन्हा त्यांचे अधिकार व कर्तव्य अस्तित्वात येतात.
bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.