Agriculture Policy : शेतीला प्रतिष्ठा देणारे हवे धोरण

Agriculture Prestige : लग्नासाठी शेतकरी मुलगा नको, नोकरी हवी हा अट्टहास उपवर मुलींचा व त्यांच्या आई-वडिलांचा असतो. नोकरी तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची असली तरी चालणार असते. मात्र ती सरकारी असावी, अशी अट असते. शेतीला प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही.
Agriculture Policy
Agriculture PolicyAgrowon

डॉ. सतीश करंडे

Agriculture News : काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एका बातमीने लक्ष वेधले. नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही या कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली. बातमी वेदनादायीच! मुलगा शेती करतो म्हणून लग्न होत नाही, ही समस्या मागील दहा-पाच वर्षांपासूनची! सुरुवातीला कोरडवाहू शेती आहे, शेती कमी आहे, अशी कारणे देऊन मुली नकार देत होत्या.

आज केवळ मुलगा शेती करतो या एकाच कारणासाठी सर्व शेतकरी मुलांना नकार दिला जात आहे. तीन-पाच हजार लोकवस्तीच्या गावामध्ये किमान ५०-६० तिशी पार केलेली विवाहेच्छुक मुले आहेत. ज्यांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत.

ही गावे सर्व प्रकारची आहेत म्हणजे बागायती, कोरडवाहू ऊस शेती, फळ शेती असणारी! मुलींचा व त्यांच्या आई-वडिलांचा शेतकरी मुलगा नको, नोकरी हवी हा अट्टहास आहे. नोकरी तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची असली तरी चालणार असते. मात्र ती सरकारी असावी अशी अट असते. म्हणजे वार्षिक ७-८ लाख कमाई असावी असा त्याचा अर्थ.

दुसऱ्या बाजूला डाळिंब-द्राक्ष शेतीतून १० लाख कमावले, कलिंगड काकडीतून बारा लाख कमावले, पाच एकर उसातून हमखास आठ लाख मिळतातच अशा यशोगाथा सुद्धा ऐकायला-वाचायला-पाहायल मिळत असतात. तरीही एवढी कमाई असणाऱ्‍या शेतकरी मुलांचे सुद्धा लग्न होत नाही. त्याला अनेक कारणे देता येतील.

परंतु सार स्वरूपात असे म्हणता येते, की शेती म्हणजे काबाडकष्ट, ताणतणाव आणि उत्पादन-उत्पन्न सातत्याची हमी नसणारा व्यवसाय. त्यामुळे शेती नकोच! युवा वर्गाला संधी मिळताच शेती सोडायची आहे आणि मुलींना शेतकरी नवरा नको आहे.

याविषयावर बऱ्याच चर्चा झाल्या. मी त्यावेळी एका कृषी महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्या वेळी आयोजित केलेल्या परिसंवादातील अनुभव आजही नमूद करण्यासारखे आहेत.

कृषी महाविद्यालय असल्याने बहुतांश मुली या शेतकरी कुटुंबातील. चर्चेत सहभागी मुलींपैकी एका मुलींने सांगितले की मला शेतकरी नवरा नको आहे. कारण माझी आई तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी.

Agriculture Policy
Agriculture Policy : धोरण बदलांच्या प्रतीक्षेत कृषी बाजार

ती मोठी शेती असणाऱ्‍या घरी लग्न होऊन आली. तिच्या चुलत बहिणींची लग्ने मात्र शहरामध्ये बँक, एस.टी. शाळा अशा ठिकाणी तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्‍या मुलांशी झाली. त्यांच्याकडे माझ्या आईच्या तुलनेत फार कमी शेती.

परंतु त्या माझ्या आईच्या तुलनेत खूप सुखी. सुखी म्हणजे काय? तर घरामध्ये सोयीसुविधा, मुलांचे वाढदिवस साजरे होत, ती सहलीला जात, आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जाणे, मुलांना चांगले क्लास लावणे हे सर्व त्यांना शक्य झाले.

आम्हाला ते मिळाले नाही. आईचा दिवस पहाटे पाचला सुरू व्हायचा. शेती उत्पादन चांगले आले तरी तिचे कष्ट कमी नाही झाले. घरातील गरजेच्या वस्तूंची खरेदी सुद्धा वेळेवर होत नसे. कुकर मिक्सर सारख्या कष्ट कमी करणाऱ्‍या वस्तू माझ्या आईला फार उशिरा खरेदी करता आल्या.

गौरी-गणपती असो की दसरा-दिवाळी हे सर्व सण म्हणजे कामाच्या धांदलीचेच! उडीद सोयाबीन पावसात भिजेल की कापूस कीड फस्त करेल या चिंतेत तिचे सण पार पडत. सणांचा आनंद हा विषय आमच्यासाठी दुर्मीळच!

दुसऱ्‍या मुलीने सांगितले की एखाद्या वर्षी उत्पन्न चांगले मिळाले की मोटारसायकल खरेदी केली जाते. परंतु आईसाठी काही खरेदी होत नाही. एक मुलगी म्हणाली माझ्या मामाला उसाचे चांगले पैसे झाले. त्याने निवडणूक लढवली.

त्यामुळे त्याच्या मुलीला डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा लागला. आम्ही प्रश्‍न विचारला की गावोगावी बंगले आणि गाड्या दिसतात? ते कसे काय? एका मुलीने उत्तर दिले ते सुद्धा प्रतिष्ठेसाठी आणि घरातील मुलांची लग्ने व्हावीत म्हणून!

थोडक्यात, आज ग्रामीण भागातील मुलींचे अनुभव हे त्यांनी त्यांच्या आईचे पाहिलेले काबाडकष्ट आणि संपूर्ण कुटुंबानेच अनुभवलेले जीवन यावर आधारित आहेत. त्यामुळे शेतकऱ्‍याला राजा म्हणा की  जगाचा पोशिंदा म्हणा की ‘वावर आहे म्हणजे पॉवर आहे’, असे म्हणा. परंतु आम्ही शेतकरी नवरा करणार नाही. यावर मुली ठाम आहेत.

Agriculture Policy
Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

लग्न या व्यवस्थेचा/संस्थेचा जन्मच मुळी शेती या व्यवसायातून झालेला आहे. हजारो वर्षे मनुष्य प्राणी जंगलात भटकत गुजराण करीत होता. तो टोळीने राहत होता, भटकत होता. शेतीचा शोध लागला आणि तो स्थिरावू लागला.

त्यातून जमिनीची मालकी असावी असे वाटू लागले. त्यासाठी संघर्ष झाले. त्यातून जमिनीची मालकी प्रस्थापित झाली. ती पुढच्या पिढीसाठी राहावी या प्रेरणेने लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे अशी व्यवस्था उभी राहिली. येथे वर्णन केलेल्या मुलींच्या आयांची लग्ने साधारण ३५-४० वर्षांपूर्वी झाली असावीत.

तोपर्यंत जमीन जुमला, विहिरींची संख्या, बैलांच्या जोड्या, महिनोन्‌महिने चालणारी सुगी आणि कडब्याच्या गंजीची उंची हे विषय मुलगा निवडण्याचे निकष होते. आज परिस्थिती पार बदललेली आहे. सुरुवातीला काहीशा थट्टा-विनोदाने होणारी या विषयाची चर्चा आज गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे.

लग्न जुळवून देणारे एजंट गावोगावी फिरत आहेत. त्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहेत. आईवडील अगतिक झाले आहेत. तरुण मुलांचा तणाव वाढत आहे. शेती करणे हा काय अपराध आहे का, अशी त्यांची भावना बनली आहे. ते हताश आहेत. त्यातून व्यसनाधीनता वाढली आहे. सध्या चर्चासुद्धा करता येत नाही असे अनेक सामाजिक प्रश्‍न तयार होत आहेत. हे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे.

मुलींच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या अपेक्षेत अजिबात गैर आहे असे वाटत नाही. त्यांना तू शेतकरी मुलाशी लग्न कर म्हणून प्रवचन- सल्ला देण्याऐवजी धोरणकर्त्यांनी समग्र विचार करून शेतकरी मुलांना नोकरी सारखेच सातत्यपूर्ण उत्पादन आणि किमान चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनाएवढे उत्पन्न मिळविणारे, २४ तासांच्या शेतीऐवजी ६-८ तासांची कार्यक्षम शेती पद्धती, शेतीतील जास्तीचे काबाडकष्ट आणि ताणतणाव कमी करणारे, प्रतिष्ठा उंचावणारे पर्यायी शेती धोरण हवे. तसे एकात्मिक शेती प्रारूप तयार सुद्धा आहे.

केवळ युवा शेतकऱ्यांसाठी असे धोरण असले पाहिजे. होऊ घातलेल्या पाच ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेमध्ये एखादा लाख कोटी युवा शेतकऱ्यां‍साठी राखून ठेवणे सहज शक्य आहे. हे नाही झाले तर बाविसाव्या मजल्यावर राहणाऱ्‍या रोहित रोहनची लग्ने होतील.

परंतु बावीस एकर शेती पिकवणाऱ्‍या सचिन संतोष आणि संग्रामला मुली मिळणार नाहीत. त्यामुळे केवळ लग्न होण्यासाठी तरी शहराकडे चला... अशी युवा वर्गाची बदलती भूमिका मात्र कुणालाच परवडणारी नाही. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्‍न तयार होतील, हे मात्र नक्की.  

(लेखक शाश्‍वत शेती विकास मिशनचे सल्लागार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com