
Eco-friendly economy: आर्थिक विकासाच्या आपल्या संकल्पनांमध्ये नफा, फायदा आणि फक्त स्वतःचा विस्तार इतक्याच बाबींना प्राधान्य दिले जाते. त्यावेळी पर्यावरणासह सर्व बाबींचे शोषण करण्यातही वावगे वाटत नाही. मात्र हा विकास शाश्वत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला शाश्वत विकासाच्या हरित अर्थव्यवस्थेची दिशा पकडायला हवी. कदाचित तिच्या वाढीचा वेग किंचित कमी असेल, पण होणारा विकास नक्कीच शाश्वत असू शकेल.
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर गेल्या तीनशे वर्षांत एका बाजूला प्रगतीचे वारे वाहू लागले. मात्र एकांगी विकासामध्ये गेल्या ५०-६० वर्षे जगभरात निसर्गाची अपरिमित हानी झालेली आहे. ती आजही सुरूच आहे. जैवविविधता नष्ट होतानाच अन्नसाखळ्या आणि अन्न मनोरे उद्ध्वस्त होत गेलेले दिसतात. अधिवास नष्ट होत असल्यामुळे एकेक प्रजाती नष्ट होत असून, त्यावर आधारीत अन्नसाखळ्या नष्ट होत आहेत.
माणसाच्या आजच्या विकासाच्या कल्पना संपूर्ण सृष्टीला संपवण्याकडे नेत असल्याचे इशारे जागतिक पातळीवरील पर्यावरणतज्ज्ञ व विविध संघटना सातत्याने देत आहेत. या प्रयत्नामुळे काही प्रमाणात तरी जागरूकता निर्माण होत आहे. त्यातूनच उरलीसुरली जंगले, कांदळवने, नद्यांचे पाणी, समुद्र ,पाणथळ जागा, गवताळ कुरणे, शेतीतील स्थानिक बी बियाण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. एकट्या दुकट्या व्यक्तींचे हे काम नाही, तर त्यासाठी हवा आहे मोठ्या प्रमाणात लोकसभाग.
सामान्यजनांना या संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये आणण्यासाठी निसर्गाच्या आणि परिसंस्थाच्या संवर्धनातूनच त्यांच्या उत्तम जीवनमानाचा मार्ग जात असल्याचे पटवून द्यावे लागणार आहे. त्यांना सामावून घेणाऱ्या उपक्रमांची आखणी करावी लागणार आहे. या संदर्भात सामान्य लोकांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व उपाययोजनांबाबत ज्ञान व प्रशिक्षण देत राहणे, उपक्रमांसाठी आवश्यक ती मूलभूत संसाधने पुरवणे, ही सरकार व प्रशासनांची जबाबदारी आहे. जिथे शक्य तिथे समाजातील प्रत्येक आपापल्या परीने आवश्यक ते योगदानही नक्कीच दिले पाहिजे. निसर्ग जपतानाच त्यातून पर्यावरणपूरक असे अर्थव्यवस्थाही उभारणे शक्य आहे.
अशा अर्थव्यवस्थांना हरित अर्थव्यवस्था (ग्रीन इकॉनॉमी) असे म्हटले जाते. जी अर्थव्यवस्था मानवी कल्याण आणि सामाजिक समता सुधारतानाच पर्यावरणीय धोके आणि कमतरता कमी करते, तिला ‘हरित अर्थव्यवस्था’ म्हणतात. एकेकाळी प्रामुख्याने विकसित देशांमध्ये सुरू असलेली ही चळवळ आता भारतात आणि महाराष्ट्रातही राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘आरोग्यपूर्ण परिसंस्थाच देऊ शकतात आरोग्यपूर्ण अर्थव्यवस्था’ (हेल्दी इकोसिस्टीम गिव्हज हेल्दी इकॉनॉमी) हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. हे लोक सामान्यतः पाणी, जंगल, समुद्र, गवताळ प्रदेश आणि सेंद्रिय शेतीवर प्रामुख्याने काम करत आहेत.
आयाड नदीच्या पुनरुज्जीवनाची गोष्ट
निसर्ग संवर्धनावर काम केल्यास त्यातून कशी शाश्वत रोजगार निर्मिती होते, याची अनेक उदाहरणे आहेत. खरेतर या यशोगाथांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत राहणे गरजेचे आहे. उदाहरण म्हणून आपण राजस्थानमधील उदयपूर येथील तलावाची आणि त्याला पाणी पुरविणाऱ्या आयाड नदीच्या प्रदूषणापासून मुक्ततेसाठी केलेल्या प्रयत्नांची यशोगाथा पाहू. हे साध्या साध्या प्रयत्नातून शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत रोजगार हे दोन्ही साध्य करणारी हरित अर्थव्यवस्था कशी कार्यान्वित होते, याचे उत्तम उदाहरण आहे.
राजस्थानमधील उदयपूरचा तलाव केवळ भारतातच नाही, जगामध्ये त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या तलावात आयाड नदीचे पाणी येते. ही आयाड नदी प्राचीन काळापासून ‘आहार’ या नावाने अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहे. या नदीकिनारी फुललेल्या संस्कृतीला किमान चार हजार वर्षाचा इतिहास आहे. बरे, या आयाड नदीचे पात्रही काही छोटे नाही. आयाडच्या पात्रामधून ७० एमएलडी म्हणजे दररोज सात कोटी लिटर पाणी वाहत असे. पावसाळ्यात तर हे प्रमाण ९० एमएलडीपर्यंत (नऊ कोटी लिटर प्रति दिन) जाई. अशी ही नदी १९८० नंतर प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली. बघता बघता आयाड नदीचे स्वरूप शहरी मैलापाणी वाहणाऱ्या गटारगंगेत झाले. परिणामी, या नदीच्या पाण्यावर तयार झालेला उदयसागर तलावालाही उदयपूरच्या ‘सेप्टिक टॅंक’ चे स्वरूप आले.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात उन्हाळ्याच्या प्रारंभी नदीत मोठ्या प्रमाणावर फेस दिसू लागला. नदीत हे पांढरे काय आले याचा बोध गावकऱ्यांना प्रारंभी होत नव्हता. नदीत रसायन मिसळण्याचे प्रमाण वाढल्यावर तर नदीवर सहा सहा फूट उंचीचे फेसाचे थर दिसू लागले. वाऱ्याच्या झुळकीबरोबर हा फेसही उडायचा. रस्त्यावरून वाहणाऱ्या गाड्यांवर, माणसांवर किंवा परिसरातल्या झाडापिकांवरही हा फेस जाऊन पडायचा. त्यामुळे परिसर पांढुरका दिसू लागला.
जणू कापसाचे धागे ओढून लावले असावेत किंवा हलकी हिमवृष्टी झाल्यावर परिसर जसा दिसेल, तसा हा परिसर दिसू लागला. हे रसायनांचे प्रदूषण केवळ नदीपुरतेच कसे राहणार, तर त्याने परिसरातील भूगर्भातील पाणीही प्रदूषित करून टाकले होते. त्यामुळे नदी किंवा विहिरीतले पाणी उपसले तर फक्त घाणच यायची. हे पाणी किती खराब होते माहितेय? तर कुणी नदीचे, विहिरीचे किंवा गावातल्या हातपंपाचे पाणी नुसते जरी तापायला ठेवले तर दूध जसे फाटून जाते, ते फाटून जायचे.
हे प्रदूषण जसजसे वाढत गेले तसतसे नदीतीरावरील व आसपासच्या चाळीस-पन्नास गावांचे गावपणच संपत गेले. त्यांच्या शेतात पिकणाऱ्या भाजीपाल्याला, धान्याला बाजारात कवडीची किंमत मिळेनाशी झाली. प्रदूषित पाणी, असह्य दुर्गंधी आणि डासांच्या थव्यांमुळे रोगांनी तर चक्क थैमानच घातलेले. लोकांना हाडांचे, पोटाचे विकार सतत होत असल्यामुळे गावकरी बेजार झाले होते. हे थांबायला हवे, साऱ्या गावकऱ्यांना वाटायचे, पण कसे याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. ते सारेजण सरकारकडे आणि प्रशासनाकडे आस लावून बसलेले, पण सुस्त आणि ढिम्म यंत्रणा जागी कधी होणार?
शहरातील सांडपाणी नदीमध्ये तसेच जाण्यापासून रोखण्यासाठी ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बांधण्याची आवश्यकता व्यक्त होत होती. पण उदयपूर महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नव्हता. राजस्थान सरकारकडेही मागणी करून झाली, पण योग्य प्रतिसाद मिळत नव्हता.
अशा वेळी पर्यावरणप्रेमी लोकांनी उदयपूरमध्ये एक पाणी प्रश्नांसंदर्भात परिषद भरवली. त्यात नदी सुधाराच्या वेगवेगळ्या मॉडेलवर तज्ज्ञांची चर्चा घडवून आणली गेली. त्यात पुणे येथील संदीप जोशी यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीशिवाय नदीतील पाणी शुद्ध करण्याविषयीचे आपले मॉडेल मांडले. आमची संस्था ही समस्या नक्कीच सोडवू शकते, फक्त लोकसहभागाची आवश्यकता स्पष्ट केली.
आर्थिक निधीसाठी शासनावर फारसे अवलंबून राहण्यापेक्षा उदयपूरमधील विविध उद्योजक, कारखानदारांना पुढाकार घेतला. ज्यांना शक्य आहे, ते लोक विशेषतः नदीकाठावरील सामान्य लोक श्रमदानातून मदत करतील. प्रत्येक गावकऱ्यांनी काही पाळावयाची पथ्ये व नियम स्पष्ट करण्यात आले. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, गळी उतरवणे यासाठी सातत्याने प्रबोधन व प्रशिक्षण करण्याची आवश्यकता होती. हे सर्व लोक स्वतःहून पुढे आल्याचे पाहताच महानगरपालिका प्रशासनही योगदानासाठी पुढे आले.
त्यांच्याकडे निधीची उपलब्धता नसली तरी त्यांनी नदीभोवतीचे अतिक्रमण हटविण्यामध्ये व अन्य आवश्यक त्या बाबींमध्ये मोलाची मदत केली. पुढील लेखामध्ये नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊ.
हरित अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे
पाणी, हवा, माती, पर्यायाने अन्नामधील प्रदूषण शून्यावर आणणे.
शाश्वत जीवन प्रणालीचे पालन करत आर्थिक प्रगती करणे.
विकासासाठी पर्यावरणाचे शोषण नाही, तर संवर्धन करणे.
याचा होतो साधारण समावेश
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती,
शाश्वत शेती पद्धती,
हरित आणि पर्यावरण पूरक इमारती
पर्यावरण पोषक पर्यटन
पर्यावरणपूरक मासेमारी
उपक्रम
पुनर्वापर योग्य वस्तूंची निर्मिती, उत्पादन.
पुनर्वापरायोग्य वस्तूंच्या वापरातून कचरा कमीत कमी निर्माण होईल, यावर भर दिला जातो.
उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम आणि परिणामकारक वापर करणे.
सामान्य लोकांना आवश्यक त्या सेवा पुरवणे.
अशा विविध उपक्रमातून उद्योजकता विकासाला आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळते. अशा प्रकार तयार होणाऱ्या रोजगार आणि नोकऱ्यांना हरित रोजगार असेही संबोधले जाते.
संपर्क : सतीश खाडे , ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.