Environment Day : विकास हवा की शुद्ध हवा?

Air Pollution : देशातील शहरे-महानगरांमध्ये वेगाने वाढत चाललेल्या वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत चालली आहे. मध्यंतरी दिल्लीतील हवेची चर्चा अगदी जगभरात झाली.
Air Pollution
Air PollutionAgrowon

एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण मानवजातीपुढे सर्वांत मोठे आव्हान बनलेल्या जागतिक तापमानवाढीबाबत सबंध जगभरातील पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता आहे. तथापि, तापमानवाढीचे मुख्य कारण असणारे वायुप्रदूषण रोखण्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत. उलटपक्षी, विकासाच्या लालसेपोटी आणि आधुनिकतावाद, चंगळवाद यामुळे बदललेल्या जीवनशैलीच्या गरजा भागवण्यासाठी सुरू असलेल्या गोष्टींमुळे वायुप्रदूषण दिवसागणिक वाढत चालले आहे.

मध्यंतरीच्या काळात देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषित हवेमुळे तेथील नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची चर्चा देशभरात नव्हे तर जगभरात झाली. परंतु अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन महानगरांमधील हवा दिल्लीहून अधिक खराब झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १४६ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १७८ वर गेल्याचे यामधून दिसून आले आहे. मुंबई आणि पुण्यात पीएम २.५ कणांची मात्रा अधिक असल्याचे समोर आले आहे. पीएम २.५ धुलिकण कार्सिनोजेनिक असल्याने श्वसनासाठी घातक असतात. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे रोग, दमा, टीबी, कॅन्सर, त्वचाविकार वाढत आहेत.

अलीकडील काळात सर्वाधिक प्रदूषित शहरांबाबत जागतिक स्तरावरून जाहीर होणाऱ्या यादीत सुरुवातीच्या १०-१५ शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश अधिक असल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पण राज्यकर्त्यांची याबाबत उदासीनताच दिसून येते.

वायुप्रदूषणाबरोबर भारतीय शहरांमध्ये धुलीकणांचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत मुंबईमध्ये अलीकडेच एक प्रयोग करण्यात आला. पॉलीहाऊसमध्ये विशेषतः ऑर्किडचे कल्टिव्हेशन असणाऱ्‍या ग्रीनहाऊसमध्ये हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगर बसवलेले असतात.

Air Pollution
Air Pollution : मोकळ्या श्‍वासासाठी ‘हवा’ सुधारा वसई-विरार महापालिकेला निर्देश

कारण ऑर्किड हवेतील बाष्प शोषून घेत असल्यामुळे तेथील हवेचे तापमान वाढते. हे फॉगर धुके तयार करतात. अशा प्रकारचे फॉगर्स मुंबईमध्ये काही ठिकाणी बसवण्यात आले होते आणि त्यातून धुके तयार करण्यात आले. या धुक्यामुळे हवेतील धुळीचे कण खाली बसण्यास मदत झाली. हिवाळ्यामध्ये धुके पडते तेव्हा या दाट थरामध्ये स्मॉग तयार होतो. हा स्मॉगचा थर श्वसनासाठी अत्यंत घातक असतो. कारण या आर्द्रतेमुळे हवेतील दूषित कण श्वसनाद्वारे नाकात आणि फुप्फुसात जातात. तशाच प्रकारे हवेमध्ये वाढणारे धुलिकणांचे प्रमाणही आरोग्यासाठी घातक असते.

आपल्याकडे हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते. कारण रस्त्यांवर सर्वाधिक प्रमाणात धूळ तयार होते. आज सबंध देशभरात रस्तेविकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. धुलिकणांचे प्रमाण वाढण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे वाढती बांधकामे. आज देशातील प्रत्येक शहरांत घरबांधणीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महानगरांमध्ये जुनी घरे, इमारती पाडून रि-डेव्हलपमेंट करण्याचे प्रमाण अधिक आहे. यातूनही हवेतील धुळीचे प्रमाण वाढत आहे. याखेरीज वायुप्रदूषण वाढण्यास वाढती वाहनसंख्या आणि त्यांचा अतिवापर हे महत्त्वाचे कारण म्हणून पुढे आले आहे.

२०२२ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण वाहनांची संख्या ३२६.३ दशलक्ष इतकी होती. यामध्ये दुचाकी वाहनांचे प्रमाण ७५ टक्के होते. २०१९ ते २०२२ या काळात देशात दोन कोटींहून अधिक नव्या वाहनांची नोंदणी झाली. आज देशातील दुचाकींचा आकडा २१ कोटींहून अधिक आहे; तर चारचाकींचा आकडा ७ कोटींहून अधिक आहे. एका पाहणीनुसार २०५० पर्यंत भारतीय रस्त्यांवर ६१.१ कोटी वाहने धावताना दिसतील आणि ही संख्या जगातील सर्वाधिक वाहनसंख्या असेल. वाढत्या वाहनसंख्येवर शासनाचे कसलेली नियंत्रण नाही. उलट वाहनसंख्या वाढत चालल्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले म्हणून शासन झाडांच्या कत्तली करून रस्त्यांची निर्मिती व विकास करत आहे.

या सर्वांचा अर्थ वायुप्रदूषण वाढवण्यास सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. शासन व्यवस्था महसुलाचा विचार करून वाहनसंख्येवर बंधने आणणारी नियमावली जाहीर करण्याचा खटाटोपही करत नाही. वास्तविक, पाच जणांच्या कुटुंबाकडे किती वाहने असावीत, याबाबत काही नियम असावेत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हवेतील कार्बन डाय ऑक्साइड शोषण्याचे काम झाडांकडून केले जाते. धूळ झाडांकडून शोषली जात नसली तरी ती पानांवर चिकटून राहते. त्यामुळे झाडांमुळे धुळीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Air Pollution
Air Pollution : दर नऊ मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषित हवेमुळे, भारतांचा नंबर कितवा?

तसेच कार्बन डाय ऑक्साइडचे शोषण करून झाडे ऑक्सिजन देत असतात. असे असताना आज महानगरांच्या बाजूला झाडांची संख्या किती आहे? पुणे-बंगळुरु महामार्गाचा विचार केल्यास हा रस्ता तयार करत असताना हजारो जुने, डेरेदार, सावली देणारे वृक्ष तोडण्यात आले. रस्तानिर्मितीनंतर बाजूला पुन्हा रोपांची लागवड करण्यात आली; पण २०-२२ वर्षांनंतर ही वाढलेली झाडे रुंदीकरणासाठी पुन्हा तोडण्यात आली.

चौपदरी, सहा पदरी, आठपदरी, बारापदरी अशा मार्गाने रस्तेविकास करताना कार्बन शोषणाऱ्‍या झाडांचा विचारच केला जात नाही. किंबहुना, आज अशी स्थिती आहे की रस्तेविकास आणि रुंदीकरणामुळे झाडे लावण्यासाठी जागाच उरलेली नाही. रस्त्यावरची झाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी करणारी नैसर्गिक व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे. याखेरीज शहरांमध्ये कारखानदारीमुळेही मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होत आहे.

रस्त्याकडला झाडे लावण्यासाठी जागा नसल्यामुळे आता एक नवे फॅड निर्माण झाले आहे. अनेक शहरांमध्ये मोकळ्या भिंती, चौक किंवा फ्लाय ओव्हरच्या भिंतींवर व्हर्टिकल फार्मिंग केले जात आहे. वास्तविक, ही संकल्पना प्रचंड महागडी असून त्याचा मेंटेनन्सही खूप आहे. तसेच या व्हर्टिकल गार्डनमध्ये लावण्यात येणारी झाडे ही प्रामुख्याने सावलीत वाढणारी आहेत आणि ती विदेशी आहेत. विदेशी झाडे आणण्यासाठी पैशांची उधळपट्टी करण्यामध्ये शासन-प्रशासनाचे नेमके काय अर्थकारण दडलेले आहे, हे जनता जाणून आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली सुरू असलेली दिशाभूल पर्यावरणपूरक नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्याला वायुप्रदूषण कमी करायचे असेल तर वाहनसंख्या, रस्तेविकास आणि कारखाने यांच्यावर नियंत्रणाबाबत व्यापक धोरण आखावेच लागणार आहे. पण ज्याप्रमाणे लोकसंख्या नियंत्रणाबाबत जसे कोणी बोलत नाही तसेच याबाबतही कुणी बोलताना दिसत नाही. त्याचबरोबर जंगलतोडीबाबतही राज्यकर्त्यांची भूमिका पर्यावरणपूरक नाहीये. भारतात दरवर्षी १४ लाख हेक्टर जमिनीवरची जंगले नष्ट होत आहेत. वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असताना लागवड फार कमी प्रमाणात आहे.

म्हणजेच याबाबत कुठेही समन्वय नाही असे दिसते. त्यामुळे कारखान्यातून, वाहनांमधून बाहेर पडलेला कार्बनडाय ऑक्साइड हा वनस्पतींकडून शोषला वा वापरला जात नाही. पूर्वी जंगले जास्त असल्यामुळे कार्बनडाय ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण कमी होते. परंतु आता ते ३३ टक्क्यांनी जास्त झाले आहे आणि हाच वायू जागतिक तापमान वाढीस मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. मानव आपल्या वाढलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी विकासाच्या गोंडस नावाने विनाशाकडे वाटचाल करत आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण आजच्याच गतीने वाढत राहिले तर भविष्यात अकल्पित संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यावेळी कोंडलेल्या श्वासाने शहरांमध्ये राहणेही अवघड होणार आहे.

(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com