Thackeray Brothers: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी

Hindi imposition Issue: ‘आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी,’’ असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या अटकळींना शनिवारी बळकटी दिली. तर मुंबई आणि महाराष्ट्राला नख लावण्यासाठी कुणाची माय व्यायली नाही, अशा कठोर शब्दांत राज ठाकरे यांनी समाचार घेतला,
Uddhav and Raj Thackeray
Uddhav and Raj Thackeray Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: ‘‘आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी,’’ असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या अटकळींना शनिवारी बळकटी दिली. तर मुंबई आणि महाराष्ट्राला नख लावण्यासाठी कुणाची माय व्यायली नाही, अशा कठोर शब्दांत राज ठाकरे यांनी समाचार घेतला, तर आमची युती केवळ मुंबई महानगरपालिकेसाठी नाही तर महाराष्ट्र काबीज करण्यासाठी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

वरळी डोम येथे शनिवारी (ता.५) मराठी विजयी मेळावा पार पडला. या वेळी प्रथमच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकत्र आले होते. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर कोणत्याही पक्षाचा झेंडा नसलेल्या या सभेत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारी धोरणांचा समाचार घेतला. ‘‘जे बाळासाहेबांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमले. त्यांनी आम्हाला दोघांना एकत्र आणले,’’ असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर ‘‘आम्हा दोघांतील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कडवी टीका केली.

या वेळी हिंदी भाषेला आमचा विरोध नाही तर ती लादण्याला आहे. दिल्लीत बसलेल्या मालकाचे बूट चाटण्यासाठी आमच्यावर प्रयोग केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी लगावला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ढोलताशांचा गजर, ब्रास बँडवर वाजणारी मराठी गीते आणि महिलांच्या फुगड्या अशा जल्लोषी वातावरणात दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर हल्लाबोल करत जोरदार फटकेबाजी केली. तब्बल २० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने कार्यकर्ते कानात प्राण आणून भाषण ऐकत होते.

Uddhav and Raj Thackeray
Hindi Compulsory: हिंदी भाषेची सक्ती अव्यवहार्य

राज आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत शिवसेनेचा मूळ तोंडवळा या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आणला. आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही, पण कुणी मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीवर घाला घालत असेल तर आम्ही गुंडगिरी करू. मुद्दाम कुणाच्या कानाखाली मारू नका, पण जास्तच अतिरेक केला तर आवाज काढायला मागे पाहू नका, असा सल्ला ठाकरे बंधूंनी दिला.

या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, महादेव जानकर, प्रकाश रेड्डी, दीपक पवार, जितेंद्र आव्हाड, अजित नवले, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रगत असल्याचे सांगून राज ठाकरे म्हणाले, की हिंदीतून राज्यांचा विकास करता आला नाही. हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांत हिंदी भाषक नोकरीसाठी येतात. मग हिंदी कुणासाठी शिकायचे, असा सवालही त्यांनी केला.

‘‘मराठी आली पाहिजे याबाबत वाद नाही. मात्र विनाकारण वाद करायचा आणि मारायची गरज नाही. पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे,’’ असे राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून सगळे एकत्र आलो. राज आणि माझ्यात आंतरपाठ होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची आवश्यकता नाही. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. मला कल्पना आहे अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंबू टाकतंय, टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल. आमच्या आजोबांचे वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलो आहोत.

Uddhav and Raj Thackeray
Hindi Language Imposition: हिंदी भाषेच्या सक्तीवरुन मनसे आक्रमक; हिंदी पुस्तकांची होळी करत सरकारला इशारा!

भाषेवरून निघालेला विषय वरवरचा नाही. मी आणि राज यांनी नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचे आणि फेकून द्यायचे ही त्यांची नीती आहे. आता आम्ही दोघे मिळून फेकून देऊ. मराठी माणूस न्याय मागायला आंदोलन करत असेल आणि आम्हाला गुंड म्हणत असाल तर गुंडच आहोत. न्याय मागायला कुणी गुंडगिरी करायला लागत असेल तर आम्ही गुंडगिरी करू. येथील सत्ताधारी दिल्लीत बसलेल्याचे पाय चाटणारे बाटगे आहेत. २०१४ पासून तुम्ही लचके तोडले. मोठे ऑफिस, हिरे व्यापार, उद्योगधंदे बाहेर गेले ते कुठे गेले. आम्ही सगळे केले, पण आमच्यावर गद्दारी करून सरकार पाडले, कारण तुमचे दोन मालक व्यापारी तिकडे बसले आहेत. त्यांचे बूट चाटण्यासाठी सगळे करता.’’

शेतकरी कर्जबाजारी

‘‘महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बैल परवडत नाही. खांद्यावर नांगराचे जोखड वाहतोय आणि पंतप्रधान ‘स्टार ऑफ घाना’ गळ्यात घालून घेतात,’’ अशा शब्दांत पंतप्रधानांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘‘संपूर्ण देशात महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारी आहे. या विषयांकडे लक्ष नाही. आपसांत भांडण लावायचे ही यांची खेळी आहे,’’ असेही ते म्हणाले.

‘तर रस्त्यावर आमची सत्ता’

राज ठाकरे म्हणाले, की शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य कुणालाही न विचारता हिंदी सक्तीचा निर्णय लादला गेला होता. भलेही तुमची विधानसभेत सत्ता असेल, मात्र रस्त्यावर आमची सत्ता आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही. केंद्रीय शिक्षण धोरणाचा दाखला दिला जातो, मात्र इतर कोणत्या राज्यातही त्रिभाषा सूत्र का नाही, दक्षिणेत यांना हिंग लावून कुणी विचारत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये तिसरी भाषा कुठली आणणार, असा सवालही त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंवर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’चा नारा दिला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेत, ते म्हणाले, की शुक्रवारी एक गद्दार ‘जय गुजरात’ म्हणाला. किती लाचारी करायची यालाही मर्यादा असते. ‘मालक आला म्हणून जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा होईल का,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com