
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
महाराष्ट्र राज्याचा पाणलोट क्षेत्र विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास राज्याच्या ३०७ लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ४२.२० टक्के इतके क्षेत्र अवनत प्रकारचे आहे. तर १५९ लक्ष हेक्टर (५२ टक्के) इतके क्षेत्र अवर्षणप्रवण (दुष्काळाने प्रभावित) क्षेत्रात येते. राज्यातील हलक्या जमिनींचे प्रमाण ३९ टक्के आहे.
राज्याच्या संपूर्ण सिंचन क्षमतेचा विचार केल्यास ६५ ते ७० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आणि पावसावर अवलंबूनच राहणार आहे. राज्यामध्ये ४२,७७८ गावांपैकी जवळपास ३५,७१७ गावे ही कोरडवाहू प्रदेशात वसलेली आहेत. त्यामुळे राज्याच्या दृष्टिकोनातून पाणलोट क्षेत्राचा विकास व व्यवस्थापन हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंचनाच्या बाबतीत भारतामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा विचार करू. पंजाब, हरियाना, बिहार, उत्तर प्रदेश, मिझोराम आणि मेघालय या राज्यांमध्ये सिंचनाची स्थिती उत्तम आहे. अगदी राजस्थानसारख्या वाळवंटी राज्यातही ३८ टक्के सिंचन निर्मिती करून कमालीच्या सुधारणा केल्या आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये केवळ २३ टक्के सिंचन निर्मिती करणे शक्य झाले आहे. मात्र राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनाशिवाय आपल्याकडे प्रभावी अशा दुसरा कोणताही उपाय राहिलेला नाही. त्यामुळे त्यालाच प्राधान्य देत प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
२०२५ च्या भारतीय संविधान सातव्या कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार, देशामध्ये ५३३४ धरणे असून, त्यापैकी १८२१ धरणे महाराष्ट्रामध्ये आहेत. मात्र तरीही ही सिंचन व्यवस्था राज्यासाठी नेहमीच कमी पडत आलेली आहे. कारण महाराष्ट्राखाली असलेला एक सलग कातळ पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला भूजलामध्ये परावर्तित होण्यात अडथळा ठरतो. त्यामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून ओढे, नाले, नद्यांमार्फत समुद्राला जाऊन मिळते. आपल्या गावपरिसरात किंवा मूलस्थानी पाणी अडविण्यासाठी महाराष्ट्रासारख्या अवर्षणप्रवण राज्यांमध्ये पाणलोट क्षेत्रांचे व्यवस्थापन हीच बाब सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.
ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरीत्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहून उताराच्या दिशेने वाहते, त्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट असे म्हणतात. एखाद्या ओढ्यामध्ये अथवा नाल्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस तोंड करून उभे राहिल्यास त्या ओढ्यामध्ये अथवा नाल्यामध्ये जिथून सर्व पाणी उपलब्ध होते, अशा संपूर्ण क्षेत्रास त्या ओढ्याचे अथवा नाल्याचे पाणलोट क्षेत्र म्हणतात. अशा सर्व लहान मोठ्या नाल्यांचे किंवा ओढ्याचे पाणी एकत्र येत नदी तयार होते.
अशा सर्व लहान मोठ्या पाणलोट क्षेत्रांचे एकत्रित क्षेत्र म्हणजे त्या नदीचे पाणलोट क्षेत्र होय. कोणत्याही पाणलोट क्षेत्राच्या विकासामध्ये पाणलोटाचे अपधाव, पुनर्भरण व साठवण विभाग अशा विभागनिहाय वेगवेगळ्या उपचारपद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारणपणे पाणलोट क्षेत्र उपचारामध्ये क्षेत्रीय उपचार उदा. बांधबंदिस्ती, सलग समतल चर, गवतीबांध इ., तर नाल्यावरील उपचार अथवा वहन मार्गावरील उपचारामध्ये - उदा. माती नाला बांध, सिमेंट बंधारा, वळण बंधारा इ. घटकांचा समावेश होतो. यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाच्या काही उपचारांची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
सलग समपातळी चर
पाणलोट क्षेत्र विकासामध्ये महत्त्वपूर्ण उपचारांपैकी सलग समपातळी चर (Continuous Contour Trenches) हा उपचार अतिशय प्रभावी आहे. डोंगर उताराला आडवे व एकसमान पातळीत सलग असे चर काढण्यात येतात. उतारानुसार या चरांमधील अंतर कमी-जास्त ठेवले जाते. दोन चरांमध्ये साठणारे पावसाचे पाणी एक आड एक चरांमध्ये अडविण्यात येते.
या उपचारादरम्यान खणण्यात आलेली मातीच्या साहाय्याने तयार झालेल्या उंच मातीच्या वाफ्यावर वनस्पतीची किंवा गवताची लागवड केली जाते. त्यामुळे या प्रदेशात चाऱ्याची उपलब्धता वाढते. काही मोठी वाढणारी झाडे, झुडपे यांचेही त्यामध्ये योग्य प्रमाणात मिश्रण असल्यास वनक्षेत्र तयार होण्यास मदत होते.
या उपचारामुळे डोंगराच्या उतारावरून जाणारा अपधाव थांबतो. जमिनीची धूपही कमी होते. मातीतील ओलावा वाढल्याने गवताची व वनस्पतीची वाढ वेगाने होते. हिवरे बाजार (ता. जि. नगर) या गावामध्ये खोल सलग समतल चरावर (Deep CCT) केलेल्या या उपचारामुळे नैसर्गिक जंगलाची वाढ झाली आहे.
गावातील पशुधनासाठी ५ ते ६ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होत आहे. चाऱ्याची उपलब्धता वाढल्यामुळे या गावातील दुधाचे संकलन प्रति दिन ४०० लिटरवरून ४ हजार लिटरपर्यंत वाढले आहे. या यशामुळे प्रभावित झालेल्या राज्य शासनाच्या सर्व कार्यक्रमामध्ये हिवरे बाजार हा उपक्रम आता स्वीकारला गेला आहे. त्यानुसार १ मीटर बाय १ मीटर (सन २०१४ नुसार) या पद्धतीने चर आखण्यात येतात.
ओघळीवरील दगडी बांध (गली प्लग)
पाणलोट क्षेत्रामध्ये डोंगर माथ्याच्या भागात विशेषतः अधिक उताराच्या भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात अपधाव निर्माण होतो. त्याच्या ओघळी किंवा घळी तयार होतात. पुढे या घळीतून प्रचंड वेगाने पाणी खालील दिशेने कमी उताराकडे वाहते. या वहनाच्या प्रक्रियेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे प्रभावित असणारी माती पावसाच्या पाण्याबरोबर खालील दिशेने वाहून जाते. ते रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून ओघळीवर दगडी बांध हा उपचार घेण्यात येतो. भौगोलिक परिस्थितीनुसार काही ठरावीक अंतरावर दगडी बांध घातल्याने पाण्याचा वेग कमी होतो.
तसेच या उपचारामध्ये पाण्यातून वाहून आलेला गाळ व माती अडली जाते. स्वच्छ पाणी उताराच्या दिशेने वाहते. मृदासंवर्धनासाठी हा उपचार महत्त्वपूर्ण आहे. काही कालावधीनंतर या दगडी बांधांमध्ये साठलेल्या मातीचा गादी वाफा तयार होतो. गवताची वाढ होतो. या दगडी बांधामध्ये माती साठून बसल्याने काही प्रमाणात पाण्याचा साठाही होऊ लागतो. मात्र जमिनीच्या धुपेच्या प्रमाण किंवा तीव्रतेनुसार या उपचाराची काळजी घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे पाच वर्षांनंतर एकदा साठलेला गाळ उपसल्यास पूर्ववत लाभ मिळतात.
दगडी बांध
भौगोलिक परिस्थितीनुसार सलग समतल चर खोदताना अनेक वेळा मोठ्या प्रमाणात अनघड दगड उपलब्ध होतात. त्यांची रचना चरांच्या मातीसोबतच खालील बाजूला केल्यास त्यामुळे सलग समतल चरांचे आयुष्य वाढते. अशा उपचारास दगडी बांध असे म्हणतात.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे) - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.